39 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeलेख*चला तर मग महेंद्र सेठिया होऊ या …….!!!*

*चला तर मग महेंद्र सेठिया होऊ या …….!!!*

यशोगाथा

माणसाचे माणूसपण सतत वाढवत न्यावे लागते. निकोप समाज व्यवस्थेसाठी चांगले शिक्षण मिळत राहणे खूप गरजेचे असते. फक्त पाठपुस्तकी शिक्षण देवून माणूसपण विकसित होत नाही तर त्याला जोड अनेक गोष्टींची द्यावी लागते. शैक्षणिक कार्य आज फक्त शाळा,महाविद्यालय, शिकवणी वर्ग यांच्या पुरते सीमित होताना दिसत आहे. शैक्षणिक कार्य ही लोक चळवळ व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजे. देशातील प्रत्येकाने यथाशक्ती या पवित्र कार्यात योगदान केले पाहिजे.

‘प्रत्येकात एक अभिजात पूर्णत्व असते त्याचे प्रगटीकरण म्हणजे शिक्षण.’ या स्वामी विवेकानंदांच्या विचाराला तत्व माणून ज्ञान प्रबोधिनी सतत प्रयत्न करत असते. त्याचे खूपच चांगले परिणाम होताना दिसत आहेत. ज्ञान प्रबोधिनीचे शैक्षणिक प्रयोग समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोंचावेत म्हणून महेंद्र सेठिया नावाचे एक वादळ अफाट शक्तीने महाराष्ट्रभर फिरत होते. गावागावातील शाळेत जाऊन मुलांशी बोलणे. पालकांशी आणि शिक्षकांशी बोलणे त्यांचे प्रबोधन करणे. मुलांच्या शिक्षणात त्यांचे महत्व व त्यांनी करावयाचे काम समजून सांगणे असे अविरत चालू होते. मुलांच्या सर्वंकष विकासाच्यासाठीचे मासिक छात्र-प्रबोधन याचे महेंद्रभाई संपादक. प्रचंड झपाटलेला माणूस.निशिदिनी एकच ध्यास म्हणजे विद्यार्थ्यांचा,तरुणांचा विकास.

मासिक हे तर माध्यम होते. मासिकाच्या माध्यमातून गावोगावी शैक्षणिक परिवर्तनाची कृतीशील चळवळ उभी करणे हे ध्येय होते.मासिकाच्या माध्यमातून खूप सकस साहित्य उपलब्ध करून देण्यासाठीचे महेंद्रभाईचे कल्पक प्रयत्न अफाट होते. फक्त कविता,गोष्टी किंवा विनोद यापुरते सीमित न राहता मासिकात अनेक कृतीशील उपक्रम दिले जातात. मुलं ती करायची आणि त्यातून त्यांचे अनुभव शिक्षण व्हायचे. मुलांचे विचारविश्व आणि भावविश्व समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज लेखकांच्याकडून,विचारवंताच्याकडून लेख लिहून घेणे अतिशय अवघड काम. महेंद्रभाईंचा पाठपुरवा करण्याचे कौशल्य फारच जबरदस्त. आज ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना छात्र प्रबोधनच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. त्याचे अनेक पुस्तकात रुपांतर ही झालेले आहे.

महेंद्रभाई ज्ञान प्रबोधिनीचे विद्यार्थी. प्रबोधिनीचे आद्य संचालक आप्पासाहेब पेंडसे यांच्या सहवासात त्यांना आयुष्याचे ध्येय गवसले. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते ज्ञान प्रबोधिनीचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करू लागले.त्यांच्या कामाचा उरक अफलातून आहे. नाविन्याची ओढ तर विचारूच नका. देशात नवीन काही आलं तर ते आपल्याला पहिल्यांदा महेंद्रभाई वापरताना दिसतील. संपर्क करण्याचे कौशल्य तर सर्वांनी महेंद्र भाईनच्याकडून शिकले पाहिजे. मासिक चालवणारा एक संपादकच ते नाहीत तर हाडाचे संघटक पण आहेत. कुठलेही कमिशन न देता. कुठलेही मानधन न देता त्यांनी छात्र प्रबोधनच्या शैक्षणिक चळवळीचे शंभरावर केंद्र महाराष्ट्रात उभी केली. छात्र प्रबोधन वाचणारे फक्त वाचक न राहता शैक्षणिक चळवळीचे कार्यकर्ते झाले. एका मासिकाच्या माध्यमातून एवढे अफाट काम उभे राहू शकते याची कल्पना पण कुणी केली नसेल.

मासिकाचा दर्जा उत्तम असला पाहिजे.फक्त गुळगुळीत पाने नाही तर प्रत्येक पान हे जीवन घडविणारे असले पाहिजे. जागेचा परिपूर्ण वापर केला पाहिजे. ज्ञान प्रबोधिनी तर एक संघटना. अत्यंत उत्तम मासिक चालवण्यासाठी आर्थिक खूप मोठी ताकद लागते. तशी ताकद उभी करणे खूप जिकीरीचे काम. महेंद्रभाईनी छात्र प्रबोधनला लोक चळवळीचे स्वरूप देत असताना त्याचे नाते सर्वांशी भावनिकदृष्ट्या पण विकसित केले. समाजातील अनेक दात्यांनी या चळवळीस यथाशक्ती मदत केली.छात्र-प्रबोधनच दिवाळी अंक म्हणजे प्रत्त्येक विद्यार्थांनी आपल्या संग्रही ठेवण्याचा ठेवा. महाराष्ट्रात सर्वत्र संचार करत असताना जमा होणारे ज्ञानाचे संचित भाई प्रत्यक्ष कृतीत उतरावयाचे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी ग्रामीण अंक. हिंदी व इंग्रजी भाषिक विद्यार्थ्यांच्यासाठी हिंदी व इंग्रजी अंक. आपले वाचक वयाने वाढत आहेत. ते आता कार्यकर्ते बनत आहेत मग त्यांच्यासाठी युवा अंक. वाचता येणारे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी बोलका अंक. अंध मुलांच्यासाठी ब्रेल लिपीतून अंक. कोविडच्या काळात तर दऱ्या खोऱ्यातील मुलांना फोन वर कथा गोष्टी ऐकायला मिळाव्यात म्हणून त्यासाठीची उपलब्धता. ऐपावा सारखा उपक्रम. असे अनेक आयाम आपण छात्र प्रबोधनचे पाहिले.

छात्र प्रबोधन आणि महेंद्रभाईना अनेक पुरस्कार मिळाले. सर्वात जास्त वाचला जाणारा व मुलांना आवडणारा दिवाळी अंक हा पुरस्कार तर त्यांना आपण सर्वानी मिळून दिला. छात्र प्रबोधनच्या वाचकांच्यासाठी शिबिरे,सहली,लेखकांशी गप्पा असे अनेक उपक्रम. पालकांच्यासाठी आणि शिक्षकांच्यासाठीचे उपक्रम. मनुष्य घडणीचे अनेक उपक्रम घेण्यात आली. आज अनेक वाचक हे कर्ते कार्यकर्ते,अभ्यासक,अधिकारी ,पदाधिकारी झाले आहेत. कृतीशील शिक्षक आणि पालकांना तर महेंद्रभाईचा मोठा आधार असतो. त्याच्यासाठी ते नेहमीच मदतीस तत्पर असतात नवनवीन योजना घेवून.

यासर्वातून महेंद्रभाई नावाचे अफाट व्यक्तिमत्व आपण सर्वांनी अनुभवले. त्यांच्या सहवासात आपण सुखावलो,आनंदी झालो,रंगलो आणी विकसित झालो. हे सर्व केवळ आपल्या पुरते सीमित ठेवून चालणार नाही. आपण पण या शिक्षणाच्या वारीचे वारकरी होऊ या न !! आपल्या स्वतःला आपण विकसित होतोय याची अनुभूती होणे ही आपल्या विकासासाठी खूप मोठी प्रेरणा असते. छात्र प्रबोधन वाचताना आपल्याला हेच तर कळते. आपल्याला परिस्थितीचे भान येते आणि आपल्या जाणिवां समृद्ध होतात. आपल्याला नक्कीच या चळवळीत सहभागी झाल्यास मनस्वी आनंद होईल.

काय करता येईल आपल्याला…
१) छात्र प्रबोधनचा दिवाळी अंक खरेदी करा तो वाचा व इतरांना वाचण्यास द्या. आवडला तर भेट म्हणून अनेकांना द्या.
२) छात्र प्रबोधनच्या दिवाळी अंकाची नोदणी आपल्या परिसरात,शाळेत,महाविद्यालयात करा. आपल्याला त्यासाठीचे साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.
३) शहरी भागात किंवा ग्रामीण भागात असे अनेक विद्यार्थी आहेत जे अंक विकत घेवू शकत नाहीत. त्यांना दिवाळी अंक ही दिवाळीची खूप मोठी भेट असणार आहे. अशा मुलांना दिवाळी अंक देण्याच्या योजनेचे प्रायोजक व्हा !! अक्षर दिवाळी अनेकांच्या सोबत साजरी करा.
४) छात्र प्रबोधन मासिकाचे वर्गणीदार व्हा इतरांना करा.
५) दिवाळी अंकाचे वाचक मेळावे घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत.

असे बरेच काही करता येवू शकते. आपला देश प्रचंड मोठा आहे. जगात लोकसंख्येच्या बाबतीत तर आपण दुसऱ्या स्थानावर आहोत. पाहिली तर आपली लोकसंख्या आपली शक्ती आहे. ही मनुष्य शक्ती विकसित करण्याची ज्ञान प्रबोधिनीचे चळवळ म्हणजे छात्र प्रबोधन. एकटे महेंद्रभाई याला पुरे नाही पडणार. नवीन शैक्षणिक धोरण हे प्रत्यक्षात आणणारे महेंद्रभाई नसतील तर ते अमलात येणार नाही. आता नवीन काळाची गरज आहे आपण सर्वानीच थोड्या काळासाठी महेंद्रभाई होण्याचे. चला तर मग महेंद्र सेठिया होऊ या !! व्यापक विकासाच्या शैक्षणिक चळवळीत सहभागी होऊ या !!

लेखन : प्रसाद चिक्षे ,अंबाजोगाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]