कोरोना जागर उपक्रम

0
217

मधुमेहींना कोरोना संसर्ग सामान्यांसारखा; लस सुरक्षित व अनिवार्य – डॉ. अभिजीत मुगळीकर 

सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेतर्फे कोरोना जागर उपक्रम 

लातूर – कोरोनाचा संसर्ग मधुमेहींना सामान्यांप्रमाणेच होणारा असून लक्षणांची तीव्रता मात्र अधिक असल्याचे मत लातूर येथील मधुमेहतज्ज्ञ डॉ. अभिजीत मुगळीकर यांनी व्यक्त केले. पानगाव येथील सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व त्याअंतर्गत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे आयोजित ‘कोरोना जागर’ उपक्रमांतर्गत दूरसंपर्क परिसंवादाच्या नवव्या सत्रात ते बोलत होते.

डॉ. अभिजित मुगळीकर

मधुमेही रुग्णांत कोरोनाच्या संसर्गाबद्दल खूप गैरसमज व भीती असून हा संसर्ग मधुमेहींत सर्वसामान्य माणसांसारखाच होतो; मात्र, आहार, व्यायाम, औषधे यांच्या तसेच, दिनचर्येच्या नियमिततेने रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित राखून कोविड व अन्यही संसर्गांचा धोका टाळणे शक्य होते, असे डॉ. अभिजीत मुगळीकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात सांगितले. याशिवाय, लसीचा त्रास होण्याबाबतच्याही अनेक गैरसमजांवर भाष्य करत डॉ. मुगळीकर यांनी मधुमेहींनी लस घेतली पाहिजे असे ठामपणे सांगितले; मात्र आपल्या नियमित उपचारांत तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपणहून केलेला बदल धोक्याचा ठरू शकतो – त्यामुळे रक्तशर्करेच्या प्रमाणाची योग्य वेळेवर तपासणी व नियमित उपचारांसह कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक सूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे व त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासही मदत होवून, संभाव्य तिसऱ्या लाटेचाही सामना आपण करू शकतो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. व्याख्यानानंतर श्रोत्यांच्या शंकांचेही समाधान डॉ. मुगळीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमाचे समन्वयक डॉ. मुकुंद भिसे यांनी केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. नानासाहेब गाठाळ यांनी अध्यक्षीय समारोप केला.  

कार्यक्रमास मराठी विज्ञान परिषदेच्या मध्यवर्ती विभागाचे माजी कार्यवाह दिलीप हेर्लेकर, किशोर कुलकर्णी (मुंबई), अॅड. रजनी गिरवलकर, अरविंद राखे, माजी अधिष्ठाता डॉ. जे.जे. देशपांडे, डॉ. सदानंद कुलकर्णी, डॉ. बसवराज नागोबा, डॉ. संपदा गिरगावकर, डॉ. वर्षा पाटील, सुबोध राउतमारे, संजय सबनीस, मिलिंद बाभुळगावकर, सौ. अरुणा काळे-ताथोडे, दत्ता कुलकर्णी या मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर श्रोत्यांची हजेरी होती. 

निरंतर चालणाऱ्या या उपक्रमात पुढील रविवारी ‘कोविड – नंतर ? अनुभवावलोकन व नियोजन … तिसरी लाट ?’ या विषयावरील मार्गदर्शनासह खुले सत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली. नागरीक, विद्यार्थी, शिक्षक व सुजाण नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here