ऊस नव्हे सोयाबीन परिषद असल्याने पालकमंत्र्यांनी फिरविली पाठ
माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची टीका
लातूर /प्रतिनिधीः- महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन करणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे. लातूर जिल्ह्यातील एकूण खरीप पेरणी क्षेत्रापैकी 85 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होते. यामुळेच सोयाबीन उत्पादन घेणार्या शेतकर्यांच्या समस्या तितक्याच महत्वाच्या आहेत. त्याअनुषंगाने लातूर येथे झालेल्या सोयाबीन परिषदेला पालकमंत्र्यांची उपस्थिती राहणे अपेक्षीत होते. मात्र साखर कारखानदार असणार्या पालकमंत्र्यांना सोयाबीन उत्पादक शेतकर्यांपेक्षा ऊस उत्पादक शेतकर्यांच्या समस्या अधिक महत्वाच्या असाव्यात म्हणूनच त्यांनी सोयाबीन परिषदेकडे पाठ फिरविली असल्याची टिका माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
दि. 16 ऑगस्ट रोजी लातूर येथे सोयाबीन परिषद आयोजीत करण्यात आली होती. देशातील सोयाबीन उत्पादनापैकी मोठा वाटा लातूर जिल्ह्याचा आहे. जिल्ह्यातील 85 टक्के खरीप क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. त्यामुळेच कृषी महाविद्यालयाच्या वतीने लातूर येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला राज्याचे कृषीमंत्री आवर्जून उपस्थित राहिले. सोयाबीन उत्पादकांचे प्रश्न त्यांना भेडसावणार्या समस्या, बाजारभाव यावर चर्चा झाली. लातूर जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीबाबतही विचारमंथन झाले. जिल्ह्याचे शासकीय पालक असणारे आणि स्वतःला शेतकर्यांचे कैवारी म्हणवून घेणारे पालकमंत्री या परिषदेला उपस्थित राहतील असे अपेक्षीत होते. राजकीय शिष्टाचारानुसार या परिषदेचे निमंत्रण त्यांना देण्यात आलेले होते. त्यामुळे सहकारी मंत्र्यासोबत पालकमंत्रीही व्यासपीठावर दिसतील अशी जिल्ह्यातील भोळ्या शेतकर्यांना अपेक्षा होती पण ती फोल ठरल्याचे आ. निलंगेकरांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
लातूर जिल्हा पाणीटंचाईमुळे ओळखला जातो. सोयाबीन हे पिक कमी पाण्यात येते तर ऊसाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. पालकमंत्री स्वतः कांही साखर कारखान्याचे संचालक व कर्तेधर्ते आहेत. जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात त्यांचे साखर कारखाने आहेत. त्यामुळे ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते आग्रही असतात. ऊस उत्पादकांच्या समस्या त्यांना लवकर समजतात पण ज्यांच्या मतावर आपण निवडून येतो, राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद ज्यांच्या जीवावर भुषवितात त्या सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे प्रश्न मात्र त्यांना लक्षात येत नसावेत. किंवा या प्रश्नांचे पालकमंत्र्यांना गांर्भीय नसावे. यामुळेच त्यांनी सोयाबीन परिषदेकडे पाठ फिरविली असावी अशी टीकाही आ. निलंगेकर यांनी या पत्रकात केली आहे.
जिल्ह्यात गतवर्षी अवर्षण व अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादकांचे नुकसान झाले होते. अद्यापही त्या शेतकर्यांना भरपाई मिळालेली नाही. पालकमंत्र्यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून किमान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षाही आ. निलंगेकर यांनी व्यक्त केली आहे.