ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना काल विरार येथे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.. ज्येष्ठ पत्रकार तथा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांच्या हस्ते त्यांचा परिषदेने बहुमान केला.. एका तत्त्वनिष्ठ पत्रकाराच्या हस्ते दुसरया ध्येयवादी, तपस्वी पत्रकाराचा सन्मान होतानाचे अनोखे दृश्य काल विरारकरांनी पाहिले.. सत्काराला उत्तर देताना पंढरीनाथ सावंत मोजकेच बोलले.. पण “मार्मिक” बोलले.. “माझ्या मार्गानं पत्रकारिता कराल तर तुम्हाला सुख, शांती, आनंद काही मिळविता येणार नाही आणि अगदी टेनपर्सेन्टचे घर ही मिळविता येणार नाही” असं मत त्यांनी मांडलं.. ही त्यांची खंत नव्हती.. निष्ठेनं पत्रकारिता करणं किती अवघड, तारेवरची कसरत आहे हे स्वअनुभवाचे बोल त्यांनी बोलून दाखविले.. मुंबईत असे अनेक पत्रकार आहेत की, ज्यांनी स्वतःच्या आणि बायकोच्या नावाने दोन दोन फ्लॅट १० परसेन्ट मधून मिळविले आहेत.. पंढरीनाथ सावंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अन्य उच्चपदस्थांच्या सहवासात, सान्निध्यात अनेक वर्षे होते..मार्मिकचे ते अनेक वर्षे संपादकही होते… ते वयवहारवादी असते तर किमान एक घर तर मिळविणे त्यांना कठीण नव्हते..पण नाही.. त्यांच्या तत्त्वात ते बसलं नाही..त्यांनी कोणासमोर हात पसरले नाहीत.. सवत:हून त्यांना कोणी घर देण्याचाही प्रश्न नव्हता… परिणामतः आजही एका चाळीत ते राहतात..

जे तत्त्वनिष्ठ आहेत, त्यांची उपेक्षा करायची आपल्या सत्ताधारयांची आणि समाजाची मानसिकता आहे.. .. “पत्रकारांनी ध्येयवादी असावं, सचोटीनं वागावं, सामाजिक बांधिलकी जपत पत्रकारिता करावी” अशी समाजाची अपेक्षा असते.. थोडक्यात सामना सिनेमातले निळु फुले जी पत्रकारिता करीत होते तशीच पत्रकाराची प्रतिमा आजही समाजाच्या मनात आहे.. हरकत नाही.. सत्ता आणि समाजाच्या या अपेक्षा गैर नाहीत.. सुदैवानं असे काही पत्रकार आजही आहेत, नाही असे नाही.. पण अशा ध्येयवादी पत्रकारांच्या उत्तर आयुष्यात त्यांच्या वाट्याला कोणते भोग येतात याची समाजानं कधी चिंता केलीय का ? पंढरीनाथ सावंत यांनी घरासाठी भलेही सरकारकडे याचना केली नसेल पण सरकारला असे का वाटले नाही की, पंढरीनाथ सावंत यांना मुंबईत एखादे घर द्यावे? सच्चाईच्या मार्गानं चाललो तर सरकार आणि समाज आपली कदर करतो हे दाखविण्यासाठी आणि प्रामाणिक पत्रकारितेवरचा नव्या पिढीचा विश्वास वाढविण्यासाठी तरी लरकारनं असं करणं आवश्यक होतं ते कोणत्याच सरकारनं केलं नाही.. जीवनगौरव पुरस्काराचे एक मानपत्र आणि स्मृतिचिन्ह सावंत यांच्या हातात देऊन सरकारने आपले इतिकर्तव्य संपले म्हणत हात झटकले..
सरकार ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देते.. पंढरीनाथ सावंत यांना ती देखील दिली गेली नाही.. “कागदपत्रं अपुरे आहेत, ते ३० वर्षे पत्रकार असल्याचे पुरावे देऊ शकले नाहीत” असा निर्लज्ज युक्तीवाद सरकारी अधिकारी करताहेत.. पात्र नसलेल्या काही पत्रकारांची नावं माझ्याकडं आहेत, त्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून पेन्शन ढापली, मात्र पंढरीनाथ सावंत यांना ती दिली गेली नाही.. विरोधाभास असा की, पत्रकारितेतील अतुलनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा जीवनगौरव ज्या पंढरीनाथ सावंत यांना दिला गेला त्या सावंत यांना तुम्ही पेन्शनसाठी पात्र नाहीत असे सरकार कसं काय सांगू शकते? पण ते घडलंय.. यावर अनेकदा आम्ही आवाज उठविला, मात्र बधीर सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचला नाही.. मुख्यमंत्री भेटत नाहीत आणि अन्य कोणी दाद देत नाही… मग करायचं काय? उपेक्षा, मानहानी सहन करीत बसायचं? सत्ता आणि समाजाची तीच अपेक्षा असावी.. “पंढरीनाथ सावंत यांनी माझ्या मार्गानं जाल तर हालअपेष्टांशिवाय काहीच तुमच्या वाट्याला येणार नाही” असा उद्वेग व्यक्त केला आहे तो याच नैराश्यमय वातावरणातून.. चांगुलपणाला कोणी वाली नाही हे पंढरीनाथ सावंत आणि अश्याच अनेक ध्येयवादी पत्रकारांच्या बाबतीत घडताना दिसून आलं आहे.. चांगुलपणाची पाठराखण न करणारया समाजाला पत्रकारितेतील अनिष्ठ प्रवृत्तीबद्दल नाकं मुरडणयाचा, आणि बोंबा मारण्याचा काही अधिकार नाही. असं माझं मत आहे.. जे चांगलं आहे, त्याची खंबीरपणे पाठराखण केल्याशिवाय पत्रकारितेतील अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील दुष्परवृत्तींचे निर्दालन होणार नाही..
पंढरीनाथ सावंत यांचं आज वय ८७ वर्षांचं आहे.. सरकारनं आतातरी फार तांत्रिक गोष्टींचा बाऊ न करता पंढरीनाथ सावंत यांना पेन्शन सुरू करून आमचं सरकार संवेदनशील आहे हे दाखवून द्यावं एवढीच अपेक्षा…

एस.एम देशमुख




