‘
लातूर/प्रतिनिधी: ‘सेवांकुर भारत’ लातूरच्या वतीने ‘एक सप्ताह देश के नाम’ हा उपक्रम राबवण्यात येतो.यात सहभागी झालेल्या लातूरच्या विविध वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विवेकानंद रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात आपल्याला आलेले अनुभव कथन केले.
प्रारंभी विवेकानंद रुग्णालयाचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर, सेवांकुर भारतीचे पालक विनोद कुचेरिया यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी डॉ.अरुणा देवधर,डॉ.अभिजित मुगळीकर,डॉ.अमोल डोईफोडे, डॉ.अभिषेक बादाडे,डॉ.अविनाश कोळी,डॉ.आशिष चेपुरे,डॉ.ज्ञानेश्वर पांचाळ,डॉ. संतोष देशपांडे,मनोज निळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. लातूर येथील विविध वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे १२५ विद्यार्थ्यांनी सेवांकुर भारत समूहाच्या वतीने आयोजित OWFN या उपक्रमात सहभाग नोंदवला होता.एक आठवडा परगावी राहणे,तेथील लोकांना जाणून घेणे,त्यांची संस्कृती शिकणे व त्यांना वैद्यकीय सुविधा देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येतो.विद्यार्थ्यांमधील नेतृत्वशैली विकसित करणे हा देखील या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला आलेले हृदयस्पर्शी अनुभव सर्वांसमोर सादर केले.सेवांकुर साठी सर्व श्रोते नवे व अनोळखीच होते.त्यामुळे मागील दोन वर्षात राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. तीन भागांमध्ये हे अनुभव कथन संपन्न झाले.

लातूर येथील संवेदना प्रकल्पाच्या भेटीची माहिती देवांग कुलकर्णी यांनी दिली.पराग टिपरे यांनी विवेकानंद कॅन्सर रुग्णालयाच्या भेटीचे अनुभव सांगितले.दिवाळी फराळ उपक्रमाचे निवेदन विशाल बिराजदार यांनी केले.कल्याणी ताकसांडे,गार्गी मंडन,मोनिका चौधरी यांनीही आपल्याला आलेले अनुभव सर्वांना सांगितले. सेवांकुर भारतच्या एक सप्ताह देश के नाम या उपक्रमाची महाराष्ट्राच्या राज्यपालांनीही दखल घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.दि.२८ मे रोजी राजभवनात असेच अनुभव कथन पार पडल्याची माहिती सिद्धी रुद्रवार यांनी दिली.सेवांकुर भारत लातूर,साठी पालक म्हणून लाभलेले डॉ.राधेश्याम कुलकर्णी यांनी पुढील वाटचालीची माहिती दिली. प्रारंभी अनुष्का गांगरे,ऋषिकेश वैद्य यांनी वैयक्तिक गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन पराग टिपरे व नम्रता गुर्ले यांनी आभार प्रदर्शन केले.देवांग कुलकर्णी यांच्या शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.