तुफान पाऊस असतानाही शेकडो पुणेस्थित औसेकरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
पुणे ;(वृत्तसेवा )- २८ जुलै रोजी पुण्यातील हडपसर येथे आमदार अभिमन्यू पवार यांचा पुणेस्थित औसेकरांसोबत आणि लातूरकरांसोबत संवाद आपुलकीचा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पुणेस्थित लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने सभागृह हॉउसफ़ुल्ल झाल्याने काही जणांना बाहेर लागलेल्या स्क्रीनवर कार्यक्रम पाहावा लागला.
बेलकुंड – चिंचोली सोन भागात २५० हेक्टरची एमआयडीसी मंजूर करून आणली असून ती लातूर जिल्ह्यातील लातूरनंतरची सर्वात मोठी एमआयडीसी ठरणार आहे. बेलकुंड एमआयडीसीला चिकटून नागपूर – औसा – रत्नागिरी हा महामार्ग जातो, २५ किमी अंतरावर रेल्वेस्थानक येणार आहे, माकणी धरणात बेलकुंड एमआयडीसीसाठी ३ एमएलडी पाणी आपण आरक्षित करत आहोत आणि ४०० केव्हीचा मोठा ऊर्जा प्रकल्प बेलकुंड येथे प्रस्तावित केला आहे. वीज, पाणी, राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी लाभल्यामुळे बेलकुंड – चिंचोली सोन एमआयडीसी ही उद्योजकांच्या पसंतीक्रमात येईल, मी काही मोठ्या उत्पादक उद्योगांशी संपर्क साधल्याचे आ पवारांनी सांगून बेलकुंड एमआयडीसी तयार झाल्यानंतर तिथे १२ ते १५ हजार रोजगार निर्मिती होऊ शकेल असे मोठे प्रकल्प आणणार असल्याची माहिती आ पवार यांनी यावेळी दिली.

पुणेस्थित औसेकरांशी संवाद साधताना आ अभिमन्यू पवार यांनी कोरोना काळात त्यांनी ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांना तत्परतेनं कशी मदत केली याचे काही अनुभव सांगितले. कोरोनाकाळात लॉकडाउनमुळे वर्ध्यातील एक तरुण हिमाचल प्रदेशात अडकून पडला होता. तर मूळ गावी घरी त्यांची गरोदर पत्नी आणि वृद्ध आई वडील आधार नसलेल्या परिस्थितीत अडकले होते. थेट हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्या तरुणाला कशा पद्धतीने मूळ गावी परत आणले याचा आ पवार यांनी सांगितलेला अनुभव त्यांच्या नेतृत्वाची उंची दर्शवणारा ठरला. प्रसूतीसाठी गोव्याला जाऊन लॉकडाउनमुळे तिथं अडकलेल्या लातूरच्या बाळ बाळंतिणीची केलेली सुटका, इंदापूरजवळील चेकपोस्टवर आडरानात अडकून पडलेल्या एका गरोदर महिलेची आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या त्या महिलेच्या सासऱ्याची केलेली सुटका, कराड, जुन्नर येथे अडकलेल्या सामान्य कामगारांना केलेली मदत, गुजरातमध्ये अडकून पडलेल्या गोंद्रीच्या १० ट्रक ड्रायव्हर्सना केलेली मदत हे सर्व अनुभव पुणेस्थित औसेकरांच्या मनाला शिवून गेले.

२५ जुलैच्या कार्यक्रमाला रेड अलर्टमधेही शेकडो औसेकरांची उपस्थिती
२५ जुलै रोजी अंकुशराव लांडगे सभागृहात आ पवार यांचा पिंपरी चिंचवडस्थित लातूरकरांसोबत संवाद आपुलकीचा हा कार्यक्रम पार पडला.२४ आणि २५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि आजूबाजूच्या धरणांमधून झालेल्या अतिविसर्गामुळे पुण्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. शाळा, आस्थापने बंद करण्यात आली होती. तशा विपरीत परिस्थितीतही पिंपरी चिंचवड, भोसरी आणि चाकण भागातील शेकडो लातूरकरांनी आ पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती…




