लातूर, दि. 01 ( वृत्तसेवा ) : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, लातूरच्या वतीने 1 डिसेंबर2023 रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त काढण्यात आलेल्या एड्स जनजागरण रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली.
आरोग्य सेवाचे उपसंचालक डॉ. अर्चना भोसले, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप एम. ढेले, इनरव्हील क्लबच्या श्रीमती मेघा आग्रोया, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी विपीन बोर्डे यांच्यासह लातूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

‘समाजाचा पुढाकार एचआयव्ही, एड्सचा समूळ नाश’चा नारा देत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून निघालेली जनजागरण रॅली मिनी मार्केट, गांधी चौक, हनुमान चौक, गुळ मार्केट मार्गे गांधी चौक, टाऊन हॉल येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी एचआयव्ही, एड्सबाबत शास्त्रोक्त माहिती देण्यात आली.

रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ढेले यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी रॅलीतील उपस्थितांना एचआयव्ही आणि एड्सचा प्रतिबंध व प्रतिकार करणे, तसेच एचआयव्ही तथा एड्सचे समूळ उच्चाटन करण्याचे आवाहन केले. तसेच आरोग्य सेवाचे उपसंचालक डॉ. भोसले, अधिष्ठाता डॉ. जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
रॅलीमध्ये सोनी नर्सिंग स्कुल, स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, न्यु व्हिजन नर्सिंग स्कूल, वेदांत नर्सिंग कॉलेज, शासकीय नर्सिंग कॉलेज, बाभळगाव, वि.दे. शा.वै. म. नर्सिंग कॉलेज, इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज, श्री भगवान नर्सिंग स्कुल, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, महाराष्ट्र स्कुल अॅन्ड कॉलेज ऑफ नर्सिंग, टीआय प्रकल्प, विहान संस्था तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
एचआयव्हीबाधित मातेकडून बाळाला होणारा संसर्ग टाळण्यासाठी नियमित औषधी, उपचार, तपासणी व नियमित पाठपुरावाअंती 27 बालेक एचआयव्ही निगेटिव्ह झाली आहेत, हे या कार्यक्रमाचे मोठे यश असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी बोलताना सांगितले.