कोरोनाचे सावट झुगारण्यासाठी सकारात्मक मानसिकता महत्वाची – डॉ. मिलिंद पोतदार
सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेतर्फे कोरोना जागर उपक्रम
लातूर –पानगाव येथील सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व त्याअंतर्गत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे आयोजित ‘कोरोना जागर’ दूरसंपर्क परिसंवादाच्या आठव्या सत्रात कोविड व मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर आयोजित परिसंवादात मान्यवर मानसोपचार तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन व विश्लेषण सादर करून श्रीत्यांचे शंकासमाधान केले. याप्रसंगी, लातूर येथील सावली मानसोपचार केंद्राचे संस्थापक डॉ. मिलिंद पोतदार यांनी कोरोनाच्या भीतीपेक्षा संसर्गाची प्रक्रिया किमान प्राथमिक पातळीवर समजून घेवून मनोधैर्य राखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. त्यासाठी सकारात्मक व कृतज्ञतेच्या भावनेचा त्यांनी संदेश त्यांनी दिला.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विलगीकरण हा महत्वाचा उपचार असल्यामुळे सामान्य रुग्णाला एकाकीपण येवून नैराश्य येणे साहजिक आहे; मात्र हीच संयमाची कसोटी असून खंबीर मनाने या उपचारात्मक उपायांचा स्वीकार केल्यास अनेक मानसिक व्याधींना टाळता येतेच; शिवाय, कुटुंबातील इतरांवर व समाजातील अनेक घटकांवर होणारा संभाव्य परिणामही टाळता येतो, असे डॉ. मिलिंद पोतदार यांनी शास्त्रोक्त प्रमाणांच्या आधारे दर्शवले. कोरोना हे निर्विवाद संकट असले तरी त्यामुळे निराश होण्यापेक्षा त्याला इष्टापत्ती समजून त्याचा सावधानतेने सामना करण्याचा खंबीर निश्चय आरोग्यासाठी साह्यभूत ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले. स्त्री रोग तज्ज्ञा व शांती हॉस्पिटल आणि दिशा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या संचालिका डॉ. अनघा राजपूत यांनी कोविडच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे स्वरूप अनन्यसाधारण असल्यामुळे त्याचे अनेक पडसाद कुटुंबावर विशेषत: घरातील महिला, गृहिणी, लहान मुले व वयस्क, वृद्ध व्यक्तींवर विशेष तीव्रतेने झाल्याचे प्रतिपादन केले. डॉ. राजपूत यांनीही कुटुंबातील या घटकांवर होणाऱ्या अनिष्ट, अन्याय्य आणि असाधारण प्रसंगांतील उपाययोजनांची सप्रमाण व सोदाहरण स्पष्टीकरणे देवून मानसोपचाराच्या तंत्रांची माहिती दिली. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिनेश पाटील यांनी कोरोनामुळे बदलत चाललेल्या जीवनशैलीची अभ्यासपूर्ण चर्चा करून स्वीकारात्मक दृष्टीकोनाशिवाय पर्याय नसल्याचे सांगून आपल्या जीवनशैलीची पूर्वसूरींनी सांगितलेली सूत्रे स्मरून, समजून घेत आपली जीवनशैली घडवणे आवश्यक असून, आपणच आपले व कुटुंबातील तसेच मित्रपरिवारातील रुग्णांचे समुपदेशन करण्यास सज्ज झाले पाहिजे व त्यादृष्टीने सुधाकरराव कुलकर्णी प्रतिष्ठानने ज्ञान व माहितीच्या प्रसारासाठी जनजागृतीपर सुरु केलेल्या उपक्रमाची गरज विदित केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनीही अध्यक्षीय समारोपात कोरोनाच्या निश्चित प्रसारासाठी राजकीय इच्छाशक्ती व धार्मिक घटकांचा संयम यादृष्टीने मानसिक समुपदेशन होण्याची गरज बोलून दाखवली.

कार्यक्रमास मराठी विज्ञान परिषदेच्या मध्यवर्ती विभागाचे कार्यवाह श्री. विनायक कर्णिक, दिलीप हेर्लेकर, किशोर कुलकर्णी (मुंबई), अॅड. रजनी गिरवलकर, अरविंद राखे, प्रा. मनोहर कबाडे, माजी अधिष्ठाता डॉ. जे.जे. देशपांडे, डॉ. सदानंद कुलकर्णी, रमाकांत क्षीरसागर, डॉ. प्रिया प्रभू देशपांडे, डॉ. बसवराज नागोबा, डॉ. संपदा गिरगावकर, अंबाजोगाई येथील मनस्विनी प्रकल्पाच्या अरुंधती पाटील, दत्ता कुलकर्णी, यांच्यासह डॉ. माधुरी रामनाथन, वृषाली हरिहर या विदेशी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर श्रोत्यांची हजेरी होती.

निरंतर चालणाऱ्या या उपक्रमात पुढील रविवारी ‘कोविड – समायोजन, आकडेवारी, संशोधन. जागतिक आरोग्य संस्था व नियमावलीचा जन्म’ या विषयावर सुप्रसिद्ध संशोधक व लेखिका मृदुला बेळे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली. नागरीक, विद्यार्थी, शिक्षक व सुजाण नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.











