लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जिल्ह्यात जिवीतहानी होऊ नये याकरीता सर्तक रहावे
लातूर/प्रतिनिधीः- जिल्ह्यात यापुर्वीच पावसाने वार्षीक सरासरी ओलांडलेली आहे तर गेल्या कांही दिवसात जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झालेली आहे. आगामी दोन दिवस पुन्हा जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पाणी-पाणी झालेले असून शेतकर्यांची शेतीपिके हातातून गेलेली असून इतर नुकसानही मोठ्या प्रमाणात झालेले आहे. ही बाब लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत द्यावी अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. तसेच जिल्ह्यात जिवीतहानी होऊ नये याकरीता सर्वांनी सर्तक राहून लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
लातूर जिल्ह्यात दरवर्षीपेक्षा अधिकचा पाऊस पडलेला आहे.यापुर्वीच पावसाने आपली वार्षीक सरासरी ओलांडलेली आहे तर गेल्या कांही दिवसात जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी होऊन शेतकर्यांसह अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सोयाबीनसह अनेक पिके वाहून गेलेली आहेत तर कांही पिके पाण्याखाली आहेत. कांही शेतकर्यांच्या तर जमिनीसुद्धा खरडुन गेलेल्या आहेत. अतिवृष्टी झाल्याने मांजरा धरणासह जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प तुंडूंब भरलेली आहेत. यामुळे नदीद्वारे पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या शेती जमिनींसह गावांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आता पुन्हा आगामी दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. यापुर्वी झालेला पाऊस, नदीपात्रातून सोडलेले पाणी आणि आता पुन्हा होणारी अतिवृष्टी यामुळे जिल्ह्यात पाणी-पाणीच झालेले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे.
अतिवृष्टी आणि जवळपास 70 टक्क्यापेक्षा शेतकर्यांचे झालेले अधिकचे नुकसान या कारणाने शासनाने आता पंचनामा करण्याची गरज नसून शेतकर्यांना सरसकट मदत द्यावी या मागणीचा पुन्हा एकदा आ. निलंगेकरांनी उल्लेख केलेला आहे. आगामी दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचे सांगण्यात आल्याने जिल्ह्यातील प्रत्येकांने काळजी घ्यावे असे आवाहन करत नागरीकांच्या मदतीसाठी प्रशासन सज्ज असून आवश्यक असणारी यंत्रणा तैनात असल्याचे आ. निलंगेकरांने यावेळी सांगिलेले आहे. पुर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनासोबत चर्चा करून आवश्यक असणारी आपत्तकालीन बचाव यंत्रणेचे पथक व बचावासाठी हेलीकॉप्टरची यंत्रणाही प्रशासनाकडून सज्ज ठेवण्यात आलेली आहे. प्रशासनाने नागरीकांसाठी ज्या सुचना दिलेल्या आहेत त्याचे पालन करून सहकार्य करावे आणि या परिस्थितीत नागरीकांच्या मदतीसाठी लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्तकता बाळगत जिल्ह्यात जिवीतहानी होणार नाही व आवश्यक मदतीसाठी सज्ज रहावे असे आवाहन आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.











