19.7 C
Pune
Friday, October 31, 2025
Homeसाहित्य*' जे.एफ ' : प्रबोधनाची बांधिलकी जपणारे थोर अर्थतज्ज्ञ*

*’ जे.एफ ‘ : प्रबोधनाची बांधिलकी जपणारे थोर अर्थतज्ज्ञ*


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८५०८ ३०२९० )

महाराष्ट्रातील ख्यातनाम अर्थतज्ञ,शिक्षणतज्ञ आणि समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि समाजवादी प्रबोधिनीच्या कामातील गेल्या सदतीस वर्षापासूनचे माझे ज्येष्ठ सहकारी,मार्गदर्शक प्रा. डॉ.जे. एफ.पाटील बुधवार ता. ७ डिसेंबर २०२२ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी कालवश झाले. १ एप्रिल १९४२ हा सरांचा जन्मदिन.ज्येष्ठ विचारवंत आणि प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष असलेले प्रा. डॉ.एन.डी.पाटील हे याच वर्षी १७ जानेवारीला कालवश झाले .त्यानंतर आम्ही सर्वांनी एकमताने प्रा.डॉ.जे. एफ. पाटील यांची समाजवादी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी निवड केलेली होती. दोन महिन्यांपूर्वी रविवार ता.९ ऑक्टोबर २०२२ रोजी जे.एफ.सरांच्या अध्यक्षतेखाली समाजवादी प्रबोधिनीची पंचेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभाही इचलकरंजीत संपन्न झाली होती. त्यामध्ये अनेक संकल्पची आम्ही चर्चा केली होती व ते कृतीत आणायचे ठरविले होते.एन. डी.सर हे प्रबोधिनीच्या संस्थापक सदस्यातील अखेरचे शिलेदार होते.तर प्रबोधिनी स्थापन झाल्यावर तिच्या कामात सक्रिय सहभागी होणारे जे.एफ.सर पहिल्या फळीतील सहकारी होते. प्रबोधनाची बांधिलकी जपणारे ते थोर अर्थतज्ञ होते एन.डी.सरांच्या पाठोपाठ जे. एफ. सरांचे जाणे हा समाजवादी प्रबोधिनी परिवारासाठी फार मोठा धक्का आहे.अपरिमित हानी झाली आहे.अर्थात त्यांनी आखलेल्या मार्गावरून समर्थपणाने व सक्षमपणाने वाटचाल करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे. प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांना समाजवादी प्रबोधिनी परिवाराचे विनम्र अभिवादन..!

डॉ.जे.एफ.पाटील हे अर्थशास्त्र विषयाचे गाढे व्यासंगी, ख्यातनाम वक्ते, लेखक, विचारवंत म्हणून सुपरिचित होते. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट मधून त्यांनी पीएचडी प्राप्त केलेली होती.जयकुमार फाजगोंडा पाटील हे त्यांचे पूर्ण नाव.पण ‘ जे.एफ ‘ या नावाने ते सर्वपरिचित होते. अतिशय भारदस्त व्यक्तिमत्व लाभलेले जे.एफ.सर फार मोठा शैक्षणिक वारसा नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातून आले. त्यांचे वडील पोलीस दलात सेवेत होते. सरांनी भिलवडी ,इस्लामपूर ,आष्टा सांगली आदी ठिकाणी शिक्षक व अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले.नंतर १९८४ पासून ते शिवाजी विद्यापीठात रुजू झाले १९९८ साली ते तिथेच निवृत्त झाले.
शिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण वाटचालीत डॉ.जे.एफ. पाटील यांचे योगदान मोठे राहिलेले आहे.अर्थशास्त्राचे प्राध्यापक,विभाग प्रमुख, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक,गोडबोले अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी दिलेले योगदान अतिशय मौलिक स्वरूपाचे आहे. सर कुलगुरू झाले असते तर त्यांनी निश्चितच सर्वांगीण लौकिकात अधिक भर घातली असती यात शंका नाही.

महाराष्ट्रातील बहुतांश सर्व विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर त्यांनी काम केलेले आहे. महाराष्ट्र शासन, शिवाजी विद्यापीठासह अनेक संस्थांनी त्यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरविले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थविषयक समित्यांवर नियोजन समितीवर त्यांनी काम केले आहे. मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वाटचालीतही सरांचे योगदान अतिशय मोठे आहे.भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे सर उपाध्यक्ष होते.मराठी व इंग्रजी मध्ये सातत्याने लेखन करणाऱ्या जे.एफ.सरांची शंभरावर पुस्तके प्रकाशित आहेत. अगदी सरांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीही गुरुवार ता.८ डिसेंबर रोजी सरांचा लेख दैनिकात प्रकाशित झाला होता. इतके अखेरपर्यंत सर कार्यरत होते.

समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापनेपासून जे.एफ. सर प्रबोधिनीच्या कार्यात सक्रिय होते. प्रबोधिनीच्या सुरुवातीच्या काळात आचार्य शांताराम गरुड यांनी विविध विषयातले जे अभ्यासक, संशोधक शोधले आणि त्यांना प्रबोधन चळवळीशी जोडून घेतले त्यात जे.एफ.सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. समाजवादी प्रबोधिनीच्या कोल्हापुरातील अनेक बैठका जे.एफ.सरांच्या घरीच होत असत.सरांच्या पत्नी कमलताई आमच्या अल्पोपहार व चाहापानाची व्यवस्था नेहमी उत्तम करत.सरांचे चिरंजीव अभिनंदन,कन्या राजलक्ष्मी ,सून,जावई,नातवंडे अशा सर्व कुटुंबीयांचे सरांवर व सरांचे त्यांच्यावर कमालीचे प्रेम होते.एक भाऊ व तीन बहिणी असलेल्या सरांचे एक कुटुंबवत्सल गृहस्थ म्हणूनही दर्शन नेहमी व्हायचे.सरांच्या छोट्या नातीने त्यांच्या एका पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार केले होते.मंत्री महोदयांच्या हस्ते झालेल्या त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी नातीला आवर्जून बरोबर घेतले होते. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच होता.जे. एफ.सरांच्या बरोबर असे अनेक प्रसंग अनुभवता आले आहेत.

समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने सुरुवातीपासून अर्थशास्त्रविषयक पुस्तिका निघाल्या आणि १९९०पासून ‘ ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ हे नियमित मासिक सुरू झाले. त्यामध्ये जे.एफ. सरांचे अर्थशास्त्र विषयक लेखनाचे योगदान सर्वात मोठे आहे. प्रबोधिनीसाठी त्यांनी डंकेल प्रस्तावाचा चावरतिढा, महामंदी येत आहे,महागाई :कारणे व उपाय, नोटाबंदी,कोरोनाबंध यासारखी अनेक पुस्तके पुस्तिका लिहिल्या.तसेच ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘ मासिकातही त्यांचे ‘अर्थाअर्थी ‘ हे सदर सुरू होतेच.सरांचे मराठी व इंग्रजी वाचन प्रचंड होते.अर्थशास्त्राबरोबर,साहित्य,कला,राजकारण,
तत्वज्ञान,धर्म,शिक्षण असे सगळे विषय त्यांच्या सूक्ष्म वाचनाचा भाग होते.त्यामुळे त्यांचे लेखन व वक्तृत्व नेहमीच त्यांच्या व्यक्तिमत्वा प्रमाणे भारदस्त असे. सर सातत्याने वृत्तपत्रात लेखन करत असत. त्याच पद्धतीने सातत्याने ग्रंथलेखनही करीत असत.अलीकडे कोरोना व त्यानंतरच्या कालखंडामध्येही त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.ही पुस्तके समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित करण्यात आली होती.

अर्थशास्त्रविषयक लेखकांची, वक्त्यांची एक फळीच त्यांनी उभी केली. हे महाराष्ट्राच्या अर्थशास्त्रीय प्रबोधनाच्या क्षेत्रातील अनमोल स्वरूपाचे कार्य आहे. जे.एफ.सरांच्या लिखाणाचा वेग प्रचंड होता.वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीसुद्धा ते सातत्यपूर्ण लेखन करत असत. त्याविषयी बोलत असत. अर्थशास्त्रासारखा क्लिष्ट विषय ते लेखनातून व बोलण्यातून कमालीचा सोपा व सुलभ करत असत. तो कार्यकर्त्याच्या ध्यानात येईल अशा स्वरूपाची मांडणी ते करत असत. समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली ४४ वर्षे ‘ केंद्रीय अर्थसंकल्प व्याख्यानमाला ‘ घेतली जाते.ती जे.एफ. सरांनी एक हाती सांभाळलेली आहे.विषयांची विभागणी व वक्त्यांची निवड ते त्यांच्या अनुभवातून फार नेमकी करत.नवे अभ्यासक,वक्ते घडवत. मी जे.एफ.सरांचा प्रबोधिनीतील गेल्या तीन तपाचा सहकारी – साक्षीदार म्हणून होतो. तसेच प्रबोधिनीच्या वतीने विविध शाखांवर आयोजित केली जाणारी अभ्यास शिबिरे ,व्याख्याने,चर्चासत्रे , मेळावे यामध्येही त्यांचे योगदान अतिशय महत्वाचे होते.सरांना व्याख्यानासाठी,मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले आणि त्यांनी नकार दिला असे कधी झाले नाही. समाजवादी प्रबोधिनीच्या सर्व शाखांवर मार्गदर्शनासाठी सर यायचे. त्याचबरोबर त्यांच्या व माझ्या स्नेहामुळे काही सामाजिक संस्था,बँका,पतसंस्था जे.एफ.सर प्रमुख पाहुणे म्हणून हवे असतील तर माझ्याशी संपर्क साधत. त्यावेळी मी सरांना तिथे मार्गदर्शनासाठी जावे अशी विनंती करत असे. अशा प्रत्येक वेळी सरांनी त्याचा स्वीकार केला. काहीवेळा संयोजक अथवा संयोजक संस्थेची परिचय नसूनही केवळ माझ्या विश्वासावर सरांसारखेज्येष्ठ अर्थतज्ञ गोव्यापासून मुंबईपर्यंत व्याख्यानासाठी जात होते. अशा कार्यक्रमानंतर संयोजक संस्था मला फोन करून सांगत की, जे.एफ. सरांसारखी मोठी व्यक्ती तुमच्यामुळे आमच्या कार्यक्रमाला येऊ शकली याबद्दल आम्ही आभारी आहोत. त्यावेळी खरा मला आनंद व्हायचा. पण या सगळ्या मागे सरांची प्रबोधनाची चळवळ पुढे गेली पाहिजे ही तळमळ तसेच त्यासाठी वेळ, बुध्दी,श्रम देण्याची व अनेकदा पदरमोड करण्याची ठाम भूमिका सर्वात महत्वाची होती.

जातिवंत शिक्षकाने निवृत्तीनंतरही कसे सक्रिय राहिले पाहिजे याचे उत्तम उदाहरण जे.एफ.सर होते. सतत लेखन,वाचन,भाषण,स्वतः ड्रायव्हिंग करत ते दीर्घ पल्ल्याचा प्रवास अखेरपर्यंत करत.त्यांचा वेग सर्वार्थाने अचंबित करणारा होता. प्रेरणादायक होता.
समाजवादी प्रबोधिनीची गेली ४५ वर्षे जी वाटचाल सुरू आहे त्यामध्ये प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांना आदर्श शिक्षकासह अनेक पुरस्कार मिळालेले होते.तसेच मराठी अर्थशास्त्र परिषदेचा डॉ.श्री.आ.देशपांडे जीवन गौरव पुरस्कार,शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचा कुलपती डॉ.पतंगराव कदम जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. तसेच गतवर्षी डी.वाय.पाटील विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.सरांनी शेकडो विद्यार्थी,अभ्यासक,वक्ते, घडवून अर्थविषयक प्रबोधन क्षेत्रात अतिशय मौलिक काम केले.अशा जे.एफ.सरांना विनम्र अभिवादन…!

प्रसाद कुलकर्णी

(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासून कार्यकर्ते आहेत.तसेच गेली तेहतीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]