शालेय शिक्षण हाच उच्च शिक्षणाचा पाया, तो मजबूत होण्याची गरज
एमजीएममध्ये आयोजित ‘लीड द एड-फ्यूचर’ परिषदेत तज्ञांची भावना
औरंगाबाद ( प्रतिनिधी) — शालेय शिक्षण हा उच्च शिक्षणाचा पाया असून तो अधिक मजबूत होण्याची गरज आहे. शालेय शिक्षणाच्या बळकटीसाठी उत्तम अध्यापकांसोबतच दर्जेदार संशोधन, नाविन्यता आणि कौशल्य विकासाची गरज आहे, अशी भावना एमजीएममध्ये आयोजित ‘लीड द एड-फ्यूचर’ परिषदेत तज्ञांनी व्यक्त केली.
महात्मा गांधी मिशनच्या एमजीएम एज्युकेशन अनलिमिटेड या प्रशिक्षण विभागाने एमजीएम विद्यापीठाच्या सहकार्याने ‘लीड द एड-फ्युचर’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला मंगळवारी सुरुवात झाली. उदघाटन सत्राला महात्मा गांधी मिशनचे सचिव आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, मुंबईच्या द श्रीराम यूनिव्हर्सल स्कूलच्या प्राचार्य राधिका श्रीनिवासन, स्किल अँड आंत्रप्रिनरशीप यूनिव्हर्सिटी दिल्लीच्या संस्थापक कुलगुरू आयआयएम अहमदाबाद येथील प्रा. निहारिका वोहरा, पुणे येथील शिक्षांगण एज्युकेशन इनिशिएटीव्हचे संचालक विजय गुप्ता आणि देविका नाडीग, शैक्षणिक सल्लागार डॉ.विजयम रवी, ‘लीड द एड-फ्युचर’चे अध्यक्ष रणजित कक्कड, डॉ. गिरीश गाडेकर, एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, डॉ. सारिका गाडेकर, संयोजिका डॉ. अपर्णा कक्कड, नम्रता जाजू आदींची उपस्थिती होती.

उद्घाटन सत्रात डॉ. विलास सपकाळ यांनी ‘शालेय आणि उच्च शिक्षणाचे एकत्रिकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, उच्च शिक्षणाची संपूर्ण मदार शालेय शिक्षणावरच असते. त्यामुळे या दोन्हींची सांगड असणे फार महत्वाची असते. सध्या शिकण्याचा अधोगामी प्रवाह आहे. जो उत्तम अध्ययनार्थी असतो तोच उत्तम अध्यापक बनू शकतो. आपण केवळ नव्या शिक्षणासाठी सज्ज नसतो तर विविध शिक्षणाची सांगड घालण्याचा आपला प्रयत्न असायला हवा. विद्यापीठ स्तरावर संशोधन हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा भाग असतो. शालेय स्तरावर संशोधन याच प्रक्रियेचा भाग होण्याची गरज आहे. शिक्षकांनी समस्यांचे निराकरनाची चर्चा करायला हवी. केवळ प्रश्नांची चर्चा नको तर त्या प्रश्नाच्या उत्तरावरही चर्चा व्हायला हवी. शालेय शिक्षणातील 23 कोटी विद्यार्थ्यांपैकी केवळ 4 कोटी विद्यार्थी उच्च शिक्षणात येतात. सध्याची युवा पिढी त्यांच्या क्षमतेच्या अत्युच्च स्तरावर आहे. ही पिढी कोडिंगपासून अनेक तंत्रज्ञान सहज हाताळते. शालेय आणि उच्च शिक्षणाची योग्य सांगड असल्यास शिक्षणाचा प्रवाह आणि दर्जा दोन्हीही उंचावेल, असा आशावादही डॉ. विलास सपकाळ यांनी यावेळी व्यक्त केला.

कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, शालेय आणि उच्च शिक्षणाच्या एकत्रीकरणाची फार गरज आहे. शिक्षण नेमके कुठून सुरू होते आणि कुठे संपते हा चिंतनाचा विषय आहे. आमचे आजोबा-पणजोबा शेतात जाताना आम्हाला सोबत घेऊन जायचे. त्यावेळी त्यांच्या आणि आमच्या हातात साखरेची वाटी असायची. ती साखर आम्ही वारुळातील मुंग्यांना खाऊ घालायचो. तेव्हा आजोबा म्हणायचे, ‘खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये, पाहिले ते मागू नये’, तेव्हा याचा अर्थ कळायचा नाही. पण आता जाणवते की ते बालपणीचे शिक्षण होते. आपल्या पूर्वजांना सोडून, त्यांचे विचार सोडून आपण शिक्षणाची प्रक्रिया सुरूच करू शकत नाही. भगवान बुद्ध प्रवचन करत असताना एका वृद्धेने प्रश्न केला की, तुम्ही खूप मोठमोठ्या गोष्टी करता मला तीन शब्दात धम्म सांगू शकता का. त्यावर बुद्ध म्हणाले, आपल्या वाणीने, शरीराने कुणाला दुःख देऊ नये, आपल्या वाणीने आणि शरीराने दुसऱ्याला सुख देऊ शकत असलो तर द्यावे, आपल्या मनात पापाचे काही अंकुर निर्माण झाल्यास ते नष्ट करावे. भगवान बुद्धांनी दिलेली ही शिकवण आपण सोबत ठेवायला हवी.

‘मुलांसाठी आवश्यक कौशल्ये’ या विषयावर डॉ. निहारिका वोहरा यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, उच्च शिक्षणात अनेक विविधांगी प्रवाह आहेत. सध्या अनेक युवक अत्यंत कमी वेळेत स्पर्धेचा त्याग करू पाहत आहेत. एक विद्यार्थी सीबीएसई, जेईई टॉपर विद्यार्थी आयआयमला आला. मी त्याला एक सामाजिक समस्या सांगण्यास सांगितले पण त्याला सांगता आली नाही. इतका दर्जेदार आणि गुणवंत असूनही त्याला सामाजिक जाण नसणे, हा मोठा विरोधाभास आहे. आपण अत्यंत हुशार विद्यार्थी घडवतो पण त्यांचा काहीच सामाजिक संबंध नसणे, ही शोकांतिका आहे. यश हवे असल्यास बुध्यांक, सृजनशीलता, उत्सुकता, संवाद, सहकार्य, क्रिटिकल थिंकिंग, कठीण समस्या सोडवण्याचे कौशल्य अंगभूत असायला हवे. असर आणि पिसरच्या अहवालानुसार बालकांच्या शिक्षणाबाबत भारताची स्थिती ही अत्यंत दयनीय आहे आणि याचा आपण विचार करायला हवा. 86 हजार रोजगाराच्या जबाबदाऱ्या आगामी 5 वर्षांत नष्ट होऊन जातील. त्यामुळे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 2020 या वर्षी निर्धारित केलेल्या कौशल्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. शिक्षांगण एज्युकेशन इनिशिएटीव्हचे विजय गुप्ता यांनी ‘उच्च कामगिरी करणाऱ्या शाळेचा विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी शाळेच्या विकासात येणारे अडथळे आणि त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांच्या बाबतीत विविध उदाहरणांमधून मांडणी केली.

सकाळच्या सत्रात ‘आपण भविष्यासाठी तयार आहोत का’ या विषयावर चर्चासत्र झाले. यात डॉ. निहारिका वोहरा, डॉ. विलास सपकाळ, डॉ. देविका नाडीग आणि विजय गुप्ता यांनी सहभाग नोंदवला. डॉ. विजयम रवी यांनी या चर्चासत्रात संवादकाची भुमिका निभावली. बदलत्या शिक्षण प्रवाहात, शिक्षकांनी देखील पारंपारिकता सोडून आधुनिकीकरणाकडे वळायला हवे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या सामाजिक जाणिवाही वाढवायला हव्यात. असा सूर या चर्चासत्रात निघाला.
दुपारच्या सत्रात ‘फ्रॉम बीईंग गूड टू बिकमिंग ग्रेट’ या विषयावर चर्चासत्र पार पडले. यात शैक्षणिक सल्लागार डॉ. विजयम रवी, शिक्षांगणचे संचालक विजय गुप्ता, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांचा सहभाग होता. फिलिंग माईंड्सच्या संचालिक डॉ. चिनू अग्रवाल या चर्चासत्राच्या संवादक होत्या. परिषदेचे अध्यक्ष रणजित कक्कड आणि संयोजिका नम्रता जाजू यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आशा कोरांगा यांनी केले. १० आणि ११ जानेवारी रोजी एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात ही परिषद होत असून यात विविध विद्याशाखांचे शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक, व्यवस्थापक, विश्वस्त, संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची उपस्थिती होती.
बुधवारी जागतिक बिलियर्ड्सपटू गीत सेठी, किरण बीर सेठी यांचे मार्गदर्शन
दि. 11 जानेवारी 2023, बुधवार रोजी द रिव्हरसाईड स्कूल अहमदाबादच्या संचालिका किरण बीर सेठी यांचे ‘सीडिंग स्कूल कल्चर’ या विषयावर तर जागतिक बिलियर्ड्सपटू आणि ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टचे सहसंस्थापक गीत सेठी यांचे ‘लीडरशीप लेसन्स फॉर इन्स्पिरेशन अँड अॅक्शन’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. त्यानंतर ‘आर वेल बिईंग अँड सक्सेस लिंक्ड’ या विषयावर चर्चासत्र होईल. यात किरण बीर सेठी, गीत सेठी, डॉ. चिनू अग्रवाल, हेमंत महाजन यांचा सहभाग राहील. देविका नाडीग या चर्चासत्राच्या संवादिका आहेत. दुपारी ४ वाजता समारोपीय कार्यक्रम होईल.




