आ. अभिमन्यू पवार यांच्या मागणीवरून वीमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना… मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात आ. अभिमन्यू पवार यांची उपमुख्यमंत्र्यांकडे अनेक मागण्या…
औसा, -(प्रतिनिधी)- २०२१ खरीप हंगामाचा विमा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणं अपेक्षित होत पण तो अद्याप मिळालेला नाही.तो तातडीने तातडीने देण्यात यावा तसेच २०२० मध्ये तूर व सोयाबीनच्या संभाव्य उत्पादनात निर्माण झालेली ५० टक्के पेक्षा अधिकची घट लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी २५ टक्के आगाऊ पीकविमा शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार देणाऱ्या मुजोर विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्यानंतर याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची सूचना प्रशासनाला दिली.

दि. ११ डिसेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा व कोव्हीड विषाणू प्रादुर्भाव आणि उपाययोजनांचा आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी २५ टक्के आगाऊ पीकविमा शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात आदेश देवूनही विमा कंपनी अंमलबजावणी करण्यास नकार देत असल्याचे निदर्शनास आणून देत मुजोर विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. यासंदर्भात प्रशासनाला संबंधित विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्री दिल्या आहेत. यावेळी एचव्हीडीएस योजनेअंतर्गत मार्च २०१८ पर्यंत डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी वीजजोडण्या देण्यात आल्या पण त्यानंतर डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना अद्याप वीजजोडणी मिळालेली नसल्याचे सांगून वंचित शेतकऱ्यांना शेतीपंप वीजजोडणी देण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्यात यावी अशीही मागणी आ. पवार यांनी केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात आढावा घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. सातत्यपूर्ण पाठपुरावा करून मनरेगा अंतर्गतच्या वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या २६२ कामांचा अभिसरण आराखड्यात समावेश करून घेतला आहे पण अभिसरणातून कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासन उदासीन असल्याचे सांगून अभिसरणातून कामे केल्यास निधी दुप्पट उपलब्ध होत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डीपीडीसीसह सर्व निधी अभिसरणातून खर्च करा अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.औसा विधानसभा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यात २०२० व २०२१ साली अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेल्या रस्ते व पूल दुरुस्ती कामांचे प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित असल्याने अनेक गावांना जायला यायला रस्ता नसल्याचे सदरील प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत. मतदारसंघातील कारला व कुमठा गावांच्या पुनर्वसनाचा निलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी ऑनलाईन बैठक आयोजित करण्याचे ठरले होते पण ती बैठक अद्याप झाली नाही.असा आ. पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानास आणून दिल्यानंतर यासंदर्भात लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील सर्व पाणीपुरवठा योजनांना स्वतंत्र रोहित्र बसविण्यात यावेत यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हा नियोजन बैठक ते ऊर्जामंत्री यांच्याकडे मागच्या काही दिवसांपासून पाठपुरावा केला आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या रोहित्रावर शेतीपंपांचा अतिरिक्त विद्युतभार असल्याने रोहित्र खराब होण्याचे व वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे रोहित्र खराब होऊन पाणीपुरवठा बंद पडत असल्याचे निदर्शनास आणून देत जिल्हा वार्षिक योजना निधीअंतर्गत राज्य स्तरावरून निधीची तरतूद करून ग्रामीण भागातील सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी स्वतंत्र रोहित्र बसविण्यात यावे अशी विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांना केली.

यासह किल्लारी येथील ब दर्जाच्या श्री निळकंठेश्वर देवस्थान येथे भक्तांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, औसा शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरण कामाच्या तिसऱ्या टप्यासाठी निधी मंजूर करण्यात यावा, भूकंपग्रस्त भागातील मूलभूत सुविधा विकासासाठी विशेष निधी मंजूर करावा, स्मशानभूमी जमीन संपादनासाठी निधीची तरतूद करावी व एएनएम व एमपीडब्लू कर्मचाऱ्यांची लातूर जिल्ह्यातील रिक्त असलेली ३०० पेक्षा अधिक पदे तातडीने भरण्यात यावेत अशी मागणीही आ. अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.











