गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने….।

0
377

आज तीव्र आठवण होतेय असे एक
मला भेटलेले एक महागुरू
* धनंजय देशपांडे

शाळेत, कॉलेजात मला जे जे गुरु मिळाले ते ते सगळे उच्चच होते. मीच कदाचित घ्यायला कमी पडलो असेन पण ते द्यायला कधीच कमी पडले नाहीत. मात्र बिनभिंतीच्या या उघड्या शाळेत मात्र मला अवचितपणे असे काही महागुरू लाभले की…. :”जीवन सफल हो गया”
त्यापैकीच एका गुरुचे आजच्या गुरुपौर्णिमेदिनी स्मरण !
*
जमिनीवर कसं रहावं, हे माझे एक महागुरू आदरणीय मंगेश तेंडुलकरांनी एकदा त्यांच्या कृतीतून शिकवल्याची ही सत्यकथा
**
एका नामांकित संस्थेच्या कार्यक्रमात आम्ही एकत्रच होतो, तेव्हा हळूच मला म्हणाले,
“नंतर काय प्रोग्रॅम तुमचा?”
मी म्हटलं, “काही विशेष नाही”
तर म्हणाले, “चला, मग माझ्या घरी”
आणि आम्ही मग घरी गेलो.
तर घरी आल्यावर त्यांनी ते नुकतेच मिळालेले भव्य सन्मानचिन्ह दिवाणखान्यातील गणपती समोर त्यांनी ठेवले.
बाप्पाला हात जोडले. नंतर सन्मानचिन्ह उचलून कपाटात ठेवलं!
आणि काकूंना आवाज दिला, “अहो, तुमचे देशपांडे आलेत”
तोवर काकूंनी नेहमीप्रमाणे कोकणी खाऊ व कोकम समोर आणून ठेवलं. त्याही तिथेच शेजारी बसल्या.
मी विचारलं, “सर एक विचारु का?”
ते म्हणाले, “परवानगी कधीपासून लागायला लागली?”
मग धीर एकवटून मी विचारलं, “तुम्ही फार धार्मिक नाही, अर्थात नास्तिक पण नाहीत. पण आवर्जून पूजा देव देव फार करत नाही. मग तरी ट्रॉफी गणपतीसमोर ठेवली आणि नंतर उचलून कपाटात ठेवली. असं का ?”
तर म्हणाले “ज्याच्यामुळे मी चित्र काढायला शिकलो त्या बाप्पाला आपण जे काही केलं त्याचे रिपोर्टींग करायचं, त्यातून मिळालेलं त्याच्या पायाशी ठेवून त्याच्याच हवाली करायचं. मग ती त्याची वस्तू झाली. म्हणून ती कपाटात ठेवायची. असं केल्याने मग आपण त्या सन्मानात अडकून पडत नाही”
**
जमिनीवर कसे राहावे, हे किती कमी शब्दात सांगून गेले ते !
अर्थात माझ्या ऑफिसचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झालेले तेव्हा दाराजवळच असलेली आमच्या एजन्सीला मिळालेल्या काही पुरस्कार / ट्रॉफीजची रॅक होती. ती पाहून ते म्हणाले होते, “ट्रॉफीज ठेवण्यासाठी रॅक वाढवावी लागेल. जागा आताच तयार करून ठेवा.”
आणि त्याचे ते शब्द अक्षरशः खरे ठरले. वर्षभरात नवीन दोन रॅक कराव्या लागल्या.
इथं मला एक आश्चर्य वाटलं की, स्वतः अशा कोणत्याच ट्रॉफीमध्ये न अडकणारे मंगेशजी मला मात्र त्यासाठी रॅक वाढवा म्हणून प्रोत्साहन का देत असतील? हेही नंतर त्यांना विचारलं तेव्हा एकच वाक्य म्हणाले, “तुम्ही पण पंचाहत्तरीचे झालात की आपोआप कळेल सगळं. कारण ज्या वयात टॉनिक म्हणून जे लागत तेच कदाचित नंतर पचायला सुद्धा जड जात. तसेच हे ट्रॉफीजचे असते”
किती साध्या शब्दात जगण्याची कला शिकवून गेले.
**


असे गुरु मिळाले म्हणून माझीही वाटचाल थोडीफार सुकर होत गेली!
@ dd
*
सर्वाना गुरुपौर्णिमेच्या विनम्र शुभेच्छा ! गुरूंना लीन व्हा…. आनंदात विलीन व्हाल !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here