जनजागृती उपक्रम

0
211

 

सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान तर्फे स्वातंत्र्यदिनी दुहेरी जनजागृती उपक्रम

लातूर –कोरोना साथीच्या बाबतीत अनेक नकारात्मक बाबींमुळे सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनजीवन हेलावून गेलेले आहे. समज- गैरसमज, अफवा यांचेही पीक आले आहे. या सर्वांवर शास्त्रीय व वैज्ञानिक माहिती हाच केवळ उपाय आहे. बुद्धिभेदाला विज्ञान आणि माहितीच छेद देवू शकते.

यासाठी माहिती व जाणीव निर्माण करण्याचा एक प्रयत्न सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान (पानगाव, जि. लातूर) व प्रतिष्ठान अंतर्गत मराठी विज्ञान परिषद, पानगाव विभाग यांच्यातर्फे आयोजित दीर्घ परिसंवाद मालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

निरंतर चालणाऱ्या या उपक्रमात दि. १५ ऑगस्ट, २०२१ रोजी संध्याकाळी दहाव्या सत्रात ‘कोविड तिसरी लाट- संभव व सावधानता’ या विषयावर मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनआरोग्य वैद्यकशास्त्राच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती उपक्रमाचे समन्वयक डॉ. मुकुंद भिसे व प्रतिष्ठानचे सचिव डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली.

त्याचप्रमाणे, इयत्ता १० वी नंतर पुढे काय, असा प्रश्न अनेक विद्यार्थी व पालकांना जटिल वाटतो. विद्यार्थ्यांची मानसिकता, कल, क्षमता आणि भवितव्याच्या दिशा यांबद्दल साशंकता आणि उमेद अशा दोन्ही बाबतीत योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज असते. विशेषत: ग्रामीण भागातील आणि गोरगरीब कुटुंबातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांची याबाबतीत केवळ अज्ञानामुळे कुचंबणा आणि फसवणूक होते. यावर्षीच्या प्रवेशांच्या गोंधळात कोविडमुळे उद्भवलेल्या पार्श्वभूमीची भर आहे.

त्यासाठी सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठानतर्फे अभ्यासू आणि अनुभवी अशा निष्णात समुपदेशक आणि यशस्वी अशा विद्यार्थीप्रिय प्राध्यापकांच्या दूरस्थसंपर्क (ऑनलाईन) माध्यमातून मार्गदर्शनाचा कार्यक्रम दि. १५ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला असून त्यात विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांतील भवितव्याच्या दिशांची कल्पना देण्यात येणार आहे. प्रा. नितीन वाणी, डॉ. उमा कडगे, प्रा. शैलेश कानडे व प्रा. मनोहर कबाडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या दोन्ही कार्यक्रमांच्या ऑनलाईन दुव्यांची (लिंक्स) माहिती प्रतिष्ठानच्या www.skspratishthan.com संकेतस्थळावर उपलब्ध असून नागरीक, विद्यार्थी, शिक्षक व सुजाण नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.

आपला स्नेहाभिलाषी,

प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी,

सचिव, सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान

पत्ता : १४, प्लॅटिनम अपार्टमेंट्स,

देसाई नगर, नांदेड-सोलापूर रिंग रोड,

लातूर – ४१३ ५१२

EMAIL ID – skspratishthan@gmail.com / drsantoshkulkarni32@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here