35.6 C
Pune
Monday, March 23, 2026
Homeलेख*उगवतीचे रंग*

*उगवतीचे रंग*

सेवाव्रती

पहाटेची वेळ किती रम्य असते ! सर्वांनाच आवडते. उगवतीचा सूर्य जसा आल्हाददायक असतो तसाच मावळतीचा सूर्य देखील. दिवसभरात लोकांना ऊर्जा, प्रकाश देऊन सूर्य कृतार्थ होऊन मावळतीला निघालेला असतो. म्हणून तर भा रा तांब्यांसारखा कवी म्हणतो, ‘ मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडून दोन्ही करा. ‘

आपल्या व्यवसायातून काहीशी निवृत्ती स्वीकारलेल्या परंतु असेच मावळत्या दिनकरासारखेच वंदनीय असलेले डॉ अलका कुलकर्णी आणि डॉ शशांक कुलकर्णी मला शहाद्यात भेटले. दोन्ही सेवाव्रतींची भेट झाल्याचा अतिशय आनंद मला झाला. त्यांचे कार्य डोळ्यांनी पाहता आले हे एक प्रकारचे भाग्यच !

डॉ सौ अलका कुलकर्णी आणि डॉ शशांक कुलकर्णी यांची आणि माझी भेट योगायोगाने पुण्याला विश्वकर्मा प्रकाशनाच्या कार्यालयात झाली. विश्वकर्माचे सहसंपादक आणि लेखक संदीप तापकीर यांनी माझा परिचय डॉ कुलकर्णी दाम्पत्याशी करून दिला. खान्देश हा आमच्या दोघांमधला समान दुवा होता. मग गप्पा झाल्या, ओळखी निघाल्या. रंगगंध या संस्थेने आयोजित केलेल्या साहित्य अभिवाचन स्पर्धेच्या निमित्ताने कुलकर्णी दाम्पत्य चाळीसगावी येऊन गेले होते. नंतर पुढे कोरोनाने डोके वर काढले. त्या दरम्यानच्या काळात त्यांचा आणि माझा संपर्क जवळजवळ तुटल्यासारखाच झाला होता. पण डॉ अलका कुलकर्णी लिखित ‘ माझी डॉक्टरकी – अनुभव गंभीर आणि गमतीदार ‘ या पुस्तकाचे प्रकाशन १५ ऑक्टोबरला होते. त्यासाठी मला संदीप तापकिरांचे आमंत्रण मिळालेच होते. नंतर डॉ अल्काताईंचाही आवर्जून या असा फोन आला आणि मी आणि सौ श्रद्धाने शहाद्याला जाण्याचे ठरवले.

शहाद्याला पोहोचल्यावर डॉ कुलकर्णी दाम्पत्यांनी आमचे अतिशय प्रेमपूर्वक स्वागत केले. त्यांच्याकडेच आमचा मुक्काम होता. संदीप तापकीरही कार्यक्रमासाठी आलेलेच होते. पुस्तक प्रकाशनाचा सोहळा अतिशय देखणा झाला. त्या दिवशी शहाद्याचे सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ विश्वास पाटील आणि धुळे येथील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ दिलीप पाटील प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमाला मोठमोठया व्यक्तींनी हजेरी लावली होती. खरं तर पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला फार कमी लोक उपस्थित राहतात. पण इथे मात्र मोठया संख्येने लोकांची उपस्थिती होती. लोकांचे कुलकर्णी दाम्पत्यावरील प्रेमाचे ते निदर्शक होते. कार्यक्रमाच्या आधी, कार्यक्रमाच्या दरम्यान आणि कार्यक्रमाच्या नंतरही आम्हाला डॉ कुलकर्णी यांच्या सेवाभावी कार्याचे एकेक पदर उलगडत गेले. आजच्या या लेखात त्यांचे हेच कार्य आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे कार्य हे आज ग्रामीण भागात काम करू इच्छिणाऱ्या सर्वानाच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे.


डॉ शशांक आणि डॉ सौ अलका कुलकर्णी. दोघेही १९७८ मध्ये मुंबईहून शहाद्याला आले. मुंबईत ते दोघे उत्तम प्रॅक्टिस करू शकले असते. नाव आणि पैसाही कमावता आला असता. पण संवेदनशील असलेल्या या दोघांनी मुंबईतील इतर डॉक्टरांचे वैद्यकीय जीवन जवळून पाहिले होते. पेशंटबद्दलची आस्था, आपुलकी नष्ट होऊन केवळ आर्थिक लाभाचा विचार केला जात होता. अशा वेळी बालरोगतज्ज्ञ असलेल्या डॉ अलका आणि जनरल सर्जन असलेले डॉ शशांक यांनी वेगळा निर्णय घेतला. तो निर्णय होता जिथे आपल्या सेवेची खरी गरज लोकांना आहे अशा ठिकाणी जाऊन वैद्यकीय व्यवसाय करण्याचा. खरं तर त्या काळात असा विचार करणे म्हणजे इतर डॉक्टरांच्या मते मूर्खपणा होता. असे करणे म्हणजे सुखाचा जीव दुःखात घालण्यासारखे होते. पण दोघांनीही आपले कम्फर्ट झोन तोडण्याचा निर्णय घेतला होता. तुम्हाला आयुष्याचा विविधरंगी अनुभव घ्यायचा असेल, जीवन समृद्ध करायचे असेल तर कंफर्ट झोन तोडायला हवे हे तत्वज्ञान आपल्या सगळ्यांना बहुतेक करून माहिती असते. पण आपले कंफर्ट झोन म्हणजे सुखाने राहण्याचे ठिकाण, कार्यक्षेत्र सोडून इतरत्र जाण्याची किती जणांची तयारी असते ?

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झपाट्याने शहरीकरण झाले. ग्रामीण भागातील लोकांचा ओघ नोकरीसाठी शहराकडे वाढला. प्रचंड लोकसंख्येमुळे शहरातील सोयी सुविधांवर ताण यायला लागला. म. गांधींनी लोकांना ‘ खेड्याकडे चला ‘ असे आवाहन केले. खेडी स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. पण आमच्याकडील उच्च शिक्षित तरुणांना शहराकडून खेड्यात जाणे हे मागासलेपणाचे लक्षण वाटू लागले. त्यामुळे या दोघांनीही घेतलेला निर्णय खऱ्या अर्थाने क्रांतिकारक होता. संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे ‘ सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता ‘ असेच त्यांचे वागणे होते.

डॉ सुभाष फुलंब्रीकर यांच्या सल्ल्यानुसार दोघांनी शहाद्याला यायचा निर्णय घेतला. शहादा हे नंदुरबार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव. सातपुड्याच्या कुशीत वसलेले. जेमतेम पस्तीस चाळीस हजारांची लोकसंख्या. आदिवासीबहुल प्रदेश. जवळच तापी आणि नर्मदा या दोन पवित्र नद्यांचा परिसर. दक्षिण काशी म्हटले जाणारे प्रकाशा हे तीर्थक्षेत्र येथून जवळच. मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर असेलला हा प्रदेश. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर असलेले टोकालगतचे गाव. वीज, टेलिफोन या सारख्या आधुनिक सुविधांना नुकताच गावात प्रवेश केला होता पण त्यांची सेवा जणू असून नसल्यासारखी असायची. विजेचा लपंडाव किंवा दीर्घकाळ गायब होणे, टेलिफोन लावण्यासाठी टेलिफोन ऑपरेटर जागेवर असणे वगैरे अनेक अडचणी होत्या. पण त्या सर्वांवर मात करून तेथेच राहायचे आणि लोकांना सेवा द्यायची हा निर्णय या दाम्पत्याने घेतला.

कुलकर्णी दांपत्य शहाद्यात आले आणि सेवा द्यायला सुरुवात केली. पण हे काम सोपे नव्हते. अनंत अडचणींचा डोंगर समोर उभा होता. त्यांच्याकडे येणारे रोगी मुख्यतः आदिवासी भागातील होते. अशिक्षित आणि अज्ञानी. त्यांना एखादी गोष्ट समजावून सांगणे आणि ती त्यांच्या गळी उतरवणे महाकठीण काम होते. त्यांचे असे अनेक गंभीर आणि गमतीदार अनुभव ‘ माझी डॉक्टरकी ‘ या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील. सलाईन लावण्याची देखील सुविधा शहाद्यात उपलब्ध नव्हती. तीव्र निर्जलन ( शरीरात पाण्याची कमतरता ) झालेल्या रुग्णांना सलाईन लावण्यासाठी दूर धुळ्याला जावे लागे. काही रुग्णांमध्ये तेवढीही शारीरिक शक्ती आणि आर्थिक कुवत नसायची. साधी सिरिंज देखील लवकर मिळायची नाही. एक्स रे मशीन, इन्क्युबेटर या सारख्या गोष्टी तर दुरापास्त होत्या. ऑपरेशनच्या वेळी भूल देण्यासाठी भूलतज्ज्ञ नव्हता. या अनंत अडचणींचा सामना हे दांपत्य करीत गेले. त्यातून नवनवीन गोष्टी शिकत गेले. अनुभव समृद्ध होत राहिले.

डॉ कुलकर्णी यांचे कार्य पाहिल्यावर मला डॉ प्रकाश बाबा आमटे यांची प्रकर्षाने आठवण झाली. त्याचबरोबर डॉ अभय बंग आणि डॉ राणी बंग यांचेही कार्य आठवले. या सगळ्यांचे कार्य समांतर असेच आहे. आदिवासी, अशिक्षित रुग्ण, दुर्गम भागातील अडचणी, सोयी सुविधांचा अभाव या सगळ्यांवर मात करून त्यांनी आपले कार्य पुढे चालूच ठेवले. इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला. डॉ कुलकर्णी यांनी तर ज्यावेळी वीज उपलब्ध नसायची अशा वेळी कंदिलाच्या प्रकाशात सुद्धा ऑपेरेशन केले. पण गुणवत्ता आणि साधन शुचिता यांच्याशी कुठेही तडजोड केली नाही.

विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी नोबेल पारितोषिके गेल्या महिन्यात नुकतीच जाहीर झाली. गेल्या शंभर वर्षात लागलेले कोणते शोध तुमच्या दृष्टीने महत्वाचे आहेत यावर जवळपास एक हजार नोबेल पारितोषिक विजेत्यांची मते घेण्यात आली. त्या सर्वांच्या मते गेल्या शंभर वर्षात लागलेले दोन शोध मानव जातीच्या दृष्टीने सर्वात जास्त उपयोगाचे आहेत. त्यातील पहिला शोध म्हणजे ओ आर एस पावडर. ( ओरल रिहायड्रेशन सॉल्ट ) या शोधाने शरीरात पाणी कमी झालेल्या लाखो रुग्णांचे जीव जगभर वाचले. थोडक्यात म्हणजे जलसंजीवनी. मीठ, साखर पाणी यांचे मिश्रण. हा वरवर साधाच वाटणारा पण अत्यंत महत्वाचा क्रांतिकारी शोध. आणि दुसरा शोध म्हणजे माणूस हा माणसाची वर्तनशैली बदलू शकतो. तसं तर वर्तनशैली बदलणं हे कठीण काम. पण जर समजून सांगता आलं तर ते शक्य होतं. उदाहरणार्थ मधुमेहाचे किंवा हृदयरोगाचे रुग्ण असतील तर त्यांना आहार, व्यायाम इ च महत्व सांगून त्यांच्या वर्तनशैलीत बदल करायला लावता येऊ शकतो. या दोन्ही गोष्टी डॉ कुलकर्णी यांनी अमलात आणल्या.

हा भाग आदिवासीबहुल असल्याने कुपोषणाचे प्रमाण मोठे होते. कुपोषण हे सुद्धा दोन प्रकारचे. अति पोषण आणि कमी पोषण. या भागातील गरीब आदिवासी आपलं आणि त्यांच्या मुलांचं नीट पोषण करू शकत नव्हते. गरिबी, अज्ञान आणि शिक्षणाचा अभाव या त्यातील अडचणी. अशा लोकांना आहाराचं महत्व समजून सांगण्याचं मोठंच काम कुलकर्णी दाम्पत्याने केलं. पाण्याची कमतरता निर्माण झालेल्याना साखर, मीठ पाणी घेण्याचा सल्ला दिला. कुपोषित बाळांच्या मातांना घरीच त्यांना स्वस्तात पोषक आहार कसा देता येईल याचे धडे दिले. साधे गूळ शेंगदाण्याचे लाडू या दृष्टीने मुलांना देता येतील असे सांगितले. अनेक मुले त्यांच्या उपचारामुळे वाचली. अनेक रुग्ण बरे झाले. ती माणसे आजही डॉ कुलकर्णी यांना देवासमान मानतात. डॉ कुलकर्णी यांचा वारसा त्यांचा मुलगा डॉ दर्शन आणि डॉ मालविका आज अगदी समर्थपणे चालवत आहेत.

आदिवासी आणि अशिक्षित लोक आजही सर्वच बाजूनी नागवले जातात याची खंत डॉ अलका कुलकर्णी यांना आहे. त्यांचा कैवार घेणारेच त्यांना लुबाडतात. या भागात आजही चांगली डॉक्टर्सची, चांगल्या शिक्षकांची, इंजिनिअर्सची गरज आहे. काही माणसे चांगले काम करताहेत पण त्यांचे प्रयत्न फार कमी पडताहेत. त्यांचे हात बळकट करायला हवेत.

डॉ अलका कुलकर्णी यांचं ‘ माझी डॉक्टरकी ‘ हे पुस्तक अतिशय बोलकं आहे. एका डॉक्टरने हे पुस्तक लिहिलं असलं तरी ओघवत्या आणि साध्या सोप्या भाषेमुळे ते कुठेही कंटाळवाणे किंवा बोजड होत नाही. डॉ अलका वाचकांशी थेट संवाद साधतात. आपल्या मनोगतात त्या तरुण पिढीतल्या डॉक्टरांना अतिशय महत्वाचा संदेश देतात. त्या म्हणतात, ‘ येथे काही लाईफ नाही असे म्हणणार्यांना मला सांगावेसे वाटते की येथे कामाबद्दल समाधान आहे. जे काम करताना माणसाला समाधान वाटत नाही, ते काम एक ओझे होते. आणि असे काम करणारी व्यक्ती नेहमी दुय्यम दर्जाचे आयुष्य जगते. मला अगदी ओरडून सांगावेसे वाटते की, ‘ अहो, इकडे बघा – किती काम वाट पाहतेय तुमची. प्रामाणिकपणे काम केलं तरी येथे ‘ खाऊन पिऊन सुखी राहता येतं. शहरातली दगदग आणि यातायात नाही. अलीकडे जरा स्पर्धा वाढीला लागलीय. पण स्पर्धा हवीच. कारण स्पर्धा नसेल तर माणसाकडून चांगलं दर्जेदार काम होत नाही. ‘

विश्वास देशपांडे, चाळीसगाव

०२/११/२०२२

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]