*चार राज्यात पोहचला बांबू लागवड पँटर्न*

0
357
चार राज्यात पोहोचला लोदग्याचा बांबू लागवड पॅटर्न
आंध्र,कर्नाटक व तेलंगणातील कार्यकर्त्यांची लोदगा येथे भेट 
पाशा पटेल यांना भेटीचे निमंत्रण
  लातूर/प्रतिनिधी:शेतकरी नेते,माजी आमदार पाशा पटेल यांनी नदी पुनरुज्जीवनासाठी सुरू केली बांबू लागवड चळवळ आणि या लागवडीचा लोदगा पॅटर्न आता चार राज्यात पोहोचला आहे.लातूर जिल्ह्यात बांबू लागवडीला गती येत असताना आता महाराष्ट्राच्या शेजारील आंध्रप्रदेश,कर्नाटक व तेलंगणातही नदीकाठी बांबू लागवड केली जाणार आहे.
   मराठवाड्याला सातत्याने भेडसावणारा दुष्काळ दूर करण्यासाठी पाशा पटेल यांनी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे.
नद्या बारा महिने वाहत्या राहण्यासाठी नदीकाठी वनक्षेत्र असणे गरजेचे असल्याने पाशा पटेल यांनी नदीकाठी बांबू लागवड प्रकल्प हाती घेतला आहे. गोदावरी-मांजरा खोरे पुनरुज्जीवन चळवळी अंतर्गत मांजरा नदीच्या दोन्ही काठावर बांबू लागवड सुरू करण्यात आली आहे.गतवर्षी मांजरा नदीचा उगम असणाऱ्या गवळवाडी या गावातून बांबू लागवडीचा शुभारंभ करण्यात आला.दोन दिवसांपूर्वीच लातूर तालुक्यातील सलगरा व औसा तालुक्यातील तोंडोळी या मांजरा नदीकाठच्या गावात १०० एकरवर बांबू लागवडीचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
   महाराष्ट्रातील माध्यमांनी या चळवळीची दखल घेतली. त्यामुळे पाशा पटेल यांची बांबू लागवड चळवळ आता इतर राज्यातही पसरू लागली आहे.
  पाशा पटेल यांच्या चळवळीची माहिती घेण्यासाठी करीमनगर येथील सुगुनाकर राव,निजामाबादचे प्रा.रवीकुमार नायक,बिदरचे श्रीकांत मोदी,शिवकुमार परवल, बोधनचे संजीव पाटील,राचन्ना जाजमल्लू,सुरेश आरापल्ली,जितेंद्र मुला,संजीव गुराला,महिलाल करकट्टा यांच्यासह
आंध्रप्रदेश,तेलंगणा व कर्नाटक राज्यातील शेतकरी संघटनांचे नेते,
पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी लोदगा येथे येऊन पाशा पटेल यांची भेट घेतली.नदी पुनरूज्जीवन व त्यासाठी बांबू लागवड याची त्यांनी माहिती घेतली.या तीनही राज्यात लवकरच हा प्रकल्प हाती घेणार असून त्यासाठी नदी खोऱ्यांना भेट देण्याचे निमंत्रण त्यांनी पाशा पटेल यांना दिले.या माध्यमातून नदी पुनरूज्जीवन चळवळ आता महाराष्ट्रासह चार राज्यात पोहोचणार आहे.
गोदावरीसह १० उपनद्यांचे होणार पुनरुज्जीवन….
  गोदावरी ही मराठवाड्यातून वाहणारी सर्वात मोठी नदी आहे.मांजरा,तेरणा,तावरजा यासारख्या १०उपनद्या गोदावरी नदीला मिळतात.या नद्यांच्या खोऱ्यावरच मराठवाड्याचे जनजीवन अवलंबून आहे.या नद्यांची मराठवाड्यातील एकूण लांबी २५०० किलोमीटर आहे. दोन्ही बाजूंचा विचार करता एकूण ५ हजार किलोमीटर नदीकाठावर बांबू लागवड करता येऊ शकते.या माध्यमातून गोदावरीसह सर्व उपनद्या बारा महिने प्रवाहित करण्याचे काम केले जाणार आहे.आंध्रप्रदेश,तेलंगणा व कर्नाटकातील नेते व शेतकऱ्यांनी ही चळवळ त्या राज्यात सुरू करण्याची मागणी केली आहे.त्यासाठी दि.२५ जानेवारी नंतर आंध्रप्रदेश व तेलंगणाचा दौरा करणार असल्याची माहिती पाशा पटेल दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here