सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित जी. ए. कुलकर्णी जन्मशताब्दी वर्षाची सांगता : कथा अभिवाचन कार्यक्रमात लातूरकर मंत्रमुग्ध
लातूर :
जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांचे मराठी साहित्य विश्वात वेगळे स्थान आहे. त्यांच्या कथांतून माणसाचे सखोल व गूढ मनोविश्व शब्दांकित केलेले आढळते; तसेच नियतीने केलेल्या विचित्र व क्रूर संयोजनाची अकल्पित कहाणी असे. विशेष म्हणजे, रहस्यमयता, गूढता असूनही त्यांची तात्विक बैठक अत्युच्च पातळीची असे व भाषालालित्याचे एक वेगळेच समृद्ध भांडार असे. त्यामुळेच जीएंच्या साहित्याचे स्थान मराठी भाषेला वेगळे वळण देणारे ठरते व त्यांचे दालन वैशिष्ट्यपूर्ण ठरते. १० जुलै, १९२३ साली जन्मलेल्या जीएंचे हे जन्मशताब्दी वर्ष त्यांच्या रसिकजनांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरे करून मराठी भाषेतील हा अमोल ठेवा पुनरुज्जीवित केला.

लातूर शहरात सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानच्या ‘साहित्यविशेष’ या उपक्रमांतर्गत जीएंच्या निवडक कथांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम अनेक भागांत आयोजित करण्यात आला. त्यांपैकी तिसऱ्या भागात दि. ९ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता या कार्यक्रमाच्या ‘मत्स्यकन्या’ व ‘वीज’ या कथांचे अभिवाचन करण्यात आले. या कथांची निवड, संगीत नियोजन व दिग्दर्शन प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी केले व त्यांच्यासह अपर्णा गोवंडे, दस्तगीर शेख, कौस्तुभ जोशी, महेश दास्ताने, सुवर्णा बुरांडे, प्रा. अरुणा देशपांडे व डॉ. अनघा राजपूत या कलावंतांनी हे अभिवाचन साकारले. या अभिवाचनाने रसिकांची मने अक्षरश: जिंकली. या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे समन्वयक प्रा. मनोहर कबाडे, प्रा. डॉ. सौ. संपदा कुलकर्णी-गिरगावकर, पुरुषोत्तम भांगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास अजय पांडे, शिरीष पोफळे, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. वर्षा पाटील, प्रा. सुचित्रा वाघमारे, शिरीष कुलकर्णी, संतोष गांधी, वृषाली पाटील, जितेंद्र पाटील, अभिषेक बुचके, रोहन महिंद्रकर, भारत थोरात व मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य बाळकृष्ण धायगुडे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर कलावंत, रंगकर्मी, साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिवाचनाचे थेट प्रसारणही समाजमाध्यमावरून करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा असंख्य रसिकांना लाभ घेता आला. या उपक्रमास रसिकांनी वाढत्या संख्येने प्रतिसाद दिला व जीएंच्या साहित्याचा लातूरकरांना अक्षरश: लळा लावला. अभिवाचनाच्या आगळ्यावेगळ्या शैलीचाही परिचय त्यानिमित्ताने लातूरकरांना अनुभवता आला.