निळु फुलेंच्या व्यक्तिमत्वाचा सांगोपांग वेध !- शरदकुमार एकबोटे
एका समर्थ अभिनेत्याच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा सांगोपांग वेध घेणारे ‘जनामनातील माणूस : निळू फुले’ हे पुस्तक चरित्रलेखनाचा उत्तम वस्तुपाठ म्हणावा लागेल. पत्रकार-लेखक रजनीश जोशी यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ते लिहिताना त्यांच्या हाती जो ऐवज लागतो, तो लक्षवेधक आहे. विविध नाटके आणि चित्रपटांतून जगलेल्या, समरस पावलेल्या निळुभाऊंच्या सकस अभिनयक्षमतेचा धांडोळा यात आहेच, पण दीनदलितांच्या बाजूने लढणारा ‘समाजवादी कार्यकर्ता’, मगरूर अन्यायी सत्तेच्या विरोधात आवाज बुलंद करणारा ‘वक्ता’, गोवामुक्ती संग्रामात स्वतःला झोकून देणारा ‘झुंजारनेता’, सेवादलाच्या शाखेतून महात्मा गांधीजींच्या चलेजाव चळवळीत सहभाग घेणारा एक ‘सदस्य’, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, युवक क्रांतीदल अशा अनेक संघटनांसाठी योगदान देणारा ‘विचारवंत’ असे निळुभाऊंचे अभिनयाव्यतिरिक्त असलेले अनेक गुण या पुस्तकातून रजनीश जोशी यांनी नेमक्या शब्दांत उलगडले आहेत.

निळूभाऊ नास्तिक होते. देव, देऊळ ही अंधश्रद्धा आहे असे त्यांचे ठाम मत होते. उलट त्यांचे वडील कृष्णाजी श्रद्धाळू, देवभक्त होते. असे असताना निळूभाऊ नास्तिक कसे? या प्रश्नाचा मागोवा लेखकाने घेतला आहे. लहानपणी भाऊंचा सांभाळ करणारे काका, भाऊंचे वैचारिक गुरू डॉ. राममनोहर लोहिया हे नास्तिक होते. महात्मा फुलेंचे तर ते वंशजच होते. त्यांच्यासह अन्य सर्व समाजवादी साथींच्या विचारांचा प्रभाव भाऊंवर पडला. म्हणून त्यांना ‘देव’ आणि ‘दैववाद’ मान्य नव्हता.या पुस्तकातील पहिल्याच प्रकरणात निळूभाऊंचा साधेपणा, प्रेमळ स्वभाव, परोपकारी वृत्ती, स्वतंत्र विचारशक्ती या गुणांचा उहापोह रजनीश जोशी यांनी केला आहे.

पापडवाला, उदबत्तीवाला, ड्रायव्हर, मजूर अशा सामान्य श्रमिकांचाही ते कसा सन्मान करीत ते या प्रकरणातील विविध तपशीलांमधून लक्षात येते. या बलदंड नटसम्राटाचं असामान्य कर्तृत्व शब्दांत पकडताना त्यांच्या वर्तनातील सौजन्यही लेखक विसरत नाही. ‘सामाजिक कार्यकर्ता’, ‘रंगकर्मी’, ‘अभिनेता’, ‘भाऊ’ ही सगळी प्रकरणे अभ्यासपूर्ण आणि जिव्हाळ्याने मांडलेली आढळतात. साधारण सहा प्रकरणांमधून भाऊंचे भावविश्व, कथा-व्यथा आणि कर्तृत्व वाचकांना गुंतवून ठेवते हे लेखकाचे यश आहे. भाऊंच्या समकालिन विविध कलावंतांच्या अडचणी भाऊंनी कशा सोडवल्या, पदराला खार लावून त्यांना कशी मदत केली, त्यांना दिलासा दिला याची अनेक उदाहरणे पुस्तकात वाचायला मिळतात; ती सगळी प्रेरक आहेत. अभ्यासू पत्रकार, नाट्यलेखक, समीक्षक, जलअभ्यासक अशी प्रतिमा असलेल्या रजनीश जोशी यांचे ‘जनामनातील माणूस : निळू फुले’ हे पुस्तक मुंबईच्या ‘इंडस सोर्स बुक्स’ या प्रकाशनाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील अभिनयसम्राट निळू फुले यांच्या व्यक्तिमत्वातील अन्य विविध पैलूंचा थक्क करणारा जीवनप्रवास या पुस्तकातून उलगडत जातो.
आस्वादकांना थेट भिडणारी लेखकाची निवेदनशैली, चरित्रनायकाच्या कार्याचा अभ्यास, त्यांच्याविषयी असलेली आत्मीयता आणि त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग भावतात. पुस्तकात समाविष्ट केलेल्या संदर्भसूचीतून रजनीश जोशी यांनी केलेल्या संशोधनात्मक परिश्रमाची कल्पना येते. निळूभाऊंची कन्या गार्गीची मुलाखत, लालन सारंग, सदाशिव अमरापूरकर, अशोक सराफ, डॉ. जब्बार पटेल, डॉ. श्रीराम लागू, डॉ. नरेंद्र दाभोळकर, संजय डहाळे, सुधीर गाडगीळ, ज्ञानेश महाराव, अनिल अवचट, मकबूल तांबोळी, इंदुमती जोंधळे अशा अनेक नामवंतांच्या नोंदी हे पुस्तक लिहिताना रजनीश जोशी यांना सहाय्यभूत ठरल्या आहेत. प्रस्तावनेत तसे श्री. जोशी यांनी नमूद केले आहे.
‘सामना’, ‘जन्मठेप’, ‘सतीची पुण्याई’, ‘पांडू हवालदार’, ‘एक गाव बारा भानगडी’ आदी चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या काळात सहकारी कलावंतांविषयी त्यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा; त्याचप्रमाणे ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’ , ‘सूर्यास्त’ या नाटकांच्या विविध प्रयोगांदरम्यान त्यांनी दाखवलेली समयसूचकता किती अचूक होती, हे लेखकाने समरसून लिहिले आहे ते मूळातूनच वाचायला हवे. त्यांच्या शिवाजी नावाच्या सामान्य ड्रायव्हरसाठी तो मृत्युशय्येवर पडलेला असताना भाऊंनी घेतलेली त्याची काळजी हा त्यांच्या सेवाभावी स्वभावाचा प्रत्यय ठरतो. काही कारणाने त्यांचे दादा कोंडके यांच्याशी मतभेद झाले, परंतू कुणी दादांची टवाळी केली तर ते त्यांना चालायचे नाही. ‘असलं वागणं बरं नव्हे’ असं ते संबंधितांना तोंडावर सुनावत हा त्यांच्यातील आणखी एक पैलू अंतर्मुख करणारा आहे. चित्रपटात खलनायक शोभणारा हा नट; ‘माणूस’ म्हणून किती मोठा होता, सत्शील, तत्वनिष्ठ होता हे या पुस्तकातून आपल्याला समजते. विशेष म्हणजे त्यांना आपली जन्मतारीख ठाऊक नव्हती, हे गंमतीदार आहे. ‘सखाराम बाइंडर’मधील निळुभाऊंच्या सखारामने डॉ. श्रीराम लागूंना मंत्रमुग्ध केले. अमिताभ बच्चन, दिलीपकुमार, अशोककुमार, अनुपम खेर, नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापूरे यांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, त्यातून त्यांची अभिनयक्षमता सिद्ध होते. अमिताभच्या ‘कुली’ या चित्रपटाच्यानिमित्ताने ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी मोठ्या जिद्दीने आपली भूमिका पार पाडली. दिलेल्या शब्दाला जागणे हा त्यांचा स्वभाव होता, अशी अनेक उदाहरणे ‘जनामनातील माणूस : निळू फुले’मधून वाचायला मिळतात. भाऊंच्या कौटुंबिक जीवनावर प्रकाश टाकताना रजनीश जोशी यांची लेखणी हळवी होत वास्तवाला भिडते. असा हा साधा पण ‘मोठा’ माणूस अखेरच्या प्रवासाला जातो तेव्हा ‘सूर्यास्त’ झाला अशा उचित शब्दात लेखक त्यांची महत्ता स्पष्ट करतात. विविध छायाचित्रे, पोरे ब्रदर्स यांचे वेधक मुखपृष्ठ, शेफाली आर्ट्सचे सुबक मुद्रण आणि इंडस सोर्स बुक्सची दर्जेदार निर्मिती ही वैशिष्ट्ये पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालतात. एकूणात निळू फुले यांचे व्यक्तिमत्व वाचकसन्मुख करण्यात लेखक रजनीश जोशी यशस्वी झाले आहेत, असे निर्विवाद म्हणता येते.

लेखन:- शरदकुमार एकबोटे
91755 80612(लेखक हे ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक आहेत.)
००००००००००