महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुढाकार
इचलकरंजी , ( प्रतिनिधी) –महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने प्रबोधन करत कोरोचीयेथील सिद्धार्थनगर परिसरात राहणाऱ्या अलका कांबळे या ४० वर्षीय महिलेची जट काढण्यात यश मिळवले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा इचलकरंजी – कोरोची यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या सामाजिक परिवर्तन कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे
राज्य सांस्कृतिक विभागाचे कार्यवाह सुनील स्वामी हे गेल्या काही दिवसांपासून कोरोची गावातील अलका कांबळे या महिलेसह तिच्या कुटुंबियांशी संवाद साधत जटा निर्मुलनाबाबत प्रबोधन करत होते.या दरम्यान त्यांच्या भावंडांचे काही दिवसांपासून प्रबोधन करून अलका कांबळे यांच्या जट निर्मूलनासाठी त्यांना तयार केले होते. तसेच सदर महिलेचेही समुपदेशन करण्यात आले होते. या नंतर सदर महिलेनेसुद्धा जट काढून घेण्याची तयारी दर्शवली. काल दुपारी कोरोची गावचे पोलीस पाटील सावकार हेगडे यांच्या सुचनेवरून त्या महिलेला जटेतुन मुक्त करण्यात आले. शरीराची, केसांची स्वच्छता न राखल्याने, काळजी न घेतल्याने केसांमध्ये गुंता निर्माण होऊन अशी जट तयार होत असते. लोक मात्र ती देवीची देण असं म्हणून आयुष्यभर त्या जटेसमवेत आपले आयुष्य काढतात. पण कोरोचीतील अलका कांबळे या महिलेशी साधलेल्या संवादातून असे लक्षात आले की ,शारीरिक त्रासाबरोबरच या जटेमुळे मानसिक त्राससुद्धा होत असतो. पण सामाजिक कार्यकर्ते सुनिल स्वामी यांनी प्रबोधन केल्याने सदर स्त्री कायमची जट मुक्त होऊ शकली.या सामाजिक परिवर्तन कार्याचेे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी सुनिल स्वामी, अमोल पाटील, रोहित दळवी, दामोदर कोळी, उत्तम साळुंखे, कोरोची गावचे पोलीस पाटील सावकार हेगडे, माया धनवडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.




