काव्य संग्रहाचे प्रकाशन

0
224

संवेदना काव्यसंग्रहातील कविता सामाजिक भान जागृतीच्या.
प्रा.डॉ. जयद्रथ जाधव

लातूर: कोरोना महामारीत संपूर्ण जग ठप्प झाले आहे.व्यवसाय आणि उद्योग धंदे बंद झाल्यामुळे सर्वसामान्य माणसांसमोर जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत, म्हणून कामगार वर्ग अनवाणी पायाने हजारो किलोमीटरचा प्रवास करत गावाकडे जातो,पण हक्काचे गावही या कामगारांना गावात प्रवेश देत नाही. या विषाणुने माणूस माणसापासून तोडला आहे.अशा माणुसकी शुन्य घटनाप्रसंगाचा काव्यालेख सौ.उषा किशनराव भोसले यांनी अत्यंत संवेदनशील अंतःकरणाने ” संवेदना ” या काव्यसंग्रहातून घेतला आहे.या सर्व कविता कोरोना काळातील जगन्याला वास्तवासह शब्दबद्ध करतात असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी काढले आहेत.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरच्या वतीने सौ.उषा भोसले यांच्या “संवेदना” काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ नुकताच नक्षत्र हॉल बार्शी रोड लातूर येथे संपन्न झाला.
या प्रकाशन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.जयद्रथ जाधव, लोकनेते विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख,प्रा.नयन राजमाने, प्रसिद्ध स्री रोग तज्ज्ञ डॉ.सुरेखा निलंगेकर, संस्कार प्रकाशनाचे श्रीमान ओमप्रकाशजी जाधव, डॉ.निसाले साहेब व संग्राम भोसले उपस्थित होते.


या प्रसंगी संवेदना काव्य संग्रहावर प्रा.नयन राजमाने यांनी भाष्य केलें.कोविड १९ च्या कालावधीत उत्पन्न परिस्थितीला कवयित्री सौ.उषा भोसले यांनी शब्दबद्ध केले आहे.या कवितेने सामान्य माणसांच्या जीवनातील परीवर्तन संवेदनशील मनाने टीपले आहे. कोरोना विषाणुची विध्वंसक परिणामकारकता अनेक कवितांच्या उदाहरणातून स्पष्ट केली. “कोविड माजला “, “यक्षप्रश्न” ,”कोरोना भूत”,”दुष्ट कोविड”,”वैरी कोरोना” अशा अनेक कवितांचे भावविश्व त्यांनी उलगडून दाखविले.
या प्रसंगी डॉ.जयद्रथ जाधव विचार मांडताना म्हणाले की, संवेदना काव्य संग्रहातील कविता या सामाजिक भान जागृत करणा-या कविता आहेत.या सामाजिक महामारीकडे कवयित्री सौ.उषा भोसले अत्यंत संवेदनशील अंतःकरणाने पाहतात.मराठी साहित्याने वेळोवेळी निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्न विषयी साहित्यातून समाजभान जागृत केले आहे.प्लेग, दुष्काळ, रोगराई, युद्ध आणि नैसर्गिक आपत्ती तर राजकीय, सामाजिक प्रश्न विषयी साहित्यिकांनी आवाज उठवला आहे.साहित्य हे नेहमी सामान्य माणसांच्या जाणिवांना लक्ष करते.ती साहित्याची खरी जबाबदारी आहे.अशा काळातील साहित्य हे समाज इतिहासाची सामुग्री असते.म्हणून सौ.उषा भोसले यांची ही कविता सुध्दा एक समाज इतिहासाची सामुग्री आहे.या कवितेने कोविड योध्दे डॉक्टर,नर्स, पोलिस, पत्रकार, सफाई कामगार,शासन- प्रशासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.ही कविता खरोखर संवेदनशील अंतःकरणाची असून स्वतंत्र वळनाची आहे.सहज साध्या भाषेत संवाद साधत जीवन चिंतन व्यक्त करते.भरकटलेल्या मनुष्याला ही कविता मागे वळून पहायला शिकवते.
या प्रसंगी डॉ.सुधीर देशमुख यांनी सौ.उषा भोसले यांच्या कवितेने समाज जागृतीचे मोठे काम केले आहे. डॉक्टरांची लोकजागृतीची जबाबदारी ख-या अर्थाने त्यांनी पार पाडली आहे, असे गौरवोद्गार काढले.तर डॉ.सुरेखा निलंगेकर यांनी संवेदना काव्य संग्रहाची पाठराखण केली आहे.उत्तमतेने काव्याचा आशय उलगडून दाखविला आहे.
या प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक कवयित्री सौ.उषा भोसले यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम प्रकारे कवयित्री सौ.शैलजा कारंडे यांनी तर कार्यक्रमाचे आभार डॉ.किशनराव भोसले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here