लई भारी,झाली घुमान वारी…
“नानक साई फाऊंडेशन ची घुमान यात्रा म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्रात बंधू भाव निर्माण करणारी एक चळवळ. आज जगातील अराजकता लक्षात घेतली तर हा संप्रदाय वृद्धिंगत करून एक वैश्विक संदेश देण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे.घुमान यात्रा त्या गरजेचा एक भाग आहे. नेमके तेच काम ज्ञानदेवांच्या कार्याची धुरा पुढे चालवने त्याला स्वकर्तृत्वाची जोड देणे आणि मानवी जीवन समृद्ध करण्याचे काम संत नामदेवांनी केले.आज एकविसाव्या शतकात काही प्रमाणात नानक साई फाऊंडेशन कडून करून घेले जात आहेत.”
2021-23 ते 28 आक्टोबर हे सहा दिवस नेहमीपेक्षा खूपच वेगळे, ऊर्जामय व आनंददायी होते.याच कारण होत सुनियोजन, प्रसन्न वातावरण व सात्विक भोजना सहीत भारावलेल्या विश्वात वावरत हवाई सफरी द्वारे केलेली नानक साई फाऊंडेशन ची घुमान वारी. कदाचित हेच वातावरण पंढरपूर वारीत ओढीने अनुभवास येत असावं. यात्रेची सुरवात नांदेड ते अमृतसर विशेष जम्बो विमानाने,पुढील प्रवास पंजाब, हिमाचल प्रदेश वातानुकुलीत आरामदायी बसने झाला. पहिला मुक्काम परजिया पिंड या सधन सेवाभावी खेडेगावात झाला. येथील मुक्काम,तेथील गावकऱ्यांचा सेवाभाव अचंबित मंत्रमुग्ध करणारा. आपल्याकडे रक्ताच्या नात्यातील आलेल्या पाहुण्या संदर्भात आपला दृष्टीकोन आठवून स्वतः ची लाज वाटली. त्या गावातील प्रत्येकाने पंजाबी पद्धतीने आपल्या घरात सामावून पाहुणचार केला. सेवाभावी हे आदरातिथ्य हीच मंडळी करू जाणे ।।
नानक साई फाऊंडेशन ची घुमान यात्रा म्हणजे पंजाब आणि महाराष्ट्रात बंधू भाव निर्माण करणारी एक चळवळ.. यात्रेच्या प्रवासात परजिया कलान,विरासत खालसा म्युझियम, आनंदपूर साहिब तख्त, हिमाचल प्रदेशातील शक्तीपीठ माता नैना देवी, आशिया खंडातील सर्वात उंच भाकरा नांगल धरण, कार्तिकी स्वामी अचलेश्वर धाम, सुवर्ण मंदिर, जालीयनवला बाग, आटारी वाघा बॉर्डर आदि प्रेक्षणीय स्थळाना भेटी दिल्या.आटारी वाघा सीमेवरील सायंकाळी ध्वजावतरण सोहळा पाहताना भारतीय प्रेक्षागृहात पाच सहा हजार देशभक्तीत रमून उत्साहित प्रेक्षक तर विरुद्ध वाघा बाजूला दोनशे अडीचसे पाकिस्तानी जणू ते भारतीय सोहळा पाहायला आलेले वाटले..
विमानाने हाय टेक पद्धतीने पार पडलेली ही सातवी घुमान यात्रा, साजऱ्या होणाऱ्या नामदेवाच्या 751 व्या जन्म शताब्दी वर्षाच्या संदर्भामुळे अनन्यसाधारण ठरणारी आहे. हिंगोली जिल्ह्यातील नरसी या छोटयाशा गावातून भागवत वैष्णव धर्माची पताका पंजाबात रोवून पवित्र गुरुग्रंथ साहिबात आपल्या अमृतमय अभंग वाणीला स्थान मिळवणारे संत शिरोमणी व कीर्तन रंगीं नाचून ज्ञानदीप जगी लावणाऱ्या नामदेव महाराजांची कर्मभूमीची ही अप्रतिम, अवर्णनीय, अतुलनीय जणुकाही कुंभमेळा अशीही यात्रा झाली. बहुजन समाजात जन्मलेल्या या भगवद भक्ताने आपल्या रचनेतून तत्कालीन सामाजिक स्थितीचे दर्शन घडविले. खरंतर नामदेवांना वारकरी संप्रदायचे आध्य प्रभावी प्रचारकच म्हणावे लागेल. बहुजनामध्ये आत्मविष्काराची उर्मी चेतवणाऱ्या नामदेवानी सर्वसामान्य जणांना सुलभ नामस्मरणाचा मार्ग दाखविला. विधायक विचारांची शिदोरी वाटणारे व अपूर्व संघटना कौशल्य असलेले नवीन आव्हानांना सामोरे जात नवनवीन संकल्पना अमलात आणून नवीन आयाम निर्माण करणारे नानक साई परिवाराचे प्रमूख पंढरीनाथ बोकारे यांच्या कल्पनेने साकारली जाणारी ही यात्रा महाराष्ट्र पंजाब यांच्यातील भक्ती आणि शौर्य तसेच दोन संस्कृतीला जोडून चैतन्य ओलावा निर्माण करणारी आहे. हाडाचा पत्रकार म्हणून परिचित ह्या माणसाचा दोन्ही राज्यातील जनसंपर्क अचंबित करणारा आहे. प्रत्येक स्थळी मंत्री दर्जाच्या मंडळीकडून झालेला सत्कार वेगळी अनुभूती देत होता. दोन राज्यांना सामाजिक अध्यात्मिक बंधुप्रेमाने जोडणारी ही एक चळवळ वाटली. प्रवासात सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक दीपकसिंग गौर,नामदेवाच्या भूमिकेत डॉ.प्रा.गजानन देवकर, पत्रकार राजेश मुखेडकर, डॉ.मनीष वडजे,सौभाग्यवती प्रफूलाताई बोकारे यांचे अनुभवी आणि सिद्ध मार्गदर्शन खचितच वैचारिक देवाणघेवाण करणार होत. अस्मादिकानीही ज्ञात असलेल्या रेकी, प्राणिक, लामाफेरा, योगा उपचारा बद्दल उपस्थिताना सप्रयोग अनुभूती दिली व मनोरंजन केले.वायू्यानाद्वारे पार पडलेल्या या वारीत पहिल्यांदा काही मंडळी भेटली व कायमची जोडली गेली. भेटीच्या प्रत्येक स्थळी वाद्यवृंदाचे साथीने निघणारी शोभायात्रा व भव्य दिव्य स्वागत रोमहर्षक होते. आयोजन समितीचे खूप अभिनंदन उत्तम नियोजन आणि सर्वांशी आस्थेने संवाद साधणारे घुमान चळवळीचे मुख्य प्रवर्तक पंढरीनाथ बोकारे,प्रफुल्लाताई बोकारे, तेजश्री पवार, श्रेयस बोकारे, सरदार जसदीपसिंग, डॉ, देवकर, मुखेडकर यांच्या नामोल्लेखशिवाय यात्रा सुफळ संपूर्ण होऊच शकत नाही.

आज जगातील अराजकता लक्षात घेतली तर हा संप्रदाय वृद्धिंगत करून एक वैश्विक संदेश देण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे.घुमान यात्रा त्या गरजेचा एक भाग आहे. नेमके तेच काम ज्ञानदेवांच्या कार्याची धुरा पुढे चालवने त्याला स्वकर्तृत्वाची जोड देणे आणि मानवी जीवन समृद्ध करण्याचे काम संत नामदेवांनी केले.आज एकविसाव्या शतकात काही प्रमाणात नानक साई फाऊंडेशन कडून करून घेत आहेत.. या प्रवासात प्रत्येक ठिकाणी पंजाबी आयोजक निवास भोजनाची उत्तम व्यवस्था करतात. प्रेम जिव्हाळ्याचे दर्शन घडते. सहकार्य परोपकार व उच्चतम मानवतावाद अनुभवण्यास मिळतो. अशा या घुमान यात्रेत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत आहे व बोकारे यांच्या कार्याचा चढता आलेख पहावयास मिळत आहे.त्यांच्या या मानवीय कार्याला वंदन व भरभरून शुभेच्छा.
घुमान प्रवासाची ही शिदोरी आयुष्याचे भांडवल ठरणार आहे. यात्रेतील प्रत्येक क्षण अन क्षण हृदयात सामावलेला असून क्षणचित्रे अजूनही दृष्टीपटलावर आहे. सोनेरी अनमोल क्षणाची संत नामदेव यांच्या जन्मभूमी व कर्मभूमी यातील सुसंवाद दोन संस्कृतीचे मनोमिलन घडवीणारी तेजोवलयांकित तृप्तीचा ढेकर देत ही ज्योत अशीच तेवत ठेऊ.आता ओढ पुढच्या घुमान वारीची….
….. दिलीप या. जाधव
 औरंगाबाद 
 9011362555


