*स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसचा भर पावसात लातूरात निघाला ‘लोकशाही वाचवा मशाल मोर्चा’*
*विरोधी पक्ष नेते खा. राहूल गांधी यांनी उपस्थित केलेला मत चोरी चा मुद्दा मशाल मोर्चेच्या माध्यतातून जनतेपर्यंत पोहचवणार*
लातूर (प्रतिनिधी) : –स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस पक्षाच्या वतीने लातूरमध्ये भर पावसामध्ये लोकशाही वाचवा मशाल मोर्चा काढण्यात आला .या मशाल मोर्चा चांगला प्रतिसाद मिळाला. मत चोरीचा मुद्दा मशाल मोर्च्याच्या माध्जयमातून जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांनी ‘मतचोरी’ कशी केली, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घेटाळे उजेडात आणले. काँग्रेस पक्षाने हा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या सूचनेनुसार राज्याचे माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार अमित देशमुख,खा. डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके व लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या नेतृत्वात लातूर शहरातील आदर्श कॉलनी गेट ते राजीव गांधी चौक असा भव्य ‘लोकशाही वाचवा मशाल मोर्चा’ काढला.
भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून, निवडणूक आयोगाच्या मदतीने, मतदार यादीमध्ये घोटाळे करून, मतचोरी करून, गैरमार्गाने सता मिळवलेली आहे. याबाबत खा. राहूल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने लढा देत आहे. सत्ताधाऱ्यांनी मतचोरी करून गैरमार्गाने सता मिळविणे हा विषय केवळ राजकीय नसून सर्वसामान्य मतदारांनी केलेल्या मतदानाचा अपमान करणारा आहे. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे करण्यात आले याची जाणीव आता सर्वसामान्य मतदारांनाही झालेली आहे. यामुळे नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल रोष पहावयास मिळत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी, जनतेच्या मतदानाचा मान राखण्यासाठी आणि गैरप्रकाराविरुध्द आवाज उठवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने लातूरशहरात ‘लोकशाही वाचवा मशाल मोर्चा‘ काढण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके व शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी सांगीतले.

मशाल मोर्चाला सुरुवात झाल्या बरोबर मोठ्या पावसास सुरुवात झाली. धो-धो पडणाऱ्या पावसात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मतदान चोर, खुर्ची सोड, लोकशाही वाचवा देश वाचवा अशा घोषणा देत परिसर दणाणुन सोडला. आदर्श कॉलनी येथून निघालेल्या मशाल मोर्चाची सांगता राजीव गांधी चौक याठीकाणी करण्यात आली. मशाल मार्चात लातूर शहर व जिल्हयातील काँग्रेस सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उत्सुफर्त सहभाग घेतला.