36.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeराजकीय*एकनाथ, हिमंत- घराणेशाहीच्या पर्वत भेदून उसळलेले दोन ज्वालामुखी…*

*एकनाथ, हिमंत- घराणेशाहीच्या पर्वत भेदून उसळलेले दोन ज्वालामुखी…*

घडामोडी

घराणेशाही भारतीय राजकारणाला लागलेला शाप आहे. भाजपसहित कुठलेही राजकीय पक्ष यापासून मुक्त नाहीत फक्त भाजप आणि अन्य पक्षात एकंच फरक आहे तो असा कि भाजपमध्ये नेतृत्व करण्यासाठी निखळ गुणवत्ता आणि कर्तृत्व हीच एक अत्यावश्यक बाब आहे. या घराणेशाहीच्या पार्श्वभूमीवर हिमंत बिस्व सरमा आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत एकसमान घटना घडत आहेत.

२०१५ ला आसामचे सध्याचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा राहुल गांधींना भेटायला दिल्लीला गेले तेव्हा ते त्यांच्या कुत्र्याला बिस्कीट खायला घालण्यात मग्न होते आणि आसाममध्ये जबरदस्त ताकदवान असलेल्या सरमांना द्यायला त्यांना वेळ नव्हता. त्याशिवाय आसामचे तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी पद्धतशीरपणे आपला अनअनुभवी मुलगा गौरव गोगोई याला पुढे आणण्यासाठी हिमंत यांना बाजूला करायची सुरुवात केली होती. या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांनी २०१५ ला काँग्रेस सोडली, काही काळाने भाजपमध्ये आले आणि २०१६ ला भाजपचं पहिलं सरकार आणण्यात मोठी भूमिका निभावली. याच कर्तृत्वाच्या जोरावर २०२१ ला ते आसामचे मुख्यमंत्री झाले.

काल महाराष्ट्राच्या विधानसभेत एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री म्हणून पहिलं भाषण अनेक अर्थांनी वेगळं होतं. वर्षानुवर्षं एका घराण्याच्या दबावाखाली राहिलेला, जमिनीवर अफाट कर्तृत्व गाजवलेला एक रांगडा माणूस एका सत्वहीन आणि स्वत्वहीन परिवाराच्या प्रभावातून बाहेर आल्याची ती घोषणा होती. गेली अडीच वर्षं एका तिशीतल्या चम्याला नेता म्हणून लादल्यानंतर आपण सभागृहात त्याच्यापेक्षा प्रभावी वागता कामा नये, आपण काहीही करून खालच्या मानेने त्याच्या समोर राहिलं पाहिजे, आपण जरा जरी चमक दाखवली तरी एका कुटुंबाची नाराजी आपल्यावर कोसळेल अशा एक ना अनेक दबावांना झुगारल्यावर माणूस कसा लखलखतो याची तेजस्वी घोषणा म्हणजे एकनाथ शिंदे यांचं कालचं भाषण होतं!

मुख्यमंत्री शिंदे यांचा चेहरा आणि देहबोली आता आपण स्वतंत्र श्वास घेऊ शकतोय याची घोषणा क्षणाक्षणाला करत होती. त्यांनी इंग्रजी वाक्य फेकली नाहीत, मोठमोठी “ग्यान बाटने वाली कोट्स” वापरली नाहीत पण ते कुठून आणि काय काय करून इथपर्यंत पोचले हे मात्र योग्य शब्दात पण थेटपणे अख्ख्या महाराष्ट्राला कळेल अशा भाषेत सांगितलं.

मुख्यमंत्री शिंदेनी शपथविधीपूर्वी दिल्या गेलेल्या वेगवेगळ्या धमक्यांना सभागृहातल्या मानमर्यादा पाळून उत्तर दिलं ते म्हणजे प्रत्येक आमदार दोन चार हजार तरुण आपल्या सोबत बाळगतो त्यामुळे आमच्यावर बळाचा वापर करून बघू नका, परिणाम वाईट होतील एवढं नं सांगता खांद्याच्या खाली त्यातल्या त्यात मजबूत भास्करला ते कळल्यामुळे त्यांनी नमस्कार करून विषय संपवला!

शिंदेंची राजकीय भविष्यवाणी…

आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल आणि २०२४ च्या निवडणुकीत आम्ही २०० पेक्षा जास्त जागा जिंकून विधानसभेत येऊ हि त्यांची राजकीय भविष्यवाणी होती. आता ती भविष्यवाणी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण अशाच दोन भविष्यवाण्या यापूर्वी कुणीही गांभीर्याने घेतल्या नव्हत्या तरीही त्या सत्यात उतरल्या आहेत हे हि विसरण्याचं कारण नाही! गोध्रा कांडानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपने निखळ बहुमत मिळवलं पण २००७ च्या विधानसभेत मोदी- शहांना टोकाच्या स्वपक्षीय विरोधाला सामोरं जाऊन निवडणूक लढवावी लागली. तेव्हा रवीश कुमार (डर का माहौल है वाला) याला अमित भाईंनी दिलेल्या बाइटमध्ये म्हटलं कि आमचं पूर्ण बहुमतातलं सरकार बनणार आहे. त्यावेळी त्यांची टिंगल झाली पण बहुमताचं सरकार बनलं! २०१९च्या डिसेम्बरमध्ये सीएए विरोधाचा राज्यभर उद्रेक झाल्यानंतर आसाममध्ये २०२१ च्या निवडणुकीत भाजप २५ जागा जिंकणार नाही अशी राजकीय पंडित लोकांची धारणा होती. त्यावेळी हिमंत दा शांतपणे म्हणाले आम्ही पूर्ण बहुमताचं सरकार बनवू! हे विधान आसाम विश्लेषकांना “जोक ऑफ द ईयर” वाटलं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा जवळपास मुख्यमंत्री झाल्यात जमा होते. पण २०२१ च्या विधानसभेत भाजप पूर्ण बहुमताच्या जवळ पोचली आणि हिमंत पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.

शिंदे- फडणवीस सरकार टिकेल का? शिंदे भाजपमध्ये येथील का? शिंदे शिवसेनेचा पूर्ण ताबा घेतील का? वगैरे भविष्यवाणी वर्तवण्यासाठी हे लिहिलेलं नाही. पण कालच्या विधानसभेतला शिंदेंचा अवतार बघता घराणेशाहीच्या प्रचंड पर्वतांखाली भारतभरात अजून किती हिमंत-एकनाथा सारखे ज्वालामुखी उसळण्याची वाट बघत आहेत- असा प्रश्न मात्र माझ्या मनात आला. जमिनीवरील राजकारणाची गंधवार्ता नसलेल्या तिशीतल्या गौरव गोगोईच्या हाताखाली एक मंत्री म्हणून खालच्या मानेने काम करणारा एक हिमंत बिस्व सरमा आणि आज आपण बघतो तो मुख्यमंत्री हिमंत नावाचा माणूस किंवा तिशीतल्या आदित्यच्या हाताखाली काम करणारा एक एकनाथ जो आपण गेली अडीच वर्षं बघत आलोय तो आणि काल मुख्यमंत्री एकनाथ या रूपात बघितलेला माणूस यात जमीन अस्मानाचा फरक नाही का दिसत?

काही काळ नगरसेवक, नागपूरचा सगळ्यात तरुण महापौर, कित्येक वेळा आमदार, एकदा पूर्ण ५ वर्षं मुख्यमंत्री आणि मग विरोधी पक्षनेता असं राहूनही मुंबईत स्वतःचं घर नसलेला एक देवेंद्र, आयपीएसची नोकरी सोडून रोज मी २०० रुपयात जगू शकतो असं शांतपणे म्हणणारा तामिळनाडूचा अन्नामलाई, तेलंगणात ज्याला फार ओळखत नाही असा बंडी संजय, संन्यासी, खासदार ते मुख्यमंत्री असा प्रवास करणारा योगी आदित्यनाथ, हि आणि अशी अनेक नावं भाजपच्या तिजोरीत आहेत कारण मध्यमवर्गीय घरात जन्मलेला एक नरेंद्र आणि सामान्य कुटुंबात जन्मून केंद्रात सत्ताधारी झालेल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष मग देशाचा गृहमंत्री असलेला एक अमित अशा लोकांच्या हातात भाजपची निर्णय प्रक्रिया आहे.

वरपासून खालपर्यंत भाजपची रचना सध्यातरी गुणवत्ता, परिश्रम यावर आधारित आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा धाडसी निर्णय ते घेऊ शकतात, तो निर्णय देवेन्द्र जी मोकळ्या मनाने स्वीकारू शकतात आणि शिंदेंसोबत कार्यरत राहू शकतात!

भाजपची सततच्या विजयाची भूक येणाऱ्या काही वर्षात अशीच वाढत राहील. भाजप राजकीय पक्ष आहे त्यामुळे सत्ता मिळवणे हा प्रधान उद्देश आहे. हि भूक आणि उद्देश यामुळे देशभरात तळागाळातून वर आलेले आणि स्वकर्तृत्वाच्या तेजाने तळपण्याचा ज्यांना मूलभूत हक्क आहे परंतु घराणेशाहीच्या अवाढव्य पर्वताखाली जे दाबले गेले आहेत असे आणखी डझनभर हिमंत- एकनाथ यांच्यासाखे ज्वालामुखी देशभरातून फुटून, उद्रेक होऊन बाहेर येणार असतील तर भाजपची सत्तापिपासा आणि विजयाची भूक मला मान्य आहे!

लेखन :विनय जोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]