तीव्र लक्षणांच्या कोविडवरही उपलब्ध उपचारप्रणाली परिणामकारक – डॉ. सुनिता पाटील
सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेतर्फे कोरोना जागर उपक्रम
लातूर –
कोरोनासंदर्भातील विविध बाबींवरील जनमानसातील गैरसमज दूर व्हावेत यासाठी पानगाव येथील सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व त्याअंतर्गत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे आयोजित ‘कोरोना जागर’ दूरसंपर्क परिसंवादाच्या पाचव्या सत्रात तीव्र व अतिगंभीर स्वरूपाच्या कोविड रुग्णांसाठी वापरण्यात येणारी उपचारप्रणाली मोठ्या प्रमाणावर यशस्वी असल्याचे प्रतिपादन लातूर येथील अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. सुनीता पाटील यांनी केले.
तीव्र, अतिदक्षतापात्र अशा लक्षणांच्या अवस्थांतील रुग्ण व त्याचे नातेवाईक यांनी घाबरून न जाता संशोधनाने निर्माण केलेल्या वैद्यकीय उपचारप्रणालीनुसार उपचार घ्यावेत. कोविड हा विषाणूजन्य रोग असला तरी लक्षणांच्या नियोजनानुसार त्यावर उपचार करता येतात. त्यासाठी अनेक औषधे उपलब्ध आहेत व ती परिणामकारक ठरल्याचा विश्वास डॉ. सुनिता पाटील यांनी व्यक्त केला. सर्वश्रुत झालेली रेम्डीसिवीर व फ्लॅविपिरॅविर, टोसिलीझुमॅब अशी औषधे तर उपलब्ध आहेतच, पण प्लाझ्मा थेरपीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण प्रणालीही यशस्वी झाल्या आहेत. याशिवाय, काही नवनवीन उपकरणे व तंत्रेही विकसित करण्यात आलेली आहेत. मात्र, या सर्व औषधांच्या काही मर्यादाही असल्यामुळे व लक्षणांच्या अनुकूलतेनुसार केवळ डॉक्टर्सच त्याचा वापर नेमका कधी व कसा करायचा हे ठरवू शकतात. रुग्णांनी व नातेवाईकांनी अकारण त्यांच्या वापराचा आग्रह करू नये, असेही आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे डॉक्टर्स व निमवैद्यकीय कर्मचारी यांनीही त्याची सावधगिरी बाळगली पाहिजे असेही त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. शिरीष पाटील यांनीही शंकासमाधान करताना तिसऱ्या लाटेची शक्यता, लसीची परिणामकारकता अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
कार्यक्रमात मराठी विज्ञान परिषदेच्या मध्यवर्ती विभागाचे कार्यवाह श्री. दिलीप हेर्लेकर, किशोर कुलकर्णी (मुंबई), एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. बसवेश्वर नागोबा, अॅड. रजनी गिरवलकर, प्रा. राजेश कटके, प्रा. मनोहर कबाडे, माजी अधिष्ठाता डॉ. जे.जे. देशपांडे, किशोर कुलकर्णी, डॉ. सदानंद कुलकर्णी अशा मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर श्रोत्यांची हजेरी होती. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मुकुंद भिसे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.
पुढील रविवारी ‘कोविड १९ – लस व प्रतिबंध’ या विषयावर डॉ. मुकुंद भिसे व डॉ. प्रिया देशपांडे या तज्ज्ञांच्या परिसंवादात कोविड लसींच्या संशोधन व उपकारकता यांवर मार्गदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली. विद्यार्थी, तरुण वर्ग व सामान्य नागरिकांसाठी दूरसंपर्क पद्धतीने चाचणी परीक्षेचे आयोजन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. नागरीक, विद्यार्थी, शिक्षक व सुजाण नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.











