लातूर दि. १३ – अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांकरीता लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ किचकट प्रक्रीयेमुळे बहुतांशी कुटूंबाना होवू शकला नाही. कृषी विभागाच्या इतर योजनेप्रमाणेच सदरील विमा योजना तात्काळ ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी राज्याचे कृषीमंत्री यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही महत्वकांक्षी योजना सन २०१६-१७ पासून सुरू करण्यात आली आहे. राज्यातील कष्टकरी शेतकरी याचा अपघाताने मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबावर येणाऱ्या संकटाला मदत व्हावी म्हणून शासनामार्फत वारसदाराला आर्थिक मदत केली जाते.
मागील काही वर्षातील आकडेवारी पाहता सदर योजनेचा उद्देश व्यवस्थितरित्या सफल झालेला नाही असे दिसून येते. आधीच संकटात असलेल्या बळीराजास किंवा त्याच्या वारसदारांना कागदपत्रांसाठी विविध कार्यालयात खेटा माराव्या लागतात ही बाब अत्यंत चिंताजनक व असंवेदनशील आहे असे नमुद करून आ. रमेशअप्पा कराड यांनी दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, प्रस्ताव पूर्णपणे दाखल करूनही विमा कंपनी वर्षानुवर्ष नुकसान भरपाई रक्कम अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या अथवा वारसदार कुटूंबाच्या खात्यावर जमा करत नाही.

कृषी विभागाच्या विविध योजना ऑनलाईन पद्धतीने राबविल्या जात आहेत. परंतू केवळ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा ही एकच योजना ऑनलाईन पद्धतीने राबविली जात नाही. ज्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे तो उद्देश पुर्ण होण्यासाठी आणि अपघातग्रस्त शेतकरी अथवा त्यांच्या कुटूंबीयांना मदत मिळण्यासाठी सदरील योजना तात्काळ ऑनलाईन पध्दतीने राबवावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
