30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*गंजगोलाई येथून 'लातूर हेरिटेज वॉक' उपक्रमाला उत्साही वातावरणात प्रारंभ*

*गंजगोलाई येथून ‘लातूर हेरिटेज वॉक’ उपक्रमाला उत्साही वातावरणात प्रारंभ*

लातूर जिल्ह्याच्या स्थापना दिनी पडलं ऐतिहासिक स्थळांच्या भ्रमंतीचं पहिलं पाऊल..

गंजगोलाई येथून ‘लातूर हेरिटेज वॉक’ उपक्रमाला उत्साही वातावरणात प्रारंभ

  • लातूर जिल्हा स्थापना दिनानिमित्त उपक्रम
  • प्रत्येक महिन्याला एका वारसा स्थळी ऐतिहासिक भ्रमंतीचे होणार आयोजन

लातूर, दि. १६ 🙁 वृत्तसेवा) लातूर जिल्ह्याला वैभवशाली इतिहास लाभलेला आहे. या इतिहासाची साक्ष देणारी अनेक वारसा स्थळे जिल्ह्यात आहेत. या वारसा स्थळांची आणि त्यांच्याशी संबंधित इतिहासाची माहिती नवीन पिढीला व्हावी, यासाठी इतिहासप्रेमी नागरिक, इतिहास अभ्यासक आणि लातूर जिल्हा प्रशासनाने ‘लातूर हेरिटेज वॉक’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. आज (दि. १६) लातूर जिल्ह्याच्या स्थापना दिनापासून या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी फीत कापून व तिरंगी बलून हवेत सोडून हनुमान चौक येथे या उपक्रमाची सुरुवात केली.

प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त पंजाबराव खानसोळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी नागेश मापारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, योजना शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे यांच्यासह जिल्ह्यातील इतिहास अभ्यासक, इतिहास प्रेमी शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘लातूर हेरिटेज वॉक’च्या पहिल्या पर्वाच्या उद्घाटनासाठी गंजगोलाई परिसरात सजावट करण्यात आली होती. तिरंगी पताका, ध्वज आणि जागोजागी लावण्यात आलेले ऐतिहासिक स्थळांची माहिती सांगणारे फलक, रांगोळी यामुळे परिसरात उत्साहपूर्ण वातावरण तयार झाले होते. काही विद्यार्थी वासुदेव, गोंधळी अशा वेशभूषेत, तर काही अधिकारी, कर्मचारी, नागरीक पारंपारिक वेशभूषेत हेरिटेज वॉकला उपस्थित होते. हनुमान चौक ते गंजगोलाई परिसरात दोन्ही बाजूला लातूर जिल्ह्यातील वारसा स्थळांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.

हनुमान चौक येथून ढोल आणि बँडच्या तालावर हेरिटेज वॉकला सुरूवात झाली. गंजगोलाईला फेरी मारत उपस्थितांसमोर या वारसा स्थळांचा इतिहास उलगडण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.

हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झालेले लातूरकर गंजगोलाईच्या पूर्व दरवाज्याजवळ आल्यानंतर इतिहास अभ्यासक भाऊसाहेब उमाटे यांनी लातूरचा प्राचीन इतिहास, तसेच गंजगोलाईची जुनी कमान याबाबत माहिती दिली. हेरिटेज वॉकमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांसाठी गंजगोलाईच्या जुनी कमानीची हुबेहूब प्रतिकृती विकास सरकाळे, जितेंद्र जगताप, श्री.मनोज बनाळे व सचिन रणखांब यांनी तयार केली होती. एका दिवसात ही प्रतिकृती तयार करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते तिघांचाही सत्कार करण्यात आला.

हेरिटेज वॉक गंज गोलाईच्या पश्चिम दरवाज्याजवळ आपल्यानंतर याठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टेजवर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास वर्णणारा पोवाडा प्रा. संदीप जगदाळे यांच्या चमूने सादर केला. तसेच पुरणमल लाहोटी शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘शंभरीची झाली गोलाई…’ या गीतावर नृत्य सादर केले.

गंजगोलाईबद्दल माहिती देताना इतिहास अभ्यासक श्री.विवेक सौताडेकर म्हणाले, गंजगोलाई बाजारपेठ ही लातूरच्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. सन १९१७ साली दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गुलबर्ग्याचे सुभेदार (आयुक्त) राजा इंद्रकर्ण बहादूर यांच्या हस्ते गंजगोलाईचे उद्घाटन झाले. व्यापाराच्या, जनतेच्या सोयीसाठी तसेच सौंदर्य दृष्टिकोनातून या गंजगोलाईचा आराखडा परदेशातून शिक्षण घेऊन आलेले फैय्याजुद्दीन या अभियंत्याने तयार केला. गंजगोलाईची गोलाकार वास्तु आकाशातून पाहिली तर सूर्याची किरणे पसरल्यासारखी दिसते व ती जमिनीवरून पाहिली तर उघडलेल्या छत्रीसारखी दिसते. या गोलाकार वास्तुभोवती तब्बल १६ रस्ते एकत्रित येतात. अशी एखाद्या बाजारपेठेची वास्तू देशभरात दुर्मिळच पहायला मिळेल. या गंजगोलाई बाजारपेठेचे १९६० व १९८५ साली नूतनीकरण झाले. आजच्या गोलाकार गंजगोलाईच्या ठिकाणी पूर्वी एक दगडी उंच टॉवर व पूर्व बाजूला एक दगडी कमान होती. जी ‘नांदेड वेस’ या नावाने ओळखली जात होती. अशी ही सर्व सोयींनीयुक्त असलेली गंजगोलाई बाजारपेठ आज १०६ वर्षांची झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूरच्या वैभवशाली इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न : जिल्हाधिकारी

लातूर जिल्ह्याला अतिशय वैभवशाली इतिहास आहे. हा इतिहास आजच्या पिढीपर्यंत पोहचावा, त्याला पुन्हा उजाळा मिळावा, यासाठी ‘लातूर हेरिटेज वॉक’ हा उपक्रम लातूरच्या स्थापनादिनी सुरु होत आहे. यापुढे प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील एका वारसा स्थळी भ्रमंती करण्यात येणार आहे. आपल्या जिल्ह्याचा इतिहास समजून घेण्यासाठी विद्यार्थी, युवकांनी आणि इतिहास प्रेमींनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. आज पहिल्याच हेरिटेज वॉकला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. इतिहास प्रेमी नागरिक आणि इतिहास अभ्यासक यांनी घेतलेल्या पुढाकारातून हा उपक्रम नक्की यशस्वी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]