दिन विशेष
२७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रजांचा जन्म दिन. हा दिवस ‘ मराठी राजभाषा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. तसेच २१ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जात असतो. भाषिक वैविध्य जागतिक संस्कृतीतील महत्त्व अधोरेखित करणे व जपणे हा त्यामागील युनेस्को चा उद्देश आहे.यानिमित्ताने कुसुमाग्रजांचा भाषा विचार समजून घेण्याची आणि भाषेविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.कुसुमाग्रजांनी व्यापक व वैश्विक विचार पेरणारी साहित्य निर्मिती केली. त्यांनी भाषेचा सखोल विचार केलेला होता. आज एकीकडे मराठीसह अनेक भाषांची अवस्था बिकट होत आहे. काही प्रादेशिक भाषा नामशेष होत आहेत. म्हणूनच या विचारातून आजच्या भाषाविषयक घुसमटीतून अथवा कोंडीतून बाहेर पडण्याचा मार्ग निश्चितपणे मिळू शकतो असे वाटते.
१९८८ साली कुसुमाग्रजांना ‘भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना ते म्हणाले की,” इंग्रजीवर एक संपन्न भाषा म्हणून माझेही प्रेम आहे .जगातील ज्ञान विज्ञानाशी संपर्क साधणारी ती एक खिडकी आहे .हे सुभाषित मलाही मान्य आहे .पण खिडकी म्हणजे घर नव्हे. आपण घराच्या चार भिंती न बांधता फक्त खिडक्याच उभ्या करत आहोत. आपल्या भाषा मागासलेल्या आहेत ही तक्रारही खरी नाही. कोणतीही भाषा माजघरात किंवा बाजारात वाढत नाही. तर ज्ञानविज्ञानाच्या, राज्यकारभाराच्या, आर्थिक व्यवहाराच्या प्रांतात तिचा प्रवेश झाला तरच ती वाढू शकते. तशी ती वाढू शकते हे अनेक राष्ट्रांनी सिद्ध केलेले आहे. आपण कल्पनेची कुंपण निर्माण करत आहोत. आणि एका परस्थ भाषेच्या पायावर डोकं ठेवून ‘तूच आम्हाला तार ‘म्हणून विनवणी करत आहोत. देशातील बहुसंख्यांना न समजणाऱ्या परस्थ भाषेचा पांगुळगाडा घेऊन सामाजिक परिवर्तनाचा, प्रगतीचा पर्वत आपण चढू पाहत आहोत. भाषाविषयक समस्या सोडवणे सोपे नाही हे खरेच .पण अवघड प्रश्न कपाटात अधिक अवघड होत जातात.आणि शेवटी संभाव्य उत्तरही गमावून बसतात. “

ते पुढे म्हणतात ,”भाषा म्हणजे संकलन नव्हे.समाजाचे वैचारिक आणि जीवनात्मक संचित काळातून पुढे नेणारी आणि परिणामतः समाजाच्या बदलत्या जीवनाला अखंडता,आकार आणि आशय देणारी भाषा ही एक महाशक्ती असते. सूत्रात ओवलेल्या मण्याप्रमाणे समाज जीवनाच्या साऱ्या धारणा आणि विकासाच्या प्रेरणा तिच्यात ओवलेल्या असतात. म्हणून मराठी वरील संकट हे मराठीपणावरील संकट आणि येथील साहित्यावरील संकट नाही. ते महाराष्ट्राच्या अस्मितेवरील संकट आहे. क्रांती स्वभाषेच्या किनाऱ्यावर पेरता येते असे क्रांतिकारकांच्या प्रणेत्याने म्हटले आहे.’
ज्ञानेश्वर ,तुकाराम आदि प्राचीन आणि केशवसुत ,गडकरी आदि अर्वाचीनांनी संपन्न केलेल्या मराठी भाषेचे ऋण आपल्या मस्तकावर कायम आहेत असे कुसुमाग्रज म्हणत असत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलतानाही कुसुमाग्रजांनी आपली भाषाविषयक भूमिका अत्यंत पोटतिडकिने मांडली होती.ते म्हणाले ,”भाषा हे समाजाच्या जीवन विकासातील एक आधारभूत आणि सनातन असे तत्व आहे. समाजाच्या बांधकामातील राजकीय,नैतिक व आर्थिक व्यवस्थेचे बरेच महाल, मजले अनेकदा दुरुस्त होतात.बदलतात .कित्येकदा पूर्व रूपात नाहीसे होऊन नव्या रूपात उभे राहतात. या सर्व युगांतरात नष्ट होत नाही व अमुलाग्र बदलत जात नाही ती फक्त भाषा. भाषा जेव्हा नष्ट होते तेव्हा समाजाचे अस्तित्व समाप्त होते.’
जीवसृष्टी निर्माण झाल्यानंतर काही काळाने भाषेची निर्मिती झाली. भाषा हे संवादाचे साधन आहे .माणसांची जशी भाषा आहे तशीच ती अन्य प्राण्यांचीही असते. इतकेच काय पण झाडेही बोलतात, ऐकतात असे विज्ञानाने सिद्ध केलेले आहे.भाषा हे प्राचीन काळापासून चालत आलेले संवादाचे एकमेव माध्यम आहे. ते दिवसेंदिवस विकसित होत जाते .भाषेमुळे माणसे जवळ येतात. सुखदुःखात भागीदारी करतात. भाषा मानवी संस्कृतीची जोपासना करीत असते.लहान मुलांचे व्यक्तिमत्व मातृभाषेतूनच घडत असते. आज मात्र मातृभाषेची प्रचंड हेळसांड होत आहे. प्रमाणभाषा, बोलीभाषा, समाजभाषा, मातृभाषा अशा साऱ्यांमुळे सामाजिक व सांस्कृतिक आदान प्रदानाची प्रक्रिया घडत असते व विकसित होत असते.
आज मातृभाषेची गळचेपी जगभर सर्वत्र सुरू आहे. ती थांबवण्यासाठी त्या त्या भाषा बोलणाऱ्या व्यक्तीनी, समूहानी प्रयत्न केला पाहिजे.आपल्या भाषेची स्थिती सावरायला दुसरी भाषा उपयोगी पडणार नाही. प्रत्येक भाषेला एक संस्कृतीक वैशिष्ट्य असते. त्याची जोपासना झाली पाहिजे. काही वर्षांपूर्वी भाषा तज्ञांच्या एका जागतिक परिषदेत अशी भीती व्यक्त केली गेली की,
सध्या जगातील वीस ते पन्नास टक्के भाषा मुले शिकताना दिसत नाहीत. आदिवासींच्या प्रदेशावर बाहेरच्या लोकांचे आक्रमण, मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर आणि भाषा शिकण्याच्या प्रवृत्तीचा अभाव अशी काही या ऱ्हासाची महत्वाची कारणे आहेत. परिणामी जगातील सहा हजार भाषांपैकी ९५ टक्के भाषा पुढील शतकात नष्ट होणार आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.भाषेचे नीट जतन केले नाही तर तीन दुष्परिणाम संभवतात (१) जग आजच्या पेक्षा कमी रंजक वाटेल.(२)निराळ्या पद्धतीने विचार करण्याची माणसाची शक्ती कमी होईल.(३) आपल्या अस्तित्वाला आवश्यक असलेली मानवी विविधता कमी होईल. हे सारे टाळायचे असेल तर आपण भाषेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.असा संदेश देणारा हा दिवस आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
अभिजात ही ठरावी देशामधे मराठी
—––——————-
ओठामधे मराठी, डोळ्यामधे मराठी
असते वहात माझ्या धमन्यामधे मराठी…
शिवबा स्वराज्य स्थापी मुलुखामधे मराठी
हरहर गजर निनादे शब्दामधे मराठी…
प्राचीन काळ सारा नोंदीमधून ठेवे
अभिजात ही ठरावी देशामधे मराठी.,
भाषेमुळेच माझा श्रीमंत श्वास झाला
रसपूर्ण होत गेली जगण्यामधे मराठी..
जितकी कठोरआहे तितकीच कोमलांगी
नांदे सुखात माझ्या हृदयामधे मराठी…
कित्येक शब्द देते,कित्येक शब्द घेते
समृद्ध होत जाते विश्वामधे मराठी..
ज्ञाना तुका जनीचा समृद्ध वारसा हा
ओवी, अभंग,गझला ओठामधे मराठी..
मजला प्रचंड आहे अभिमान मावशांचा
पण पोसते मला ही गर्भामधे मराठी..
वैविध्य राखते ती वाणी न लेखणीचे
नसते कधीच कुठल्या साच्यामधे मराठी..
परसामधे बहरते अन अंगणात खेळे
नसते उभीच केवळ दारामधे मराठी…
माझ्या भुकेस सुद्धा कित्येक अर्थ देते
भाषा भरून आहे पोटामधे मराठी..

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८३०२९०)
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेले अडतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली चौतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)
———++++——————————-