- शेतरस्त्यांच्या ‘औसा पॅटर्न’ बद्दल गौरव
मुंबई ( वृत्तसेवा )- : कायम दुर्लक्षित राहिलेल्या शेतरस्त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे आस्थापूर्व विशेष लक्ष देवून शेत तिथे रस्ता अभियान हाती घेत या विषयात संपूर्ण राज्यात‘औसा पॅटर्न’ निर्माण केल्याच्या ऐतिहासिक कामगिरी बद्दल औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांना ‘नवभारत ॲचिव्हर्स’अवार्ड हा पुरस्कार (दि.९) रोजी दुबई येथील कार्यक्रमात दुबई राज परिवाराचे प्रमुख सन्माननीय शेख मोहम्मद यांच्या वरिष्ठ सल्लागार डॉ अर्शी आयुब यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नवभारतचे कार्यकारी संचालक वैभवजी माहेश्वरी व्यासपीठावर उपस्थित होते.

अतिशय क्लिष्ट अशा शेतरस्ते विषयात आ. अभिमन्यू पवार यांनी दोन वर्षात आपल्या मतदारसंघात १३०० किमी. पेक्षा अधिक लांबीचे शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत. शिवाय शासकीय योजनांमधून शेतकऱ्यांना कृषिपूरक सुविधा उभारून देण्याचा संकल्प करून त्यांनी मनरेगातून ग्रामसमृद्धीचाही औसा पॅटर्न करून दाखविला आहे. शेतकऱ्यांना फळबागा, शेततळे आदी घटकांचा लाभ मिळवून दिला असून, आ. पवार यांच्या या अभियानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. आ. अभिमन्यू पवार २०१९ पासून औसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यापूर्वी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात स्वीय सहाय्यकाची जबाबदारी दिली होती. ती समर्थपणे सांभाळून आ. पवार यांनी लोकाभिमुख प्रशासन कसे असते याची चुणूक दाखवून दिली.

एकेकाळी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना त्यांनी पुनरुज्जीवित केला असून औसा, निलंगा, उमरगा आणि लोहारा या भूकंपग्रस्त तालुक्यांमध्ये जवळपास २५ हजार उसउत्पादक शेतकऱ्यांना आणि जवळपास ५ हजार कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा दिला आहे. त्यांनी उसाला उच्चांकी २६५० रुपये प्रतिटन भाव देवून परिसरातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाचे दिवस दाखवले आहेत. शिवाय सामुहिक विवाह सोहळा, म. फुले जनआरोग्य योजना, राजमाता जिजाऊ- शाळा माझी न्यारी, मतदारसंघातील शाळांमध्ये अद्ययावत कॉम्प्युटर लॅब, क्रीडा केंद्र, वॉटर फिल्टर प्लॅट, सोलार सिस्टीम, ओपन जीम आदी क्षेत्रांतही आ.अभिमन्यू पवार यांनी आगळीवेगळी लक्षणीय कामगिरी केली आहे.




