पानगाव रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी
आ. कराड यांच्या पाठपुराव्याला यश
लातूर दि. २३: भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत रखडलेल्या रेणापूर तालुक्यातील खरोळा पाटी ते पानगाव दरम्यानच्या रस्त्याचे काम प्राधान्याने पुर्ण करण्यात यावे याबाबत केलेल्या मागणीची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गांर्भीयाने दखल घेवून सदरील रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्या संदर्भात कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती एका पत्राद्वारे दिली आहे.
धर्मापूरी-पानगाव-खरोळा पाटी ते रेणापूर फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 H हा रस्ता लातूर व बीड रस्त्याला जोडणारा असून धर्मापुरी ते पानगाव आणि खरोळा पाटी ते रेणापूर फाटा दरम्यानच्या रस्त्याचे काम पुर्ण झालेले आहे. परंतू खरोळा पाटी ते पानगाव 14.2 कि.मी लांबीचे काम रस्त्यालगतच्या शेतकार्यांनी अडथळा निर्माण केल्यामुळे पुर्ण होवू शकले नव्हते. काम रखडल्याने सदरील रस्ता वाहतूकीसाठी धोकादायक झाल्याने आतापर्यंत अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहेत.
रस्त्याची दुरावस्था लक्षात घेवून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी स्थानिक शेतकर्यांना रस्त्याबाबतचे महत्व पटवून दिल्याने संबंधीत शेतकरी आता रस्त्याचे काम करू देण्यास तयार आहेत अशी माहिती ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडयात दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून दिली. सदरील खरोळा पाटी ते पानगाव या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून हा रस्ता वाहतूकीसाठी सुरु करण्याकरीता गांर्भीयाने लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी आ. कराड यांनी यावेळी केली होती.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी खरोळा पाटी ते पानगाव रस्त्यासंदर्भात केलेल्या मागणीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दखल घेतली आहे. स्थानिक शेतकरी रस्त्याच्या कामाला परवानगी देण्यास तयार झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून सदरील रस्त्याचे काम लवकर व्हावे याबाबत संबंधीत अधिकार्यांना सुचना करण्यात आल्या असल्याची माहिती एका पत्राद्वारे मा. नितीन गडकरी यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री मा. नितीन गडकरी यांना भेटलेल्या शिष्ठमंडळात खा. सुधाकर शृंगारे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, जिप अध्यक्ष राहूल केंदे, जिल्हा सरचिटणीस अशोक काका केंद्रे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापुराव राठोड आदी होते. पानगाव रस्त्याच प्रश्न निकाली निघत असल्याबद्दल व या कामासाठी प्रयत्न केल्याबद्दल आ. रमेशअप्पा कराड यांचे सतिष अंबेकर, कुलभूषण संपते, हरीकृष्ण गुरले, ललिता कांबळे, शरद दरेकर, श्रीकृष्ण जाधव, अभिजीत मद्दे, श्रीकृष्ण मोटेगावकर, शिला आचार्य, मारूती गालफाडे, बंडू केंद्रे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.











