औसा – (प्रतिनिधी ) — शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे अतोनात नुकसान झाले आहे. शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झाल्यास नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देण्याची सध्या तरतूदच नाही.यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांनी दि. २ आॅगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन सरकारने बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस पिकाचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत देण्याची तरतूद केली होती. त्याच धर्तीवर शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई नैसर्गिक आपत्ती अंतर्गत देण्याची तरतूद करावी अशी विनंती केली. उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
आ. अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत लातूर जिल्ह्य़ात जवळपास ५ लाख ७५ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून संततधार पावसामुळे व शंखी गोगलगायीच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रादुर्भावाने पिके नष्ट झाली आहेत. शासनाच्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत च्या निकषात पिकांवर होणारे किड हल्ले हि बाब समाविष्ट आहे. परंतु शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने नुकसानीचा समावेश नसल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत देता येत नसल्याचे महसूल विभागाचे मत आहे. सन २०१७ बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हा शासनाने या संदर्भात एक शासन निर्णयानुसार पिकांच्या बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा समावेश नैसर्गिक आपत्तीच्या निकषात करून शेतकर्यांना एनडीआरएफ /एसडिआरफ आर्थिक मदत वितरित केली होती.
लातूर जिल्ह्य़ात शंखी गोगलगायीचे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली असून उगवलेली कोवळी पिकेही गोगलगाय खावून फस्त करित आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून उन्नतीची आशा मावळली आहे. त्यामुळे शेतकरी हाताश झाला आहे. शंखी गोगलगाय प्रादुर्भावाने नुकसानीपोटी भरीव आर्थिक मदत शेतकऱ्यांना करण्याची आवश्यकता आहे. यामुळे राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या एनडीआरएफ /एसडिआरफ निकषात बोंडअळीच्या धर्तीवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची मदत देण्याचा समावेश करण्यात यावा तसेच सदरील नुकसानीचे पंचनामे करून जास्तीत जास्त आर्थिक मदत त्वरीत देण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती या निवेदनाव्दारे आ. अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे कोवळी पिके मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली असून संभाव्य उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट दिसून येत आहे. या बाबीचा विचार करून प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या तरतुदीनुसार विमाधारक शेतकऱ्यांना २५% आगाऊ पीकविमा वितरित करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधी यांना देण्यात याव्यात अशीही आग्रही विनंती यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी केली.




