जिंदादिल डॉक्टर

0
270

रुग्णसेवेचा कर्मयोग प्रत्यक्ष जगणारा जिंदादिल डॉक्टर

अंबाजोगाईत कोविडचा हैदोस सुरु झाला. कोविडच्या बरोबरच एक नाव प्रत्येकाच्या तोंडात होते ते म्हणजे डॉ.विशाल लेडे. कोविडची भयाण भीतीत डॉ.विशालचा आधार अनेकांना होता. आजोबा वयाची सत्तरी ओलांडलेले. त्यांना कोविडच्या संसर्ग झालेला. रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात आणले. घरातील त्यांच्या मुलांनी त्यांचीशी संपर्कच तोडला.कोविडचा संसर्गापेक्षा घरातील लोकांना बोलता येत नाही. पाहता येत नाही हे दु:ख भयानक होते. तीन चार दिवस वाट पाहून आजोबांनी जेवण सोडून दिले. त्यांना आग्रहाने जेवण देण्यासाठी जाणाऱ्या सर्व बांधवांच्या वर ते नाराजच होते. जेवणाचे ताट तांच्या समोर ठेवताचे ते त्यांनी फेकून दिले.

“माझ्या मुलाच्या चेहरा पाहिल्या शिवाय मी अन्नाचा एक घास पण घेणार नाही.”

आजोबांनी जाहीर सत्याग्रह सुरु केला. तिकडे त्यांचा मुलगा फोन उचलायला तयार नाही. आजोबा चांगलेच मोठे वतनदार. भली मोठी जमीन त्यांच्या नावावर. आज मात्र पूर्णतः निराधार असल्याची जाणीव त्यांना प्रचंड बोचत होती. डॉ.विशालच्या कानावर परिस्थिती गेली. ते डबा घेवून थेट आजोबांच्या जवळ. खूप खोल हृदयातून प्रामाणिक प्रयत्न जर आपण करायला लागलो तर जगातील सगळी चांगली शक्ती आपल्याला सोबत करते. डॉ.विशालचा प्रत्येक प्रयत्न हा खोल हृदयातून आणि प्रामाणिक असतो. आजोबांच्या जवळ जाताच त्यांनी आस्थेने आजोबांना धीर दिला. मुगाच्या उसळीच्या न्याहरीचा डबा त्यांनी उघडला. चक्क एक एक घास ते आजोबाना भरवू लागले. शांतपणे आजोबांनी अन्न घेतले. पुढे कित्येक दिवस सकाळी ते आपला जेवणाचा डबा उघडून बसून राहत. डॉ.विशाल स्वतः येवून त्यांना भरवल्या शिवाय ते खातच नव्हते. आजोबा एकदम बरे झाले. अशी एक।नाही तर अनेक कहाण्या माझ्या कानावर पडत होत्या. जिथे रुग्णाच्या जवळच जायला लोक भीत होते तिथे डॉ. विशाल रुग्णांचा आत्मज बनून त्यांना उभारी देत होता.

काही लोकांना न भेटताच त्यांच्या कामाबद्दल ऐकल्या नंतर आपण सहजच त्यांच्या प्रेमात पडतो. माझ्याबाबतीत असे फारच कमी होते. डॉ.विशालच्या बाबतीत मात्र ते मी स्वतः अनुभवत होतो.

ज्ञान प्रबोधिनीचे मदत कार्य प्रमुख सदानंद वालेकर कोविड +VE नव्हते पण त्यांना न्युमोनियाचा चांगलाच त्रास होता. रुग्णालयात व्हेंटिलेटर खूपच कमी. आणीबाणीची वेळ. अनेकांचे मत होते की मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेले पाहिजे. डॉ.विशालने सगळी जबाबदारी आपल्यावर घेतली. हॉलिवूडच्या चित्रपटातील नायक ज्या पद्धतीने प्रत्येक अवघड परिस्थितीतून अफलातून मार्ग काढतो तसेच काहीसे डॉ.विशालचे चालू होते. सदानंद वालेकरांना यमाच्या तावडीतून खेचून आणणारा आम्हा सर्वांचा जिवाभावाचा सखा म्हणजे डॉ.विशाल.

डॉ.विशाल तसे मुळचे वरोराचे. बाबा आमटेंच्या आनंदवनातील शाळेत त्यांचे वडील शिक्षक. विशालचे बालपण बाबांच्या कर्मभूमीत आणि त्यांच्या सर्व कुटुंबांच्या सानिध्यात गेले. व्यापक समाजभानाचा आणि समर्पणाच्या संस्कार त्यांच्यावर नकळतच झाला. पुढे यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतल्या नंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी त्यांना अनेक महाविद्यालयात प्रवेश मिळणे शक्य होते. त्यांनी मात्र निवड केली अंबाजोगाईची. त्यांने अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयात काम करणे सुरु केले. अगदीच ७८ किलोवजन असणारा व चांगलाच बलदंड शरीरयष्टी असणारा हा तरुण म्हणून एक तुफान होते. दररोज 800 च्या आसपास ते रुग्ण पाहायचे. मेस वरील जेवण मात्र त्यांना पचेनासे झाले. फक्त फळाच्या ज्यूस वर हा तरुण झपाटल्यागत काम करत होता. महिनाभरात त्यांचे वजन ६१ किलो झाले. कुठलाच कपडा अंगाला येत नव्हता. काम इतके मुलखाचे की जेवायला आणि झोपायला वेळ नाही तिथे बाजारात जाऊन कपडे विकत घेणे अशक्य. आहे ते कपडे ओढूनताणून घालायचे आणि काम करायचे.

विशाल थोड्याच दिवसात सगळ्यांचा परिचयाचा झाला. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याचे व डॉ.स्नेहालीचे लग्न झाले. सुखीसंसार सुरु झाला. काही महिने होतात न होतात तोच कोविड सुरु झाला. काही महिन्यात विशालचे काम प्रचंड वाढले. दिवसाचे १८ तास तो काम करत होता. रुग्णालयात येण्याची वेळ नक्की होती पण जाण्याची कधीच नक्की नव्हती. कोविड ५ ची अतिशय महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर. गावातील सर्वच राजकीय आणि मोठ्या लोकांचे अगदीच जवळचे रुग्ण तिथे असायचे. पुढे पुढे तर कोविड ५ हे कोविड मधून बरे होण्याचे केंद्रच म्हणून परिचयाचे होत होते. विशाल प्रचंड मेहनत घेत होता. त्यासोबतच त्याला येणाऱ्या प्रत्येक स्तरातील लोकांच्या फोनची संख्या वाढली. जेवायला खूपच वेळ होत होता. कधी दुपारचे ४ तर रात्रीचे ११. कुठलाच नियमित वेळ नाही. घरी मात्र डॉ.स्नेहालीच्या जीवात जीव नसायचा. आधीच कोविडचे भयानक संकट त्यात उपाशीपोटी काम करणे. डॉ.स्नेहाली विशालची वाट पाहत जेवायला थांबायची. तिच्या मनातील अस्वस्थता कोणत्या पातळीवरील असेल याची कल्पना करवत नाही.

दुसऱ्या लाटेने कहरच केला होता. कडवी झुंज अंबाजोगाईतील वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वच डॉक्टर देत होते. डॉ.विशाल आपले सर्वस्व अर्पण करू काम करत होता. कोविड संसर्ग असणाऱ्या बांधवांच्या अगदीच निकट राहणारा तो असला तरी त्याला कोविडच संसर्ग मात्र झाला नव्हता. महाविद्यालयातील मुलांच्या परीक्षा घेण्याचे निमित्य झाले आणि डॉ.विशालला संसर्ग झाला. शरीराचे तापमान कमालीचे वाढत होते. अगदीच धोक्याच्या पातळीच्यावर. फुफुसातील संसर्ग कमालीचा वाढला. घरातील आई वडील आणि सासू सासरे यांच्यासोबतच डॉ.स्नेहालीला पण संसर्ग झाला. परिस्थिती अवघड होती. विशाल आणि त्याच्या कुटुंबाच्या सोबत पूर्ण वैद्यकीय महाविद्यालय होते. अंबाजोगाईतून अतिशय क्रिटिकल स्टेजमधून बरे झालेले ८ हजारांच्या वर रुग्णांच्या आशीर्वादाचे कवचकुंडले मात्र विशालचा सोबत होती. तो त्यातून बरा झाला. आता तर स्वतः त्याने कोविडचा अनुभव घेतलेला होता. केवळ चार दिवस विश्रांती घेवून डॉक्टरसाहेब आपल्या कामावर रुजू झाले. प्रचंड घाम आणणारे PPE कीट घालून डॉ.विशाल रुग्णाला पाहत होते. अंगातून घामाच्या धारा लागलेल्या. कोविड संसर्गातून झालेली शरीराची झीज. शंभराच्यावर रुग्ण पाहून झाल्यावर अंगातील पुरते अवसान संपले होते. पुढे काय होईल हे सांगता येणे शक्य नव्हते. आपल्यातील असणाऱ्या प्रचंड ताकदीला पेटवून ते परत कामाला लागले. सगळ्या बांधवांची तपासणी करून ते बाहेर आले.

“कसला कमालीचा माणूस आहे ! आम्हाला पण कोविडचा संसर्ग झाला. पंधरा दिवस थकवा जात नव्हता. हा डॉक्टर मात्र चार दिवसात कामाला लागता. प्रचंड काम करतोय. नवलच वाटते मला.”

आज माझ्या समोर अतिदक्षता विभागातील एक परिचारिका डॉ.विशालच्या कामाच्या बद्दल एका ब्रदरला बोलत होती. तो ब्रदर खास औरंगाबादहून आलेला. डॉ.विशालला पाहताच दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. मी रुग्णालयात असणारी प्रचंड आत्मीयता स्वतः अनुभवत होतो. कोविडच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या एक आजीबाई आपल्यातील निर्मळ प्रेमाने डॉ.विशालला ज्यावेळी मिठी मारतात त्यावेळी सगळेच सहकारी गहिवरले होते.

काल डॉ.विशालची भेट झाली. मी केलेल्या त्यांच्याबद्दलच्या कल्पना सगळ्याच खोट्या ठरल्या. बॉलिवुड शेहनशाह एंग्री यंग मैन’ अमिताभ बच्चन सारखा तो कोविडच्या वार्ड मधील शेहनशाह अशी माझ्या मनात त्याची प्रतिमा झालेली. प्रत्यक्षात हा डॉक्टर म्हणजे कमालीचा सालस, एकदम शांत, कुठलाही अभिनिवेश बोलण्यातून नाही. बोलणे आणि वागणे कमालीचे साधे. मला खरंच प्रचंड कुतूहल डॉ.विशालच्याबद्दल मनात निर्माण होत होते. त्याच्याशी बोलताना त्याच्या सोबतच डॉ.स्नेहालीबद्दल पण अपार कौतुक वाटत होते. गेले काही दिवस स्वामी विवेकानंदाचा कर्मयोग नव्याने समजून घेत होतो. डॉ.विशाल कर्मयोगाचा सिद्धांत इतक्या सहज भाषेत सांगत होता की मला काही काळ सगळ्याचा विसर पडला आणि मी एकटक त्याच्याकडे पाहत राहिलो. रुग्णसेवेचा कर्मयोग प्रत्यक्ष जगणारा जिंदादिल डॉक्टर म्हणजे डॉ.विशाल.

झोपायला गेलो मात्र झोप काही येत नव्हती. सतत डॉ.विशाल व डॉ.स्नेहालीच्याबद्दल मनात विचार येत होते. काही तरी नक्कीच शुभ संकेत असणार असे मला मनातून वाटत होते. आज सकाळी उपासना करताना अचानक विचार चमकून गेला. ज्ञान प्रबोधिनीच्या तर्फे आज देण्यात येणारे तीन BIPAP व्हेंटिलेटर आपण या दोघा डॉक्टर दांपत्याच्या हस्ते दिले तर किती छान होईल. मी लगेच माझे मोठे बंधू नंदकिशोर मुंदडा यांना माझी संकल्पना सांगितली. त्यांना तर ती फारच आवडली. रुग्णालयातील सर्व जेष्ठ डॉक्टरांनी तिचे स्वागत केले. मत तृप्त आणि शांत झाले. डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांच्या तालमीत तयार होणारे असे अनेक कर्मयोगी म्हणजे स्वामी विवेकानंदाच्या स्वप्नातील जग बदलणारे युवक !!

डॉ.स्नेहाली,

तुमचे धन्यवाद कोणत्या शब्दात व्यक्त करू. तुम्ही एका तुफानाशी लग्न केलं आहे. कर्मयोगी तुफानाच्या बरोबर संसार करणे फार मोठे दिव्य. मला डॉ. विशाल पेक्षाही तुमचे जास्त कौतुक वाटते. तुमचा खंबीर पाठींबा आणि आधार डॉ. विशालच्या अंगात हजार हत्तीचे बळ निर्माण करतो हे त्याच्या बोलण्यातून लक्षात येते. तुम्हा दोघांच्या हातून फार मोठे काम होत आहे. मला पूर्ण कल्पना आहे की डॉ. विशाल आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवत आहे. तुम्हाला त्याची खूप काळजी आहे. तुम्ही तर सावित्रीच्या लेकी !! तुमच्यातील अफाट ताकद व प्रेम डॉ. विशालसाठी नेहमीच कवचकुंडले ठरतील !!

लेखक

प्रसाद चिक्षे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here