*स्थलांतरित कामगार हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत*
*यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या व्याख्यानाप्रसंगी
प्रा.संजीव चांदोरकर यांचे प्रतिपादन*
लातूर : कोरोना ही महामारी अर्थ व आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे.सुमारे ४ टक्केच लोकांना कोरोनाची प्रत्यक्ष लागण झाली. परंतु याची झळ ९० टक्के लोकांपर्यंत पोहोचली. यामुळे आरोग्य व अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आला. न भूतो ठरलेली…जगातील सुमारे सातशे कोटी लोकांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारी कोरोना ही महामारी आहे. महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशात सुमारे दहा कोटी स्थलांतरित मजूर- कामगार आहेत. जे आपल्या परीवारा पासून दूर राहून काम करतात.त्यामुळे स्थलांतरीत कामगारहेदेशाच्याअर्थव्यवस्थेचा कणा आहेत असे प्रतिपादन टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथील सहाय्यक प्राध्यापक तथा अर्थतज्ज्ञ प्रा. संजीव चांदोरकर यांनी केले .
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई, विभागीय केंद्र लातूरच्या वतीने कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर ‘कोरोना महासाथीचे अर्थ -धडे’ या विषयावर दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे हे उपस्थित होते.

प्रा.चांदोरकर पुढे म्हणाले की, अर्थ व आरोग्याशी संबंधित असलेले हे आरिष्ट घालविण्यासाठी काही महत्वपूर्ण अर्थ ‘धडे’ किंवा उपाययोजना आहेत. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य व्यवस्था हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून हा अर्थव्यवस्थेचाच नाही तर मानवी व्यवस्थेचा पाया आहे त्यामुळे याला बळकटी देणे गरजेचे आहे. आरोग्य सेवेचा गाभा हा सार्वजनिक क्षेत्र आहे. त्यामुळे आरोग्य सेवेचे तरी खाजगीकरण करु नये. उलट कोरोनासारख्या महामारीचे उपचार हे सार्वजनिक स्तरावरच व्हावेत.आणि प्रत्येकाने प्रतिकार क्षमता वाढविणे अत्यावश्यक आहे.कारण पृथ्वीतलावर सुमारे ३० लाख विषाणू असून त्यापैकी केवळ २५ ते ३० हजार विषाणू शोध अद्याप पर्यंत मानवाला लावला आहे त्यामुळे भविष्यात अनेक अशा प्रकारच्या महामारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच आरोग्य विमा कंपन्यांनी पुढे यावे, वित्तीय दृष्ट्या सरकार सक्षम असणे सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगचा वापर केला पाहिजे, देशभरात एकूण ५००० शहरे आहेत. परंतु केवळ १०० शहरेच विकसित आहेत .त्यामुळे केंद्र स्तरावरून प्रशासनाच्या वतीने जनतेच्या सोयीच्या दृष्टिकोनातून शहरीकरणाचा वेग वाढला पाहीजे. स्थलांतरीत मजूर हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याला आपण दूर केले आहे. त्यांना पुन्हा सामावून घेणे गरजेचे आहे .तसेच कर्जबाजारीपणा ,जागतिक अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायला हवा.
भारतीय अर्थव्यवस्था अधिकाधिक जनकेंद्रित कशी करता येईल याचा विचार व्हायला हवा. या महत्त्वपूर्ण गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले तरच भविष्यात येणाऱ्या संकटांना देश सामोरे जाऊ शकेल असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपा प्रसंगी डॉ.जनार्दन वाघमारे म्हणाले की, अर्थ आणि आरोग्य यासोबतच शैक्षणिक आयाम हा तिसरा महत्त्वपूर्ण आयाम आहे.आमची शिक्षण पिढीच ठप्प झालेली आहे. रोजगार, शेती, व्यवसाय ठप्प झाला आहे. दिवसेंदिवस खाजगीकरण वाढत चालले आहे. हे धोकादायक असून यावरही शासकीय स्तरावर काही प्रयत्न व्हायला हवेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विवेक सौताडेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे सचिव प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विवेक घोटाळे, पुणे तसेच प्रतिष्ठानचे सदस्य ॲड. मनोहरराव गोमारे, शिवाजीराव भोसले, कुसुमताई मोरे ,डॉ.शिवाजीराव देशमुख, रुक्साना मुल्ला आदींनी प्रयत्न केले.











