*कोविड योद्धा पुरस्कार सोहळा*

0
269

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र

राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार वितरण सोहळा, ५ ऑक्टोबर २०२१ (सह्याद्री अतिथिगृह, मुंबई)

मुंबई – कोविड साथीत मोठे सामाजिक योगदान देणाऱ्या विविध संस्था आणि व्यक्तींना सन्मानित करण्याचा चांगला उपक्रम अनेक संघटना आणि संस्थांनी सुरू केला आहे. मी अशा अनेक कार्यक्रमांना गेलो आहे; मात्र या कार्यक्रमात लोककलावंतांपासून ते डॉक्टर मंडळींपर्यंत सर्व स्तरांतील घटकांच्या योगदानाची दखल घेण्यात आली आहे, असे गौरवास्पद उद्‌गार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काढले.

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने (DMEJA) आयोजित कोविड योद्धा सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून टोपे बोलत होते. दुसरे प्रमुख पाहुणे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राजा माने, सचिव नंदकुमार सुतार, उपाध्यक्ष तुळशीदास भोईटे यांची उपस्थिती होती. प्रारंभी आरोग्यमंत्री टोपे यांचे स्वागत राजा माने यांनी केले. अमित देशमुख यांचे स्वागत उपाध्यक्ष भोईटे यांनी केले.

 

नागपूरपासून मुंबईपर्यंत विविध क्षेत्रात काम करत असताना, सरकार आणि समाजाने पुकारलेल्या कोविड साथीविरुद्धच्या लढ्यात आपापल्या क्षेत्रात राहून भरीव योगदान देणाऱ्या दहा संस्था आणि वीस व्यक्तींचा यावेळी कोविड योद्धा म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. सर्वच क्षेत्रांतील कोविड योद्ध्यांचा समावेश असलेला हा अशाप्रकारचा राज्यातील पहिलाच कार्यक्रम होता. तो मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ५ वाजता चैतन्यदायी वातावरणात पार पडला.

राज्य सरकार आणि विविध घटकांनी कोविड लढ्यात दिलेल्या योगदानाचा आढावा घेताना आरोग्यमंत्री टोपे यांनी डिजिटल मीडियाच्या क्षमतेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. कोविड रुग्णांचे लोककलेद्वारे मनोरंजन करण्याचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे, असे सांगून ‘या कलावंतांच्या प्रश्नांची दखल आम्ही घेतली आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू’, अशी ग्वाही टोपे यांनी दिली. डिजिटल मीडियाचे महत्त्व वाढले आहे. भविष्यात डिजिटल मीडिया अग्रस्थानी राहील अशी चिन्हे दिसत आहेत. हे क्षेत्र खूप मोठे आणि तंत्रज्ञानाच्या पायावर उभे आहे. त्याच्या प्रश्न वेगळे आहेत. ते सोडवण्यासाठी आम्ही सरकार दरबारी नक्की प्रयत्न करू. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेनेदेखील या नव्या माध्यमासंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी सरकारला मदत करावी, अशी सूचना टोपे यांनी केली.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेला शुभेच्छा देताना, तुमची संघटना जशी मल्टिमीडिया आहे, तसे आमचे सरकारदेखील मल्टिपार्टी आहे, असे आपल्या खास विनोदी शैलीत सांगितले. आजकाल सोशल मीडियावर तुमचे फॉलोवर किती, तुमच्या वेबसाईटला हिट्‌स किती, पेज व्ह्यूज किती, अशी वाक्ये सर्रास ऐकायला मिळतात’, असे नमूद केले.

डिजिटल मीडियाचे सर्व मागण्यांवर आम्ही गांभीर्यपूर्वक विचार करू, अशी ग्वाहीही देशमुख यांनी दिली,

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी प्रास्ताविकात संघटना स्थापनेमागील भूमिका मांडली. डिजिटल मीडियासाठी राज्य सरकारने स्वतंत्र धोरण ठरवायला हवे, डिजिटल मीडिया आता ग्रामीण भागामध्येही रुजला असून, सरकारने या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व पत्रकार, संपादकांना इतर पारंपरिक वृत्तमाध्यमांतील पत्रकारांप्रमाणेच दर्जा द्यावा आदी मागण्याही माने यांनी केल्या.

राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्काराचे मानकरी

सामाजिक संस्था योगदान विभाग

१. मुस्लिम सत्यशोधक मंडळ, पुणे – डॉ. शमसुद्दीन तांबोळी

२. भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र – केतनभाई शाह, सोलापूर

३. कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी, कोल्हापूर – जाफरबाबा सय्यद

४. मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी – संतोष ठोंबरे

५. वजीर रेस्क्यू फोर्स, शिरोळ जि. कोल्हापूर – रउफ पटेल

६. हिंदवी परिवार महाराष्ट्र – डॉ. शिवरत्न शेटे

७. दिशा प्रतिष्ठान, लातूर – सोनू डागवाले

८. वंदे मातरम संघटना, पुणे – सचिन जामगे, वैभव वाघ

९. सेवांकुर, मुंबई – डॉ. नितीन गायकवाड

१०. सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग – डॉ. प्रवीणकुमार ठाकरे

शासकीय अधिकारी आणि व्यक्तिगत योगदान विभाग

१. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने

२. डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे

३. मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी सोलापूर

४. डॉ. राजेंद्र भारूड, तत्कालीन जिल्हाधिकारी, नंदूरबार

५. अमितेश कुमार, पोलिस आयुक्त नागपूर

६. गणेश देशमुख, महापालिका आयुक्त पनवेल

७. डॉ. प्रदीप आवटे, राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी

८. डॉ. बंडू वामनराव रामटेके, वैद्यकीय अधिकारी चंद्रपूर

९. राजेश बाहेती, दुबईस्थित उद्योजक (पुणे)

१०. प्राचार्य अजय कौल, एकता मंच, अंधेरी मुंबई

११. प्यारे खान, नागपूर

१२. डॉ. संजय अंधारे, बार्शी

१३. डॉ. महादेवराव नरके, कोल्हापूर

१४. डॉ. मुन्नालाल गुप्ता, वर्धा

१५. डॉ. नमिता आनंद सोनी, औरंगाबाद

१६. डॉ. गौतम आणि मनीषा छाजेड, पुणे

१७. मंगेश चिवटे, ठाणे

१८. मधुकर कांबळे, परभणी

१९. करण गायकवाड, परभणी

२०. बाबासाहेब पिसोरे, दौलावडगाव, ता. आष्टी जि. बीड

श्वेता हुल्ले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर तुळशीदास भोईटे यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here