एमजीएम विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
औरंगाबाद (प्रतिनिधी ) – महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा ही मूल्ये जगाला दिली. त्यासोबतच त्यांच्या ग्रामस्वराज संकल्पनेने येथील खेडे स्वयंपूर्ण होत आहे. त्यामुळे गांधी विचारच सर्व प्रश्नांचे उत्तर असल्याची भावना आदिवासी हक्क कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी व्यक्त केली.

ते एमजीएम विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय, गांधी अभ्यास विभाग तसेच फ्रांसमधील गांधी इंटरनॅशनल अँड कम्युनिटी ऑफ आर्क, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान वर्धा आणि गुजरात विद्यापीठ अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गांधी : शाश्वत समुदायांचा शोध’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय बहुशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाच्या वकील लुब्ना यास्मिन, नेपाळ येथील गांधी पीस फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन थापा, डॉ. रेखा शेळके आणि डॉ. जॉन चेलादुराई उपस्थित होते .

या परिषदेला जगभरातून महात्मा गांधींच्या आयुष्यावरील अभ्यासकांची आणि गांधी समजून घेऊ पाहणाऱ्या व्यक्तिमत्वांची उपस्थिती लाभली होती. ‘बाईमाणूस’ प्रकल्पाचे प्रमुख प्रशांत पवार यांनी देवाजी तोफा यांची मुलाखत घेतली. तर एमजीएम फिल्म आर्टस् विभाग प्रमुख प्रा. शिव कदम यांनी अन्य भाषिक श्रोत्यांसाठी इंग्रजीचे दुभाषिक म्हणून भूमिका बजावली. या वेळी डॉ. तोफा म्हणाले, सत्तेचे विकेंद्रीकरण करून गांधीजींनी गावांना विशेष अधिकार देऊन खेडे समृध्द करण्याची भूमिका घेतल्याने देशाचे फार मोठे कल्याण झाले. यावेळी त्यांनी आदिवासींना बांबू विक्री करण्याचा देशातील पहिला परवाना मिळवून देताना आलेले कटू अनुभव मांडले. आदिवासी मागासलेले आहेत, या मतप्रवाहाचे खंडन करताना त्यांनी आदिवासी भीक मागत नाही की चोरी करत नाही, महिलांचा आदर या समाजात केला जातो, तसेच जल, जंगल, जमीन यांचे रक्षण करून आम्ही पर्यावरणाचा समतोल राखतो, याउलट प्रस्थापित समाज ही कामे केवळ कागदावरच करतो, तरीही आदिवासींनाचा मुख्य प्रवाहात आणण्याची भाषा केली जातेय. तुम्हीच आमची संस्कृती स्वीकारण्याची वेळ आल्याचे देवाजी तोफा यांनी सांगितले. जगात मानवतावाद रूढ करायचा असेल तर गांधीजी अंगीकारल्याशिवाय पर्याय नसल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी त्यांनी ‘गोटूल’ परंपरेचे महत्त्वही विषद केले. मुलाखतीच्या शेवटी आदिवासी संस्कृतीमध्ये आढळून येणारे निसर्गप्रेम, समता आणि मानवता ही मूल्ये अधोरेखित करताना देवाजी तोफा म्हणाले की जगातील सगळ्या समस्यांवर गांधी हाच एकमेव उपाय असून. भारतीय संविधानाला प्रत्येकाने जबाबदारीने समजून घेतले ते कसलाही भेदभाव उरणार नाही. आम्हीदेखील गांधीजींच्या शिकवणीवर एवढा प्रदीर्घ लढा दिला आणि त्यामुळेच आम्हाला खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होता आल्याचे प्रतिपादन देवाजी यांनी केले.

शनिवार, ४ फेब्रुवारी २०२३ रोजी परिषदेचा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. सकाळी १० वाजेपासून उपविषयनिहाय एकाच वेळी वेगवेगळ्या चार ठिकाणी शोधनिबंध वाचण्यात आले. या परिषदेसाठी जगभरातून ११० अभ्यासकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८० जनांनी शोधनिबंध वाचन केले. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या चमूने सुरुवातीला भजन सादर केले. दरम्यान परिषदेतील उत्कृष्ट शोधनिबंध लेखन प्रमाणपत्र देऊन महागामी गुरुकुलच्या संचालक डॉ. पार्वती दत्ता यांचा कुलपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रिहाना सय्यद यांनी तर आभार डॉ. तन्वीर हुंडेकरी यांनी मानले. या परिषदेच्या यशस्वीतेसाठी एमजीएम विद्यापीठाच्या विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
—