लातूरच्या कोरोना योद्धांचे नाव
सुवर्णअक्षरांनी लिहलं जाईल.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स ह्युमन राईटस मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कोरोना योद्धा पुरस्कार, राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार, लातूर जिल्ह्यातील पहिल्या महिला बाउंसर ग्रुपची स्थापना व रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिलो.
कोरोना काळात आपल्या जीवाची तमा न बाळगता रुग्णांची सेवा करणाऱ्या कोरोना योद्धांचा सत्कार केला व त्यांच्या निःस्वार्थ भावनेच्या समाजकार्याचे आभार मानले. या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण कोरोनावर यशस्वी मात करू शकलो. प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून या योद्धयांनी काम केलं आहे. जेव्हा केव्हा लातूरच्या कोरोनाचा इतिहास लिहला जाईल तेव्हा या कोरोना योद्धांचे नाव सुवर्णअक्षरांनी लिहलं जाईल. तसेच जिल्ह्यातील पहिल्या महिला बाउंसर ग्रुपची स्थापना देखील करण्यात आली. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. स्त्री मध्ये कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठीची प्रचंड मोठी शक्ती असते. आता आपल्या रक्षणासाठी या महिला तैनात राहणार आहेत. त्यांच्या धाडसाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. या बाउंसर ग्रुपच्या सर्व महिलांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. रक्ताचा तुटवडा पडू नये यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन ही यावेळी केले.
यावेळी माजी आमदार वैजनाथजी शिंदे, उपमहापौर चंद्रकांतजी बिराजदार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि.प. लातूर रत्नराज जवळगेकरजी, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीपजी पाटील खंडापूरकर, पुजाताई नीचळे, त्यांचे सर्व सहकारी, शहरातील सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य यांची उपस्थिती होती.