माझे आजोबा सांगायचे की त्यांचे वडील दुपारी उशिरा जेवायचे. गावात कोणी अतिथी आलेला आहे का हे पाहिले जायचे. आलेला असेल तर त्याचे जेवण खान झाले की नाही याची विचारपूस व्हायची. जेवण झालेले नसेल तर त्या अतिथीचे पोटभर जेवण झाल्यावर आजोबा जेवायचे. अतिथी कुठक्या जातीचा,कुठक्या गावचा, श्रीमंत की गरीब हे प्रश्न कधीच विचारले जायचे नाही. सहज गप्पातून ही सर्व ओळख व्हायची.
गावं मोठी होत गेली. अंबाजोगाई तर भले मोठे शहर झाले. सतत जीविकेसाठी भटकत राहणारे अनेक बांधव काही दिवसांचे पाहुणे म्हणून अंबाजोगाईत येतात. मोकळ्या जागेवर,उघड्यावर आपले पाल ( कापडाची झोपडी ) वसवतात. सोबत बारकी लेकरं.
कुडमुडे जोशी,डवरी गोसावी,नंदीबैलवाले असे अनेक बांधव ठराविक कालावधीसाठी अंबाजोगाईत येऊन राहतात. आता परंपरागत त्यांच्या भिक्षा मागण्यातून प्रपंच काही चालत नाही. एक वेळच्या जेवणाची व्यवस्था फक्त होते. रात्रीची चूल पेटवण्यासाठी त्यांना आता काही कौशल्य शिकून व्यवसाय करावा लागतो. कुडमुडे जोशी चेन दुरुस्तीचे काम करतात. डवरी गोसावी मिक्सर,कुकर आणि गॅस दुरुस्तीचे काम करतात. तर नंदीबैल वाले मुलांच्यासाठीच्या पाळणा खेळाचे काम करतात.
परिस्थिती खूप वाईट असते. पावसाळा झाला की थंडीचा कहर. काल जवळपास 33 घरात जाऊन पाहून आलो. छोटी लेकरं बरीच आजारी पडलेली. थंडी मुळे सर्दी आणि ताप मुख्य. मुलांशी गप्पा मारताना त्यांना सफरचंद खायचे आहे असे त्यांनी सांगितले. थंडीसाठी चादर मिळाली तर खूप बरं होईल म्हणाले.
आपल्या गावातील अतिथीचे थोडे तरी आतिथ्य करायचे ठरवले. 33 घरात एक ब्लँकेट, साबण व खाण्याच्या गोष्टी आणि सर्व मुलांना सफरचंद घेऊन आज गेलो.
ज्ञान प्रबोधिनीचा विद्यार्थी व सध्याचा धाराशिव जिल्ह्याचा समाज कल्याण अधिकारी बलभीम शिंदे यांची स्वतःची गोष्ट खूप प्रेरणादायी आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून तो अधिकारी बनला. त्याने अशा आपल्या वंचित बांधवांच्यासाठी सर्व वस्तूंसाठी लागणारा आर्थिक सहभाग दिला. बलभीमच्या मदतीने सर्व भटक्या बांधवांना थोडीफार मदत करता आली. भटक्या व विमुक्त बांधवांचे जीवन सुसह्य करणे खूपच अवघड गोष्ट. ते ऐके ठिकाणी राहत नसल्याने खूपच अवघड जाते. बलभीम मुळे त्यांच्यासाठी काही तरी करता आल्याचे समाधान मात्र मिळाले.
लेखन :प्रसाद चिक्षे