नागेश शेवाळकर लिखित *समूदादा* या बालकादंबरीचे २६ रोजी पुणे येथे प्रकाशन!
पुणे:- सुप्रसिद्ध लेखक नागेश सू. शेवाळकर यांनी लिहिलेल्या आणि चपराक प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशनासाठी सिद्ध केलेल्या ‘समूदादा’ या बालकादंबरीचे प्रकाशन सोमवार २६ जुलै दुपारी बारा वाजता चपराक कार्यालय, पुणे येथे होत आहे.
बालकांचे समृद्ध अनुभव शब्दांकित केलेल्या समूदादा या बालकादंबरीचे आकर्षक मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी चितारले असून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संशोधक, साहित्यिक संजय सोनवणे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविणार असून ज्येष्ठ लेखक, समीक्षक अरुण कमळापूरकर ह्यांच्या हस्ते कादंबरीचे प्रकाशन होणार आहे. या हृद्य कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक विनोद पंचभाई, रवींद्र कामठे, जयंत कुलकर्णी, सुप्रसिद्ध लेखिका चंद्रलेखा बेलसरे ह्या उपस्थित राहणार आहेत. समूदादा या कादंबरीचा परिचय अरुण कमलापूरकर हे करुन देणार आहेत.
हा सोहळा फेसबुकवर प्रसारित होणार असून याच कार्यक्रमात रिधान पांडे पुणे, रामांश पांडे हैद्राबाद(तेलंगणा), ग्रीष्मा वसेकर, पुणे, इरा व्यवहारे, पुणे, शारवी मुळे भोपाळ (मध्यप्रदेश), सौरीश देशमुख आणि अवनीश देशमुख (सिल्वासा, दमन), समर्थ तांबडे औरंगाबाद, यथार्थ गोस्वामी पुणे, आमोद मुळे अकोला ही बच्चे कंपनी समूदादा कादंबरीचे ऑनलाईन प्रकाशन करणार आहेत. फेसबुकवर होणाऱ्या या ऑनलाईन प्रकाशन समारंभाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन घनश्याम पाटील, संपादक, लेखक आणि प्रकाशक चपराक प्रकाशन पुणे यांनी केले आहे.











