कोरोना संदर्भात जनजागर परिसंवाद

0
374

कोरोनाजागर – परिसंवादमालिका 

कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आला कि भीती आणि मग चाचण्यांचा ससेमिरा सुरु होतो. त्यातल्या बव्हंशी चाचण्यांचे अन्वयार्थ लागलेले नसल्यामुळे निर्माण झालेल्या गैरसमजांतून गांभीर्य कसे वाढत जाते आणि अनाठायी भय व अनावश्यक चाचण्यांचे दडपण यांनी गुंतागुंत वाढते. त्यामुळे कोणत्या चाचण्या कधी कराव्या लागतात व या चाचण्यांचे नेमके अर्थ काय असतात यावर अतिशय सविस्तर व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन पानगाव येथील सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व त्याअंतर्गत असलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या पानगाव विभागातर्फे आयोजित ‘कोरोना जागर’ दूरसंपर्क परिसंवादाच्या तिसऱ्या सत्रात करण्यात आले.

शरीरशल्यविकृतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. ऋजुता अयाचित यांनी कोरोनाचा संसर्ग झाल्यांनतर शरीरात तो कोणते रासायनिक परिणाम करतो आणि त्यामुळे नेमक्या कोणत्या घटकांच्या तपासण्यांवरून रुग्णाची अवस्था कशी कळू शकते याचे सोदाहरण शास्त्रोक्त विवेचन अगदी सोप्या भाषेत केले. नेहमी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या संज्ञांचे अर्थ समजावून देण्यात आले. तसेच, एम.आय.एम.एस.आर. वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचनाशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व स्नायूविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. महेश उगले यांनी किरणोत्सारी (रेडीओलॉजिकल) तंत्राने प्रत्यक्ष फुफ्फुसे व श्वसनसंस्था यांवरील कोरोनाच्या संसर्गामुळे होणाऱ्या विविध अवस्थांचे सचित्र मार्गदर्शन केले. दोन्ही तज्ज्ञांनी रुग्णांची अनावश्यक भीती, नातेवाईकांचे अनाठायी आग्रह, अविश्वास आणि गैरसमजातून निर्माण होणारे नुकसान यावर तळमळीने मार्गदर्शन केले. त्याचबरोबर निदानामागील विज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट केल्या व नागरिकांनी गैरसमज दूर करून घ्यावेत यासाठी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

त्यासाठी त्यांनी सदीप व सचित्र पद्धतीने सर्व सविस्तर व सप्रमाण माहिती देवून सखोल अशी माहिती अतिशय आकर्षक मांडणीद्वारे दिली. समन्वयक डॉ. मुकुंद भिसे यांनीही यावेळी नागरिकांनी सामुदायिक आरोग्याच्या नियमांचे पालन करून कोरोनासंबंधी अधिक माहिती करून घेण्याची गरज व्यक्त केली.

या कार्यक्रमात श्रोत्यांच्या अनेक शंका व प्रश्नांना उत्तरे देण्यात आली.

(यू ट्यूब दुवा – https://youtu.be/1mgMseyWJII)

सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानतर्फे दूरस्थ संवाद पद्धतीने परिसंवाद मालिकेचे नि:शुल्क आयोजन करण्यात येत असून दर रविवारी संध्याकाळी ५ वाजता राज्यभरातील वैद्यकीय, संशोधन व प्रशासन तसेच शिक्षण, सामाजिक व साहित्य क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांच्या व्याख्यानांचा समावेश आहे. पुढील रविवारी ‘कोविड १९ काय आहे ? आजार,लक्षणे व उपचारप्रणाली – भाग १’ या विषयावर डॉ. शिरीष पाटील, डॉ. सुनिता पाटील, डॉ. अरुण मोरे या तज्ज्ञांचे परिसंवादात्मक व्याख्यान होणार आहे.

विद्यार्थी, तरुण वर्ग व सामान्य नागरिकांसाठी दूरसंपर्क पद्धतीने चाचणी परीक्षेचे आयोजन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. नागरीक, विद्यार्थी, शिक्षक व सुजाण नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here