सावधानता व दक्षता हीच कोविड पश्चात व्याधी टाळण्यासाठी गुरुकिल्ली – डॉ. शिरीष पाटील
सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेतर्फे कोरोना जागर उपक्रम
लातूर – कोरोना हा विषाणू शरिरातील सर्वच संस्थांवर परिणाम करत असून, कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी त्याबाबत सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे सप्रमाण मत लातूर येथील अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. शिरीष पाटील यांनी व्यक्त केले. पानगाव येथील सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व त्याअंतर्गत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे आयोजित ‘कोरोना जागर’ दूरसंपर्क परिसंवादाच्या सातव्या सत्रात ते बोलत होते.

मानवी शरिरातील फुफ्फुसांवर कोरोना विषाणू मुख्यत्वे करून आघात करत असल्यामुळे त्याचा श्वासोच्छ्वासावर विशेष परिणाम होतो, हे खरे असले, तरी कोरोना हा विषाणू शरिरातील इतर अनेक अवयवांवर परिणाम करत असल्यामुळे हृदय, रक्ताभिसरण, मूत्रपिंडे, पचनसंस्था अशा अनेक संस्थांवर त्याचा प्रभाव कालांतराने दिसून येतो. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांनी बेसावध न राहता विशेष काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. शिरीष पाटील यांनी सांगितले. याशिवाय, संसर्गाशिवाय उपचारादरम्यानही अनेक प्रक्रियांतून विविध व्याधी उद्भवू शकतात; मात्र त्यासाठी सावधगिरी बाळगली, तर त्यातून रुग्ण तर पूर्णपणे बरा होतोच, शिवाय प्रसाराच्याही शक्यता कमी होतात, असेही ते म्हणाले. याप्रसंगी, लातूरच्या शरीरविकृतीतज्ज्ञ डॉ. ऋजुता अयाचित यांनीही म्यूकरमायकोसिस या कोविडपश्चात उद्भवलेल्या बुरशीजन्य रोगावर विशेष माहिती दिली. म्यूकरमायकोसिस बाबतीत अनेक घटक कारणीभूत असल्यामुळे सर्वंकष स्वच्छता व काळजी आणि दक्षता घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दोन्हीही तज्ज्ञांनी केले. चित्रे व चलचित्रांच्या माध्यमातून उत्कृष्ट मार्गदर्शन करत दोन्ही तज्ज्ञांनी आस्थेवाईकपणे श्रोत्यांचे शंकासमाधान केले; तसेच रुग्णांनी आणि संबंधितांनी मनोधैर्य खचू न देता आरोग्याची काटेकोरपणे काळजी घेणे महत्वाचे आहे यावर भर दिला.
कार्यक्रमास मराठी विज्ञान परिषदेच्या मध्यवर्ती विभागाचे कार्यवाह श्री. विनायक कर्णिक, दिलीप हेर्लेकर, किशोर कुलकर्णी (मुंबई), अॅड. रजनी गिरवलकर, अरविंद राखे, प्रा. मनोहर कबाडे, माजी अधिष्ठाता डॉ. जे.जे. देशपांडे, डॉ. सदानंद कुलकर्णी अशा मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर श्रोत्यांची हजेरी होती. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मुकुंद भिसे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.

निरंतर चालणाऱ्या या उपक्रमात पुढील रविवारी ‘कोविड व मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. दिनेश पाटील व डॉ. अनघा राजपूत यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली. नागरीक, विद्यार्थी, शिक्षक व सुजाण नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.











