जिल्हाभरात सत्तेची आणि पैशाची मस्ती जिरवणार- आ. कराड
येत्या काळात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करणार – आ. निलंगेकर
खरोळा येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा यशस्वी; संपर्क कार्यालयाचे उद्धाटन
लातूर दि.११- लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी संघर्षाचा वारसा दिला असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकरी संकटात, अडचणीत असताना कसल्याही प्रकारची मदत केली नाही. ७२ तासाच्या आंदोलनाने सरकारला मदत जाहीर करण्यास भाग पाडले मात्र ही तुटपुंजी मदत मान्य नसल्याने येत्या काळात पिक विमा, अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांच्या अनुदान, एफआरपी प्रमाणे ऊसाला भाव मिळालाच पाहिजे यासह शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी येत्या काळात संघर्ष अधिक तिव्र करणार असल्याचे भाजपा नेते माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी खरोळा ता. रेणापूर येथे एका कार्यक्रमात बोलून दाखविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड हे होते.

रेणापूर तालुक्यातील खरोळा येथे भाजपा संपर्क कार्यालयाचे उद्धाटन आणि कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड हे होते तर याप्रसंगी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, औसा येथील आ. अभिमन्यू पवार, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, लातूर कृऊबा संचालक विक्रम शिंदे, गोविंद नरहरे, राजेश कराड, अमोल पाटील, ओबीसी मोर्चाचे मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ. बाबासाहेब घुले, लातूर ग्रामीणचे अध्यक्ष अनिल भिसे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, रेणापूर पसच्या सभापती बायनाबाई साळवे, उपसभापती अनंत चव्हाण, रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, सतिष अंबेकर, बाबु खंदाडे, रविकांत औसेकर, कार्यक्रमाचे संयोजक जिप सदस्य सुरेंद्र गोडभरले, महेंद्र गोडभरले यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

नव्याने सुरू केलेल्या भाजपाच्या संपर्क कार्यालयातून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा व्यक्त करून रेणापूर तालुका हा लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा गड म्हणून संपुर्ण राज्याला परिचीत आहे. त्यांच्याकडूनच आम्हाला संघर्षाचा वारसा मिळाला असल्याचे सांगून आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालकीचे मांजरा, रेणा साखर कारखाने बंद करून स्वःताचे खाजगी कारखाने चालविण्याचा घाट घातला जात आहे. ते आम्ही कदापी होवू देणार नाही. जिल्हा बँकेने चांगले काम केले तर निवडणुकीला सामोरे जाण्याची भिती का वाटली असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांना उमेदवार मिळणार नाही याची काळजी घेवून त्यांनीच मतदार याद्या तयार केल्या, तरीही ४६ जणांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अर्ज दाखल केले. कटकारस्थान रचून विरोधकांचे सर्व अर्ज छाननीत बाद केले. अपिलात ९ जणांचे अर्ज वैध ठरले त्यातच आमचा विजय झाला असल्याचे सांगून ७२ तासाच्या अन्न्नत्याग आंदोलनाने अतिवृष्टी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यास भाग पाडले. मात्र जाहीर केलेली तुटपुंजी मदत मान्य नाही. एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना ऊसाचा भाव दिलाच पाहिजे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला पाहिजे नाही मिळाल्यास प्रशासनाला कारभार चालवू देणार नाही आणि कोणत्याही मंत्र्यांची गाडी फिरू देणार नाही असा इशारा देवून कॉग्रेस-राष्ट्रवादीवाले विमा कंपनीचे दलाल आहेत असे सांगीतले.

कोरोनाच्या काळात प्रत्येक कुटूंबावर संकट आले ऑक्सिजन अभावी लोकांचे मृत्यु होत असताना ज्यांच्यावर जबाबदारी होती तेच पालकमंत्री कुठे होते असा प्रश्न उपस्थित करून भाजपाने जिल्हाभरात सेवाकार्य मोठया प्रमाणात केले. आम्ही आमदार खासदारांनी आमचा निधी रूग्णवाहीकेसह आरोग्य सुविधेसाठी दिला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी १२५ व्हेंटीलेटर जिल्हयाला पाठविले मात्र ते वापरलेच नाही. हे अत्यंत चुकीचे काम केले असून या काळात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बोलून दाखविले.

गेल्या १५-२० वर्षात अत्यंत देखणा कार्यक्रम पहिल्यांदाच खरोळा नगरीत होत आहे. संपर्क कार्यालय हे जनसेवेचे कार्यालय व्हावे, गोरगरीब दिनदुबळयांचे प्रश्न निकाली निघावेत असे सांगून भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड म्हणाले की, राज्यात अभद्र युतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱ्यांना नागवं करण्याचे आणि सर्व सामान्यांना अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे. मंत्री जनतेच्या सुखदुखात सहभागी होत नाहीत. सत्तेवर येण्यापुर्वी शरद पवार, उध्दव ठाकरे यांनी ५० हजाराची मागणी केली आज सत्तेत बसलेत तरीही अतिवृष्टी, गारपीट, पुरस्थिती झाली असतानाही कसलिच मदत केली नाही. सरकारला कोणाचे घेणेदेणे नाही. या मस्तवाल कॉग्रेस-राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल असे सांगून येत्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मधून भाजपाचाच आमदार होणार असल्याचे बोलून दाखविले.
जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी असताना स्वःताचे कारखाने आणि उद्योग चालविण्यासाठी बॅकेचा पतपुरवठा केला जात आहे. जिल्हा बँकेती अनागोंदी कारभार उघड करण्यासाठी भाजपाने पॅनल उभा केला असून संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, मांजरा, विलास व रेणा कारखान्याकडून गाळप केलेल्या ऊसाला एफआरपी प्रमाणे भाव मिळवून घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल नाही झाले तर एफआरपी साठी येत्या काळात साखर कारखान्यातील ऊसाचा वजन काटा बंद करण्याशिवाय पर्याय नाही.
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सातत्याने शेतकरी आणि सर्व सामान्यांच्या हितासाठी संघर्ष करत असल्याने त्यांना आमच्यात संताजी धनाजी दिसू लागले आहेत. शेतकऱ्यांची आडवणूक करण्याचा प्रयत्न झाला तर आरे म्हणणाऱ्यांना कारेतून उत्तर देवू. पैशाची आणि सत्तेची मस्ती जिरविल्याशिवाय राहणार नाही असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, माझ्यासारखा सहकारी महेंद्र गोडभरलेच्या माध्यमातून मला मिळाला त्यांच्या प्रत्येक कामाला साथ देवू अशी ग्वाही देवून संपर्क कार्यालयास आणि जन्मदिवसानिमीत्ताने शुभेच्छा दिल्या.
यावेळी खा. सुधाकर शृंगारे, आ. अभिमन्यू पवार, किसान मोर्चाचे दिलीपराव देशमुख, रमाकांत फुलारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी जिपचे सदस्य सुरेंद्र गोडभरले यांनी प्रास्ताविकातून मतदार संघात केलेल्या कामाची माहिती दिली तर भाजपाचे कार्यकर्ते महेंद्र गोडभरले यांचा जिल्हा भाजपाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी सिध्देश्वर मामडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी बालाजी आडतराव, दिलीपराव कुलकर्णी, भाऊसाहेब गुळभिले, वसंत करमुडे, राहूल माने, रविंद्र पाटील, चॉदभाई शेख, अभिजीत मद्दे, जलील शेख, नंदकुमार वलमपल्ले, बालाजी खरोळे, सचिन आडतराव, सोमनाथ फुलारी, शालीक गोडभरले, धनंजय कांबळे, खलील ताशेवाले, नारायण राठोड, चंद्रकांत माने, सिध्देश्वर मदने, मुक्तार तांबोळी, राजाभाऊ उकरडे, बालासाहेब बडे, प्रेमनाथ उगीले, दिलीप बरूरे, व्यंकटराव जटाळ, कृष्णा वाघे, राजेश काळे यांच्यासह अनेक गावचे सरपंच, चेअरमन, लोकप्रतिनिधी, भाजपाचे कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.


