मास्क व इतर नियमावली पाळूनच कोरोनाच्या पुनरावृत्तीची शक्यता टाळणे शक्य
– डॉ. राहुल पंडित
सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘कोरोना जागर’चे लोकार्पण
लातूर – सध्याचे कोरोनाचे स्वरूप हवेतून प्रसाराला अनुकूल असून, बंद हवेत राहण्यापेक्षा अधिक खेळत्या हवेच्या वातावरणात राहणे आणि त्याहून विशेष म्हणजे प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी दुहेरी मास्क वापरणे अत्यंत आवश्यक आहे; कारण एकदा संसर्ग झाला, तर लक्षणांच्या तीव्रतेच्या प्रत्येकाच्या सहनशक्तीनुसार उपचारांचे स्वरूप बिकट होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याला हरतऱ्हेने आपल्यापर्यंत न पोचू देण्यासाठी जबाबदारीच्या जाणिवेने राहण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले. सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व त्याअंतर्गत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे आयोजित ‘कोरोना जागर’ उपक्रमांतर्गत व्याख्यानसाहित्याच्या प्रकाशन व लोकार्पणप्रसंगी ते दूरसंपर्क माध्यमातून बोलत होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटसदृश्य संसर्गाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक आरोग्य नियमावलीचे पालन करणे अत्यावश्यक आहे व लसीकरण आणि आरोग्य चिकित्सा मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राची लक्षणीय रुग्णसंख्या पाहता राज्याने परिस्थिती खूप चांगली हाताळली, असेही त्यांनी सांगितले. मात्र, काही घटकांपर्यंत त्याचे गांभीर्य पोचले नाही व थोडी सवलत मिळताच सर्व नियमावलींचे विस्मरण झाल्यामुळे रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. सध्याच्या कोरोनाच्या ओमिक्रोनसारख्या रूपाच्या संसर्गक्षमतेचा व प्रसारक्षमतेचा विचार करता, दुहेरी मास्कचा वापर न कंटाळता करणे अत्यावश्यक आहे. तथापि, जाणीवपूर्वक नियमांच्या पालनासह लसीकरण व इतर खबरदारी घेतल्यास सौम्य लक्षणांच्या आजारावर दरम्यानच्या काळात विकसित झालेल्या उपचारप्रणालीच्या व रुग्णसेवांच्या जोरावर आपण त्यावर सहज मात करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मधल्या काळात सुमारे १६०० हून अधिक डॉक्टरांच्या मृत्यूबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला व सर्वसामान्य जनतेने वैद्यकक्षेत्रातील सर्व व्यक्तींच्या योगदानाची संवेदनशील जाणीव ठेवावी, ठराविक उपचारांचा आग्रह न धरता, विशेषत: ‘मोनोक्लोनल अँटीबॉडिज’, ‘स्टेरोईडस’ इ. चा वापर डॉक्टरांच्या निर्णयावर सोडावा, असे आवाहनही केले. मात्र, संसर्गाची ही लाट आपण नियंत्रणात आणू शकलो, तर लवकरच कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होईल, असा दिलासा त्यांनी व्यक्त केला. व्याख्यानानंतर श्रोत्यांच्या शंकांचेही समाधान करण्यात आले व उपचारप्रणालीचीही सविस्तर माहिती डॉ. पंडित यांनी दिली.

कार्यक्रमास मराठी विज्ञान परिषदेच्या मध्यवर्ती विभागाचे कार्यवाह श्री. विनायक कर्णिक, माजी कार्यवाह दिलीप हेर्लेकर, किशोर कुलकर्णी (मुंबई), उपक्रमाचे समन्वयक डॉ. मुकुंद भिसे, माजी अधिष्ठाता डॉ. जे.जे. देशपांडे, डॉ. प्रिया प्रभू-देशपांडे, डॉ. संजीवनी भातांब्रे, सौ. आशा भिसे, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. सदानंद कुलकर्णी, डॉ. संपदा गिरगावकर, डॉ. शरद लोंढे, डॉ. संजय शिंदे, डॉ. संजय देशपांडे, मिलिंद बाभुळगावकर, दत्ता कुलकर्णी, मुरलीधर डोणे, वैजनाथ चामले, सुबोध राउतमारे, प्रा. मनोहर कबाडे, विजय वालवडकर, चंद्रकांत साखरे या मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर राज्यातील विविध शहरांतून श्रोत्यांची हजेरी होती.
आज प्रकाशित व लोकार्पण करण्यात आलेल्या कोरोनाविषयक संकलित माहितीच्या डिजिटल ग्रंथासह या उपक्रमातील सर्व व्याख्यानांच्या चलचित्रदस्ती प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर नि:शुल्क उपलब्ध असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली. त्याचप्रमाणे कोरोनाविषयक संकलित माहितीच्या संग्राह्य अशा डिजिटल अंकाचे प्रकाशन व आधारे विद्यार्थ्यांसह जनसामान्यांसाठी कोरोना ज्ञानचाचणीचे आयोजन करण्यात यणार असल्याचे त्यांनी सांगितले.


