मुचकुंदीच्या भेटी मांडवी आलीसे।
लांजा (रत्नागिरी) ः-( प्रकाश क्षीरसागर )- महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या लांजा शाखेने गोव्यातील कवि- कवयित्रींचा ‘गंध मातीचा छंद कवितेचा’ हा आगळावेगळा व गोमंतकीय संस्कृती व कवितेचे दर्शन घडविणारा कवितेचा व गोमंतकीय ओव्या व लोकगीतांचा कार्यक्रम अलीकडेच आयोजित केला होता.
लांजा असो वा गोवा, मानवी जीवन भावजीवन सर्वत्र तेच आहे. फरक असेल तर तो थोडाफार तपशिलाचा. गोमांतकीय भूमीच्या प्राकृतिक सौंदर्याइतकाच इथल्या लोकवाड:मयीन संस्कृतीचा गंध व कवितेची अमीट गोडी ही रसाळ, गोमटी असून,त्या निमित्ताने गोमंतकीय लोकवाड्मयीन संस्कृती व कवितेचे मनोज्ञ दर्शन घडविणा-या कार्यक्रमातून मुचकुंदीच्या (नदीच्या)भेटीला साक्षात मांडवी भेटायला आली, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या शाखेचे लांजाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विलास कुवळेकर यांनी व्यक्त केले.
लांजा शहरातील माऊली सभागृहात स्त्री – पुरुष प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ओव्यांच्या साथीने जात्यावर दळण दळले जात होते आणि त्यातून जणू गोमंतकीय कवितेचे पीठ पडत होते. जोडीला नैसर्गिक पाऊसही अधूनमधून बरसत होता. या अनोख्या समारोहात लांज्यातील रसिक न्हाऊन निघाले. या कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक करावेसे वाटते अशी प्रतिक्रिया या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी खास रत्नागिरीहून आलेले कोकण मीडियाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांनी दिली. गोव्याच्या भूमीत इंग्रजी व कोकणी भाषेचे प्रभुत्व असतानाही माय मराठीची सेवा करतानाच तिची थोरवी गाण्यासाठी आयोजिलेल्या ‘गंध मातीचा छंद कवितेचा’ या कार्यक्रमातून गोमंतकीय भूमीतील लोकसाहित्याच्या प्रसिद्ध अभ्यासिका पौर्णिमा केरकर, गझलकार प्रकाश रामचंद्र क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्त्या कवियित्रि चित्रा क्षीरसागर, गोव्यातील साहित्य विश्र्वात आपल्या साहित्यकृतींनी मुद्रा उमटविणा-या दीपा मिरिंगकर, आसावरी कुलकर्णी, शुभदा च्यारी, रजनी रायकर व विठ्ठल शेळके या प्रामुख्याने मराठी भाषेत लेखन करणा-या साहित्यिकांनी एकापेक्षा एक सरस व सकस कवितांचे वाचन करित गोमंतकभूमीतील लोकजीवन, स्त्रीजीवन, निसर्ग व संस्कृती यांचे सप्तरंगी कोलाज उलगडून दाखविले. त्याला लांज्यातील संस्कृतीप्रेमी साहित्यरसिकांनीही टाळ्यांच्या कडकटाने मनमुराद दाद दिली.
या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात चित्रा क्षीररसागर यांनी सादर केलेली ‘आताशा पोरी’ ही कविता एकविसाव्या शतकातील नव्या आत्मनिर्भर स्त्रीशक्तीचा प्रत्यय करुन देणारी ठरली. लोकवाड्मयाच्या अभ्यासिका पौर्णिमा केरकर यांनी सादर केलेल्या ‘बापांनी पुरयिले’ या कवितेतून बाप-मुलीच्या नात्यातील ह्दयस्पर्शी नातेसंबधांवर भाष्य केले.’असे असावे जीवन माझे आयुष्यात एकदा फुलावे’ ही सात वर्षातून एकदा कोकणातील कातळसड्यांवर उगविणा-या ‘कारवी’ या वनस्पतीचे जीवनगाणे गाणारी आसावरी कुलकर्णींची कविता, ‘आज भूमी श्रावणाने धुंद झाली कोंब येता पावसाने धुंद झाली’ या प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांच्या गझलेला रसिकांनी टाळ्यांनी दाद दिली.
रजनी रायकर यांनी ‘बाप मायेचा झरा’ तर दीपा मिरिंगकर यांनी ‘तू आषाढीला जा मी कार्तिकीला जाईन’ विठ्ठल शेळके याने त्याच्या बोलीभाषेतील तर शुभदा च्यारी हिने आपल्या कवितेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विठ्ठल शेळके व शुभदा च्यारी या द्वयीच्या आशयघन व ओघवत्या निवेदनाने श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध झाला. ‘युगाचा अंत’ ‘झाड कोसळंत’ ही, पाण्याआधी वळण बांधावं सखी, इकडे तिकडे चहुकडे पाणीच पाणी चहुकडे,’ आदि कविता व गझलांनी श्रावणधारा बरसण्याच्या पूर्वसंध्येलारत्नागिरी जिल्ह्यातील लांजा सारख्या छोटेखानी शहरात निसर्गरम्य व साहित्याची खाण असलेल्या गोमंतकीय भूमीतील तब्बल आठ कवी – कवयित्री एकाच मंचावर येण्याची ही पहिलीच वेळ होती.
उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध कवयित्री व सामाजिक कार्यकर्त्या चित्राताई क्षीरसागर, न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, कार्यवाह विजय खवळे, लोकमान्य वाचनालय लांजाचे उपाध्यक्ष योगेश वाघधरे, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई शाखा लांजाचे अध्यक्ष किरण बेर्डे आदि मान्यवर व्यासपीठावर होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मसापच्या विजयालक्ष्मी देवगोजी, विजय हटकर, महेंद्र साळवी, लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष ऍड. अभिजित जेधे, योगेश वाघधरे, उमेश केसरकर, रामचंद्र लांजेकर यांनी विशेष मेहनत घेतली. उद्घाटन समारंभाचे निवेदन विजय हटकर यानी केले. आभार उमेश केसरकर यांनी मानले.