- आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
- लातूर/प्रतिनिधी: विकासासाठी पाणी अत्यावश्यक आहे.पाणी नसल्यामुळेच मराठवाडा व लातूर जिल्ह्याचाही विकास खुंटलेला आहे. विकासाच्या महामार्गावर वाटचाल करण्यासाठी जलक्रांती आवश्यक आहे. म्हणूनच मराठवाड्याच्या हक्काचे पाणी पदरात पाडून घेण्यासाठी आपण जलसाक्षरता अभियान सुरू केले असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.

सोमवारी (दि.२५)लातूर ग्रामीण मतदार संघातील गंगापूर, निवळी,मुरुड,काळे बोरगाव,काटगाव,भोईसमुद्रगा या गावात आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वातील जलसाक्षरता अभियानाची दुचाकी रॅली पोहोचली.त्या ठिकाणी उपस्थितांशी संवाद साधताना आ.निलंगेकर बोलत होते.आ.रमेशअप्पा कराड यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी,गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आ.निलंगेकर म्हणाले की,ज्या भागात पाणी असते त्या भागाचा गतीने विकास होतो.पाणी असेल तरच मानवी वस्ती होते. त्या अनुषंगाने उद्योग -व्यवसाय विस्तारत जातात.यातून भौतिक सुविधांची निर्मिती होते. पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणीच मोठे उद्योगधंदे उभारले जातात.त्यातून रोजगार निर्मितीही होते. परिसराच्या विकासाला चालना मिळते. मराठवाड्यात पाणी नसल्यामुळे आजपर्यंत ते शक्य झाले नाही.पाणी नसल्यामुळे उद्योजक या परिसरात येण्यास तयार होत नाहीत.परिणामी येथे रोजगारही मिळत नाही. त्यामुळेच मराठवाड्यातील @तरुणांना रोजगाराच्या शोधात इतरत्र स्थलांतरित व्हावे लागते.ते थांबविण्यासाठी हक्काचे पाणी आपल्याला मिळालेच पाहिजे.राज्य शासनाने समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय घेतला असून ते पाणी मांजरा व तेरणा खोऱ्यात आले तर फायदा होणार आहे.या माध्यमातून आपणास विकासाचा महामार्ग सापडणार असून राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मागास असणारा हा परिसर सुजलाम्,सुफलाम् होण्यास मदत होणार असल्याचेही आ.निलंगेकर यांनी सांगितले.

आपल्या भागाच्या विकासासाठी हे अभियान सुरू केले असून प्रत्येक नागरिकाने त्यास पाठिंबा देत हक्क मिळवण्यासाठीच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ठिकठिकाणी दुचाकी रॅली पोहोचल्यानंतर नागरिकांनी आ.निलंगेकर यांचे उस्फुर्त स्वागत केले. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ग्रामस्थांनी पाण्यासंदर्भातील आपल्या व्यथा आ.निलंगेकर यांना सांगितल्या.

……तर मंत्रालयावर मोर्चा काढू- आ.कराड
दुचाकी रॅलीत सहभागी झालेले आ.रमेशअप्पा कराड म्हणाले की, आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सुरू केलेल्या जलसाक्षरता अभियानाचे फळ आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे. शासनाकडून दिले जाणारे पाणी मांजरा व तेरणा खोऱ्यात घेतल्याशिवाय संभाजीराव पाटील स्वस्थ बसणार नाहीत.तरीही या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही किंवा मागण्या मान्य होत नाहीत असे लक्षात आले तर आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वात मंत्रालयावर मोर्चा काढू. लातूर ग्रामीण मतदारसंघातील प्रत्येक नागरिक या मोर्चात सहभागी होईल,अशी ग्वाहीआ.कराड यांनी दिली.

अभियानाचा आज समारोप …
श्री गणेशाच्या स्थापनेपासून आ.पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असणाऱ्या जलसाक्षरता अभियानाचा मंगळवारी (दि.२६)लातूर येथे समारोप होणार आहे.सोमवारपर्यंत या रॅलीने १ हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास पूर्ण केला.ग्रामीण भागातील दुचाकी रॅली पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी दिवसभर ही रॅली लातूर शहरात फिरणार आहे.शहराच्या विविध भागातील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर सायंकाळी हनुमान चौक येथे अभियानाचा समारोप होणार आहे.




