छत्रपती संभाजीनगर, दि.९: : मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाऊंडेशन, एमजीएम पत्रकारिता महाविद्यालय व एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्टस् यांच्या संयुक्त विद्यमाने व अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (AIFF) राऊंड द इयर प्रोग्राम अंतर्गत चित्रपट चावडीचे आयोजन करण्यात येते.
या महिन्यात जर्मन सिनेसृष्टीतील गाजलेला चित्रपट A Coffee in Berlin (2012) दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट शनिवार, दिनांक १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता एमजीएम येथील व्ही.शांताराम प्रेक्षागृहात दाखविण्यात येणार आहे.‘A Coffee in Berlin’ हा जर्मन ब्लॅक अॅण्ड व्हाइट चित्रपट जन ओले गर्स्टर (Jan-Ole Gerster) यांनी दिग्दर्शित केला असून, हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाचा नायक निको फिशर (प्रमुख भूमिका टॉम शिलिंग – Tom Schilling) बर्लिनमध्ये दिशाहीन आणि उद्धवस्त जीवन जगत असतो. एका दिवसाच्या कालखंडात घडणाऱ्या घटनांमधून, त्याच्या आयुष्यातील विस्कळीतपणा, त्याचे आत्मपरीक्षण आणि सामाजिक व्यवस्थेबाबतचे निरीक्षण या चित्रपटात प्रभावीपणे मांडले आहे. एकाच वेळी गंभीर, विनोदी आणि मार्मिक असा हा चित्रपट, तरुण पिढीच्या मानसिकतेचे आणि शहरी अस्तित्वाच्या समस्या दर्शविते.

या चित्रपटाला जर्मनीतील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, विशेषतः German Film Award (Best Film, Best Director, Best Actor) यांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.प्रवेश अठरा वर्षावरील व्यक्तींसाठी खुला असून चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आणि रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे