*नव्या फुलांचे रंगही घेशील*
अशी प्रफुल्ल हसरी सुमने
अशी टवटवीत राखून मने
जगणे लोभस गोजिरवाणे
आयुष्याला गंधित करणे
ह्या उद्यानी लक्ष वेधती
नव्याच कोमलशा फुलजाती
आकाराने विशाल पुष्पे
परी नाजूकता अंगोपांगी
रंग गुलाबी फिकट कोवळा
अंतर्भागी बघ मधुशाला
गुंजन करुनी मधूप्राशनी
भृंगही जमती आनंदानी
तुझ्या आतल्या अशा गोडव्या
दे पसरवूनि गुणी रे सख्या
मुक्तपणे तो मध चाखू दे
जगणे तुझे ते जगता निरखू दे
फिटो डोळ्यांचे जसे पारणे
उसंत मिळू दे अंतःकरणे
बाग फुलू दे वाऱ्या झुलू दे
फूलपाखरे गुलगुलू करू दे
मग शेवटी स्वतःला पहा
चित्र देखणे जे झाले अहा
तनमन हलके आत्मा हलका
क्षणक्षण तुझाच होई बोलका
असे कृतार्थ ते जगणे पाहून
रुजण्या मातीमध्ये जाऊन
पुन्हा उमलशील बहरून येशील
नव्या फुलांचे रंगही घेशील
रचना©डॉ.मंजूषा कुलकर्णी
दि.०५/०७/२१
( कवयित्री या सध्या मंत्रालयात कार्यरत आहेत)