34 C
Pune
Friday, February 13, 2026
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*एका रुपयांचाही खर्च न करता ५ हजार ५०० रोपांची निर्मिती*

*एका रुपयांचाही खर्च न करता ५ हजार ५०० रोपांची निर्मिती*

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा दिशादर्शक उपक्रम

२ लाख ७५ हजार रुपयांची झाली बचत

लातूर.. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एका रुपयांचाही खर्च न करता तब्बल ५ हजार ५०० रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद प्रशासन शाखेचे सहआयुक्त रामदास कोकरे यांनी आपल्या कार्यालयातील सहकार्‍यांच्या मदतीने हा उपक्रम राबविला आहे. लातूर जिल्ह्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरत आहे. तब्बल किमान २ लाख ७५ हजार रुपयांची बचत यामुळे झाली आहे.
शासनाच्या वतीने ‘हर घर नर्सरी’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक कुटूंबाने ५० रोपांची निर्मिती करावी त्याचप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयाने ५ हजार रोपांची निर्मिती करावी असे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले होते. रोप निर्मिती कशी करायची, लोकसहभाग कसा घ्यावा या संदर्भात विचार विनिमय करण्यात येत होता. नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्त रामदास कोकरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.


द लातूर संस्कृती फाऊंडेशन आणि सह्याद्री देवराईचे सुपर्ण जगताप, शिवशंकर चापुले, पत्रकार अभय मिरजकर, दिपरत्न निलंगेकर, डॉ. दत्तात्रय झगडावे, राम माने आणि त्यांच्या सहकार्‍यांनी बीज संकलन मोहीम राबविली. त्यामध्ये शासनाच्या वतीने नगर पालिका प्रशासनाने सहभाग घेतला. सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज चव्हाण, नगर पंचायत मुख्याधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. साडेतीन लाख बियांचे संकलन करण्यात आले होते.
आपण इतरांना सांगायचं पण त्या अगोदर आपण नर्सरी तयार करून रोप निर्मिती करायचे असे ठरवले. रोप तयार करण्यासाठी दुधाच्या पिशव्या वापरण्यात आल्या. चाकूर नगर पंचायतीने कचर्‍यात आलेल्या पिशव्या वेगळ्या काढून दिल्या. लातूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने या पिशव्या मध्ये माती भरण्याचे काम करून घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या बागेत रोप निर्मिती सुरू करण्यात आली. ५ हजार ५०० पठडी चिंचेची रोपे तयार करण्यात आली आहेत. बी रोपण आणि त्याची देखभाल करण्याची जबाबदारी सहआयुक्त रामदास कोकरे आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांनी उचलली.


कार्यालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी एक – दीड तास आणि कार्यालयीन कामकाज बंद झाल्यानंतर एक – दीड तास असे सर्वांनी श्रमदान स्वेच्छेने केले. वन विभागाचे महेश पवार यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यालयातील कर्मचारी नितीन ढोणे, अनिल कुरे, बालाजी कोळी, विनोद साखरे, तोहसिफ शेख, संग्राम सूर्यवंशी, सुहास देशमुख आणि इतरांनाही काम केले आहे.
बाजारातील नर्सरी मधून रोपे खरेदी करून वृक्ष लागवड करण्यात आली तर किमान ५० रुपये रोप म्हटले तरी २ लाख ७५ हजार रुपये खर्च करावा लागला असता. पण एका रुपयांचाही खर्च न करता ५५०० रोपांची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीसाठी यांचा उपयोग केला जाणार असल्याचे सह आयुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी रोपे निर्मितीचा हा उपक्रम सर्वांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

सहआयुक्त रामदास कोकरे यांनी आपल्या घरी सुध्दा वेगवेगळ्या प्रकारची ७० रोपे तयार केलेली आहेत. ही रोपेही वृक्षारोपण करण्यासाठी ते देणार आहेत. त्यासोबतच वृक्षसंवर्धन यावरही ते विशेष लक्ष देणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]