जनसेवा अभियानाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करणार- माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर
शिरूर अनंतपाळ व देवणी येथील मेळाव्यामध्ये घोषणा
लातूर प्रतिनिधी:-विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असुन यामध्ये खंड पडणार नाही. विकास करत असताना जनतेच्या समस्या आणि तक्रारी यांचे निराकरण होणेही तितकेच महत्वाचे आहे. ही बाब लक्षात घेवूनच शासन व प्रशासन स्तरावर असणा-या जनतेच्या समस्या व तक्रारी निराकरण करण्यासाठी निलंगा विधानसभा मतदारसंघातील तीन्हीही तालुक्यांच्या ठिकाणी जनसेवा अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा करत यामाध्यमातून झिरो पेडन्सी उपक्रमांस प्राधान्य देणार असल्याची माहिती माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

शिरूर अनंतपाळ व देवणी येथे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्तंच्या मेळाव्यात आ.निलंगेकर बोलत होते. यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे प्रदेश प्रवक्ते शिवानंद हैबतपूरे, जिल्हा बॅंकेचे संचालक भगवान पाटील तळेगांवकर, जेष्ठ नेते अॅड.संभाजीराव पाटील, विधानसभा प्रभारी दगडु सोळुंके, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, जि.प.माजी सभापती गोविंद चिलकुरे, नगराध्यक्षा सौ.मायावती धुमाळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अॅड.ज्ञानेश्वर चेवले, माजी जि.प.सदस्य प्रशांत पाटील, प्रशांत पाटील दवणहिप्परगेकर, रामलिंग शेरे, बाबुराव इंगोले आदीची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्याचे औचित्य साधून शिरूर अनंतपाळ भाजपा तालुकाध्यक्ष पदी मंगेश पाटील तर देवणी तालुक्याध्यक्ष पदी काशिनाथ गरीबे यांची पुन:श्च सर्वांनुमते निवड करण्यात आली. तसेच देवणी तालुका प्रभारी म्हणुन प्रशांत पाटील जवळगा यांची नियुक्ती करण्यात आली.
निलंगा विधानसभा मतदारसंघात विकास कामांना पुन्हा एकदा आपल्या सरकारच्या माध्यमातून गती मिळाली असल्याचे सांगत माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मात्र या विकास कामासोबत शासन व प्रशासन स्तरावर असणा-या जनतेच्या समस्या व तक्रांरी सोडविणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळेच विधानसभा मतदारसंघातील निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी या तीन्हीही तालुक्याच्या ठिकाणी जनसेवा अभियान राबविण्यात येणारअसल्याचे सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून शासन व प्रशासनाचे सर्वंच विभाग एका छताखाली एक दिवस आणण्यात येणार असुन या दिवशी तालुक्यातील जनतेने आपली तक्रार व समस्या घेवून येण्याचे आवाहन केले. या तक्रारीचे व समस्याचे निराकरण त्या पुढील दहा दिवसात करण्यात येणार असुन हा उपक्रम दर तीन महिन्याला राबविला जाणार आहे. त्यामुळे झिरो पेडन्सी राहील असा विश्वास आ.निलंगेकर यांनी व्यक्त केला. पक्ष संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्याचे काम कार्यकर्त्यांच्या द्वारे होत असले तरी कार्यकर्त्यांना बळ देण्याची भूमिका आपण नेहमीच घेतलेली असुन आगामी काळातही कार्यकर्त्यांना बळ दिले जावून त्यांनी पक्ष संघटन वाढविण्यासाठी आपले योगदान दयावे अशी व्यक्त केली.
सध्या पावसाने दडी मारलेली असुन शेतकरी मोठया अडचणीत असल्याचे सांगत शेतक-यांना अग्रीम पिक विम्याच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी आपण बांधिल असल्याचे सांगत आ.निलंगेकर यांनी केवळ या मदतीच्या माध्यमातून शेतक-यांची अडचण दुर होणार नसल्याचे निदर्शनास आणुन दिले. त्यामुळेच शेतक-यांना किती मदत मिळावी याकरीता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतक-यांपर्यंत जावून त्यांच्याशी चर्चा करून त्या मदतीची रक्कम किती असावी याबाबत माहिती घ्यावी असे आवाहन करून ही मदत शेतक-यांना मिळवून देण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करू असे आश्वासित केले. या संकट काळात शेतक-यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा राहिल अशी ग्वाही देवून आ.निलंगेकर यांनी संकट काळात शेतक-यांनी खचुन जावू नये असे आवाहनही केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शिवानंद हैबतपुरे, संजय दोरवे, अॅड.संभाजीराव पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याचे औचित्य साधत शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंजनी येथील मन्मथ तडकिले व देवणी येथील जि.प.चे माजी सभापती नागेश जीवने यांनी आपल्या सहका-यांसोबत भाजपात प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांचा योग्य सन्मान केला जाईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी दिला.
