कोरोनाच्या बिकट काळात जेव्हा सर्व जग थांबले होते, समाजात भीतीचे व नकारात्मक वातावरण निर्माण झाले अशा बिकट परिस्थितीत सकारात्मक विचारांची एक ज्योत लावली गेली, ज्याची आज तेजस्वी मशाल निर्माण झाली आहे. एक बी रोवले गेले व आज त्याचा वटवृक्ष होत आहे.
अर्थात हे परिवर्तन एका दिवसात नाही झाले. ते झाले अथक प्रयत्नातून, चिकाटीतून,जिद्दीतुन व प्रामाणिक कामातून.
तुम्ही विचार करत असाल ना मी कोणाबद्दल बोलत आहे ? अहो,मी बोलतेय आपल्या साहित्यिक, सामाजिक कुटुंबाबद्दल. आपल्या सर्वांच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या न्युज स्टोरी टुडे पोर्टल बद्दल.
या पोर्टलचे बी रोवले देवश्रीने व आज त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होत आहे,ते या पोर्टल चे संपादक, निवृत्त माहिती संचालक देवेंद्रजी भुजबळ व त्यांना बरोबरीने साथ देण्याऱ्या, त्यांच्या पत्नी न्युज स्टोरी टुडे च्या निर्मात्या सौ अलकाताई भुजबळ यांच्यामुळे. अतिशय आनंदी व उत्साही व्यक्तिमत्व लाभलेली ही जोडी, यांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच.
“निवृत्ती म्हणजे निष्क्रियता नाही” याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे दोघे. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण देणे लागतो. विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे.बुद्धीला चालना मिळाली पाहिजे व रोज काही तरी नवीन शिकले पाहिजे, केले पाहिजे असे मानणारे हे कुटूंब आहे.
वय केवळ एक आकडा आहे. मनुष्य जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत त्याने सतत काम केले पाहिजे. शिवाय आवडीचे काम केल्यामुळे एकटेपणा जाणवत नाही व आजूबाजूच्या वातावरणात देखील सकारात्मतक ऊर्जा निर्माण होते, जी अशक्य ते देखील शक्य करण्याचे सामर्थ्य देते. रोज आठ दहा तास न दमता व थकता ही जोडी काम करीत असते. आणि त्याचेच फळ म्हणून न्युज स्टोरी टुडे ची एक आंतराष्ट्रीय दर्जाचे पोर्टल म्हणून ओळख निर्माण झाली आहे. आज हे पोर्टल ८६ देशात पोहोचले असून पोर्टलचे जवळपास पाच लाख व्ह्यूज आहेत. कमी वेळात हे यश प्राप्त झाले,ते केवळ आणि केवळ या कुटुंबाच्या आधुनिक विचारसरणी मुळे, नाविन्याचा ध्यास घेतल्यामुळेच.विशेष म्हणजे या जोडीला कोणताही गर्व अथवा अहंकार नाही. नम्रपणा हे त्यांच्या स्वभावातील आभूषण आहे.यामुळेच ते कमी वेळात अनेकांशी जोडले गेले आहेत.
आज न्यूज स्टोरी टुडे या पोर्टल ने प्रकाशन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.हे एक मोठे यश तर आहेच पण त्याच बरोबर न्युज स्टोरी टुडे पोर्टल ला उत्कृष्ट वेबपोर्टल म्हणून
“चौथा स्तंभ” हा पत्रकारितेतील अत्यंत सन्मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
मा. मुख्यमंत्री,
उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते येत्या पत्रकार दिनी, ६ जानेवारी रोजी हा पुरस्कार मुंबईत प्रदान करण्यात येत आहे. आम्हा सर्व कुटुंबासाठी अतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. सर्व भुजबळ कुटुंबाच्या प्रामाणिक कष्टाची ही जणू पोचपावती आहे.
न्युज स्टोरी टुडे या कुटुंबाशी आमचे ऋणानुबंध गेल्या दोन वर्षांपासून आहे. हे दिवस वाऱ्यासारखे गेले. हे आमचे एक साहित्यिक कुटुंब आहे. ज्यामुळे आम्हाला एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. एक लेखक अथवा कवी म्हणून अनेकांना संधी मिळून समाजात एक वेगळी ओळख निर्माण झाली. खऱ्या अर्थाने आमच्या कलागुणांना वाव मिळाला,न्याय मिळाला.
न्युज स्टोरी टुडे या पोर्टल मुळे वाचकांना देखील उत्तम मेजवानी मिळत असते. घरात बसून विविध गोष्टीची माहिती मिळते. ज्ञानात भर पडते. विशेष म्हणजे अनेक नवनवीन सदरे प्रकाशित करून पोर्टल ला वेगळी झळाळी प्राप्त होत आली आहे.
माझे मार्गदर्शक मा. देवेंद्र भुजबळ सर व सौ अलकाताई भुजबळ, ज्या माझी मोठी बहीण, एक मैत्रीण म्हणून वेळोवेळी सहकार्य करीत आहेत,अशा या दोघांना माझा मानाचा मुजरा,त्यांच्या कामाला सलाम. या पोर्टलने अशीच उंच भरारी घेत राहो हीच एक हितचिंतक,एक लेखिका, कुटुंबाची एक सदस्य म्हणून सदिच्छा व्यक्त करते .
पोर्टलच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा.
लेखिका:रश्मी हेडे.
सातारा.
☎️9869484800