–दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मधल्या रस्त्याचे भाग्य उजळणार
……
वडवळ नागनाथ: केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने महाराष्ट्र- कर्नाटकातील ग्रामीण भागाला जोडण्यासाठी “जिंतूर ते भालकी” या राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी आता निधी देण्यास सुरुवात केली आहे. दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा “घारोळा- वडवळ नागनाथ- झरी ते कोपरा” या अत्यंत वर्दळीच्या मधल्या २६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी सन २०२२-२३ च्या वार्षिक आराखड्यामध्ये एकशे ३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी खासदार सुधाकरराव शृंगारे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याला निधी उपलब्ध झाल्यामुळे वडवळ नागनाथ आणि परिसरातील गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मराठवाडय़ातील विशेषतः ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन केंद्रीय भुपृष्ठ, व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जुन्या आणि मोठ्या रहदारीच्या अरूंद रस्त्यांचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करून देशासह राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रे आणि पर्यटनस्थळे हे नॅशनल हायवेशी जोडण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे. चाकूर तालुक्यातून गेलेल्या “रत्नागिरी- नागपूर” तसेच अहमदपूर तालुक्यातून गेलेल्या “चाकण- अंबाजोगाई- किनगाव ते अहमदपूर” या दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा “जिंतूर ते भालकी” या मधल्या रस्त्याचे ७५२- के हा क्रमांक देऊन राष्ट्रीय राज्य महामार्ग म्हणून रूपांतर केले.

सहा वर्षांपूर्वी मंजुरी दिलेल्या या रस्त्यासाठी वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टप्प्याटप्प्याने निधी देण्याचे काम सुरू केले आहे. “घारोळा- वडवळ ते कोपरा” या रस्त्याला ता.२९ मार्च रोजी तांत्रिक, प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी दिली असून, याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या सहा महिन्यात रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
…..
सद्यस्थितीत हा रस्ता पावणे चार मीटर तर कुठे साडेपाच मीटर रुंदीचा आहे. नव्याने होणारा हा रस्ता आता सात मीटरचा तसेच गावांमध्ये दोन्ही बाजूच्या नाली बांधकामासह दहा मीटर रुंदीचा हॉटमिक्स डांबरीकरणाचा होणार आहे. सध्या या रस्त्यावर छोटे पूल, मोर्या असल्यामुळे पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहताना रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत होत होती. नवीन कामात या सर्व मोर्या आणि पुलांची उंची वाढवून मोठ्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही.

- दिलीप हावळे, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग- लातूर.
…..
संजीवनी बेट आणि नऊ नाथांपैकी एक ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथाच्या मंदिरामुळे वडवळ नागनाथ (ता.चाकूर) हे गाव राज्याच्या पर्यटन नकाशावर आहे. टोमॅटो उत्पादनातही हे गाव राज्यात अग्रेसर आहे. तीन हंगामात दररोज तीस ते चाळीस ट्रक भाजीपाला विक्रीसाठी राज्यसह परराज्यात पाठवला जातो. येथील अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. नव्याने होणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गामूळे वडवळसह या भागातील गावच्या विकासाला खुप मोठी गती मिळणार असून, येथे येणाऱ्या पर्यटक, भाविक तसेच व्यापाऱ्यांची मोठी सोय होणार आहे. - बालाजी गंदगे, उपसरपंच, वडवळ नागनाथ.




