बोरगावकर बंधूंचे होणार गायन – वादन
लातूर दि. २२ अभिजात शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारासाठी आवर्तन व अष्टविनायक प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रतिमाह निशुल्क अभिजात शास्त्रीय संगीताच्या मैफिली घडवून आणल्या जात आहेत. शंभराव्या मैफलीच्या उंबरठ्यावर असतानाच ९९ वी मासिक संगीत लातूरकरांसाठी संस्मरणीय व्हावी यासाठी गुरुवार दिनांक २५ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता ९९ व्या संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफिलीत महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायक सुरमणी पंडित बाबुराव बोरगावकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.

त्यांना तबल्याची साथ संगत तालमणी पंडित डॉ.राम बोरगावकर हे करणार आहेत. तर संवादिनीची साथ सौ मधुवंती बोरगावकर, देशमुख या करणार आहेत. पंडित बाबुराव बोरगावकर यांना घरातून संगीताचा वारसा मिळाला. यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण बाबा बोरगावकर यांच्याकडे झाले .त्यानंतर वडील गोविंदराव बोरगावकर यांनी त्यांना संगीताचे धडे दिले. पुढे त्यांनी पुणे येथे सदाशिवबुवा जाधव यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे शिक्षण प्राप्त केले. पं. बलवंतराय भट यांच्याकडून बनारस येथून किराणा घराण्याची गायकी आत्मसात केली तर मराठवाड्यातील थोर गायक पंडित डॉ. स. भ.देशपांडे यांच्याकडून औरंगाबाद येथे जाऊन विधिवत तालीम घेतली.

संगीत प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील विविध संगीत संमेलनातून हजेरी लावली आहे. संगीत ग्रंथ लिहून संगीत प्रचार केला आहे तर अनेक शिष्य घडवून संगीत क्षेत्राला मोलाचे योगदान दिले आहे.पंडित डॉ.राम बोरगावकर यांनी सुद्धा बनारस घराण्याची तालीम घेऊन संगीत प्रचारार्थ मोलाचे योगदान दिले आहे.

निःशुल्क असलेल्या या संगीत सभेचा आस्वाद रसिकांनी व संगीत साधकांनी घ्यावा असे आवाहन आवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय शहा सचिव डॉ. रवीराज पोरे, प्रा.शशिकांत देशमुख, डॉ. संदीपान जगदाळे , प्रा. हरीसर्वोत्तम जोशी, संजय सुवर्णकार, व्यंकटेश पांचाळ, सतीश मिरखलकर, महेश काकनाळे यांनी केले.